Speeches

 • लोकमत वर्धापन दिन समारंभातील भाषण
  तारीख : १४ डिसेंबर २०१६ 
  ठिकाण :  डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर 
  कार्यक्रम :  लोकमतचा ४५ वा वर्धापन दिन 

  लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांचे लोकमत वर्धापन दिन समारंभातील भाषण 


  लोकमतच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊजी नाना बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकरावजी ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्णजी विखे पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराजजी चव्हाण, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, शासकीय अधिकारी, आपण सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रहो. 
  महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असलेले ‘लोकमत’ हे केवळ दैनिक वृत्तपत्र नाही, तर ती एक उज्ज्वल राष्ट्रीय परंपरा आहे. ‘लोकमत’ हे नावच मुळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुचविले व त्या नावाचे साप्ताहिक लोकनायक बापूजी अणे यांनी सुरू केले. १९१८ मध्ये यवतमाळला सुरु झालेले हे साप्ताहिक १९३० मध्ये जंगल सत्याग्रहानंतर बंद पडले. आमचे वडील जवाहरलालजी दर्डा बाबूजी यांनी १९५३ मध्ये साप्ताहिक लोकमत पुन्हा नव्याने यवतमाळात सुरू केले. त्या प्रकाशन सोहळ्याला सीपी अँड बेरारचे तत्कालीन मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल उपस्थित होते. १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेबरोबरच लोकमतचे रुपांतर द्विसाप्ताहिकात झाले. १५ डिसेंबर १९७१ रोजी नागपुरातून लोकमत दैनिकाच्या स्वरुपात प्रकाशित होऊ लागले. म्हणजे आज ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दिवशी बांगला मुक्तीसाठी भारत-पाकिस्तानातील युद्ध अंतिम चरणात येऊन ठेपले होते.  लोकमतच्या यशाकरिता सर्व वाचक, वार्ताहर, एजंट, हितचिंतक यांनी दिलेल्या आशिवार्दाचे स्मरण मला आज या ठिकाणी होत आहे. या सर्वांना मी येथे सुरुवातीलाच अभिवादन करतो. आज आपले लोकमत दैनिक ४५ वर्षाचे झाले आहे.
  बाबूजी हे म. गांधींच्या स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक होते. १९४२ मध्ये स्वातंत्र्यासाठी लढताना त्यांना अडीच वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. या सा-याचा परिणाम लोकमतच्या जडणघडणीवर झाले आहे. बाबूजी राजकारणातही सक्रीय होते. पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वीर वामनराव जोशी यासारख्या दिग्गजांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या वाट्याला आमदारकीपासून मंत्रिपदापर्यंतची सारी महत्त्वाची व जबाबदारीची पदे आली. या सा-या जबाबदा-यांना त्यांनी यथोचित न्याय दिला. यासोबतच बाबूजींनी लोकमतची धुरा तेवढ्याच शक्तीनिशी खांद्यावर घेतली. परिणामी पहिल्या दशकातच लोकमत हे विदर्भ व खान्देशातले पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र बनले. 
  दै. लोकमतचे पहिले संपादक होते पद्मश्री पां.वा. गाडगीळ. ते नामांकित अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांच्या अग्रलेखांनी या वृत्तपत्राला आरंभापासून एक राष्ट्रीय वळण दिले. त्यांच्या पश्चात त्या पदावर आलेले बाबा दळवी यांची सामाजिक बांधिलकी फार मोठी होती. लोकलढ्याचा अनुभव व त्यातील सहभाग यामुळे बाबूजींना विदर्भातल्या सामान्य माणसांच्या सुखदु:खांची चांगली जाण होती. ते उत्तम वक्ते होते. त्यांची लेखणीही त्यांच्या वाणीएवढीच तरल, संवेदनशील व अंत:करणाला भिडणारी होती. 
  मुख्यमंत्रीजी, आपल्याला कल्पना आहे. बाबूजी काँग्रेसचे निष्ठावंत होते. मात्र लोकमतमध्ये बातमी प्रकाशित करताना त्यांनी कोणत्याही पक्षावर किंवा कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ दिला नाही. बाबूजी विचारांनीच इतरांशी लढायचे. मात्र व्यक्तिगत जीवनात त्यांचे सर्वच मित्र होते. त्यामुळेच ती परंपरा लोकमतने आजही जोपासलेली आहे.
  नागपूरच्या गणेश पेठेतील मोफिसियल आॅईलमिल कंपांऊंडमध्ये लोकमतचा संसार १९७१ मध्ये सुरु झाला. तो अतिशय कष्टाचा काळ होता. वार्ताहर नेमणे, चांगल्या बातम्या मिळवणे, त्या संपादित करून भल्या पहाटे वाचकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी होती. आजचे लोकमतचे चेअरमन आणि त्यावेळी अत्यंत तरुण असलेले माझे मोठे बंधू श्री. विजयबाबू यांनी प्रचंड मेहनत घेऊन लोकमतची टीम बांधली.  वृत्तपत्र यशस्वी करायचे असेल तर अंक सुबक व आकर्षक निघणे आवश्यक असते. त्यासाठी मला १९७२ साली प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठविण्यात आले. बाबूजींच्या निधनानंतर श्री. विजयबाबूंवर लोकमतची पूर्ण जबाबदारी आली आणि तितक्याच ताकदीने ही जबाबदारी ते पार पाडत आहेत.
  जिथे मराठी तिथे लोकमत ही बाबूजींची दृष्टी होती. हे स्वप्न विजयभैय्याच्या   नेतृत्वाखाली लोकमत परिवाराने घेतलेल्या परिश्रमाच्या जोरावर व वाचकांच्या पाठिंब्यामुळे साकार होऊ शकले.  
  आज या सोहळ्यात प्रकाशित होत असलेल्या ग्रंथात लोकमतच्या आरंभीच्या दहा वर्षांचा म्हणजे १९७१ ते १९८१ या दशकाचा इतिहास आहे. या पहिल्या दशकात बांगला मुक्तीसाठी झालेले भारत-पाक युद्ध, भारताने केलेली पहिली अणुचाचणी, देशव्यापी रेल्वे संप, आणिबाणी, केंद्रात जनता राजवट, मंडल आयोगाची स्थापना, त्यानंतर इंदिरा काँग्रेसचे पुनरागमन, महाराष्ट्रात वसंतराव नाईकांपासून बॅरिस्टर अंतुलेंपर्यंत पाच मुख्यमंत्र्यांची कारकिर्द अशा सर्वच महत्त्वाच्या घटनांना लोकमतने निष्पक्ष भूमिकेतून योग्य न्याय दिला. लोकमतने घेतलेल्या भूमिका, हाताळलेले प्रश्न व पाठिंबा दिलेल्या चळवळी नंतरच्या काळात विकसित व मोठ्या झाल्या आणि त्यांनी आपल्या यशासोबत लोकमतचेही नाव उंचावत नेले. 
  लोकमतने वृत्तपत्रसृष्टीला नवे वळण देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. प्रशिक्षित पत्रकार तयार करण्याची योजना महाराष्ट्रात लोकमतनेच सुरु केली. ग्रामीण भागातून आलेल्या या तरुणांना ग्रामीण प्रश्नांची चांगलीच जाण होती. त्याचे प्रतिबिंब लोकमतमध्ये बघावयास मिळते. समाजातील सर्वच घटकांना आपलेसे वाटेल असे परिपूर्ण व वाचकाभिमुख वर्तमानपत्र हे बाबूजींचे स्वप्न होते. ते नेहमी म्हणायचे, समाजात सर्वच अमंगल नसते. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडलीच पाहिजे, त्यांच्यासाठी संघर्षाची भूमिका घ्यायलाच हवी, पण यासोबतच समाजातील चांगल्या गोष्टींनाही प्रोत्साहन दिले पाहिजे. सतत नव नवीन प्रयोग हे लोकमतचे वैशिष्ट्य राहिले आहे. वृत्तपत्रसृष्टीत रंगीत पुरवणी, आॅफसेट छपाई, फोटो कंपोजिंग, जिल्ह्या जिल्ह्यात पूर्णवेळ पत्रकार, त्यांच्या दिमतीला टेलिप्रिंटर सेवा या बळावर पाहता पाहता पहिल्या १० वर्षांतच लोकमत विदर्भ व खान्देशातले पहिल्या क्रमांकाचे दैनिक बनले. सरकारी निर्णयांमध्ये लोकमतच्या जनताभिमुख भूमिकांचे प्रतिबिंब दिसू लागले. 
  सर्वाधिक खपाचे दैनिक असतानाच लोकमतने आपली सामाजिक बांधिलकी सातत्याने जपली आहे. राष्ट्रीय आपत्तीत वाचकांच्या साथीने लोकमतने नेहमीच मदतीचा हात पुढे केला. मोवाड, बीड, नांदेडमधील पूरस्थिती असो की लातूर, बिहार व गुजरातमधील भूकंप असो. लोकमतने आपत्तीत अडकलेल्यांना मदत केली, धीर दिला. कारगिल युद्धातील शहिदांच्या पाल्यांसाठी लोकमतने महाराष्ट्रात ४ वसतिगृहे उभारली. जबलपुरात हॉस्पिटल सुरू केले. जलसंवर्धनाबाबत लोकमत नेहमीच सतर्क राहिला आहे. याचवर्षी लोकमतने राबविलेल्या जलमित्र अभियानाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसंशा झाली.
  जगातल्या कोणत्याही कोप-यात विकसित झालेले नवनवीन तंत्रज्ञान थेट वाचकांपर्यंत पोहोचविण्यात लोकमत नेहमीच एक पाऊल पुढे राहिले आहे. सध्या डिजिटल क्रांतीची चर्चा सर्वत्र होत आहे. लोकमतने १८ वर्षांपूर्वीच १९९८ साली लोकमत डॉट कॉम या मराठी न्यूज पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल क्रांतीची सुरुवात केली. लोकमतचा डिजिटल ई-पेपर २००५ पासून जगाच्या कानाकोप-यात पोहोचत आहे. उच्चशिक्षित आणि आधुनिक जगाची जाण असलेली नवी पिढी - देवेंद्र, ऋषी आणि करण हे मोठ्या क्षमतेने लोकमतचे नेतृत्व करत आहेत, नवनवीन प्रयोग करत आहेत. एका गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे. लोकमत दीपोत्सव मजकूर, आशय आणि आकर्षकतेच्या बाबतीत अव्वल ठरला असून २ लाखांचा राष्ट्रीय उच्चांक गाठला आहे.
  लोकमत दैनिक नागपुरात सुरू झाले तेव्हापासून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आज लोकमतने महाराष्ट्र व गोव्यात दैदीप्यमान यश संपादन केले आहे. या प्रवासामागे एक तपश्चर्या आहे. एक परिपूर्ण वृत्तपत्र देण्याचा ध्यास आणि वाचक हाच केंद्रबिंदू मानून लोकमतची वाटचाल झाली आहे. लोकमत आज ४५ वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने लोकमत पहिले दशक (१९७१ ते १९८१) या ग्रंथाचा लोकार्पण सोहळा होत आहे. आपण सर्व आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आलात. आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. 
  धन्यवाद. जयहिंद, जय महाराष्ट्र. 
 • बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर कॉफीटेबल बूक प्रकाशन समारंभातील भाषण
  तारीख : 14 मे 2016
  ठिकाण : हुंडेकरी लॉन्स, अहमदनगर
  कार्यक्रम : बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर कॉफीटेबल बूक प्रकाशन 

  लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांचे 
  बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर कॉफीटेबल बूक प्रकाशन समारंभातील भाषण

  लोकमत वृत्तपत्र समूहाच्या 'बिझनेस आयकॉन्स आॅफ अहमदनगर’च्या या प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित कायनेटिक उद्योग समूहाचे चेअरमन पद्मश्री अरुण फिरोदियाजी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि अनेक वर्षांपासून ज्यांच्याशी माझा संबंध आला आहे, ते राधाकृष्ण विखे पाटीलजी, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे जी, व्यासपीठावर उपस्थित सोहम व अनुरोन ग्रुपचे संस्थापक-संचालक नरेंद्र फिरोदिया जी, कोहिनूरचे प्रदीप गांधी, या समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले महापौर अभिषेक कळमकर, अहमदनगर  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, येथे उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, आपण सर्व गौरवमृूर्ती, या शहरातील उद्योजक व व्यावसायिक, मान्यवर नागरिक आणि उपस्थित मित्रहो. 
  अहमदनगरच्या ऐतिहासिक नगरीत आज या भव्यदिव्य सोहळ्याला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली आणि आपल्या सर्वांना भेटता आले याबद्दल मी सुरुवातीलाच आनंद व्यक्त करतो.
  वृत्तपत्राचे काम हे केवळ बातम्या देणे आणि मनोरंजन करण्यापुरतेच सिमीत नाही. समाजाच्या सुख, दु:खात समरस होऊन समाजाचा सोबती बनावे, ही लोकमतची प्रारंभीपासूनची भूमिका आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आशिर्वादामुळे लोकमत हा देशातील अग्रेसर माध्यम समूह बनला आहे. लोकमतला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने लोकनायक बापूजी अणे यांनी 1919 साली यवतमाळहून लोकमत साप्ताहिकाची सुरुवात केली. पुढे 1930 मध्ये जंगल सत्याग्रहात ते बंद पडले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1953 साली माझे वडील, स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबूजी यांनी ‘साप्ताहिक लोकमत’ परत सुरू केले. पुढे नागपूरला 1971 साली साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर झाले. त्यावेळी एका एडिशनने सुरु केलेल्या ‘लोकमत’ने आज विविध भाषांमध्ये बहुआयामी माध्यमांचे स्वरुप धारण केले आहे. आपणा सर्वांशी जे नाते निर्माण झाले, त्यातूनच हे शक्य झालेलं आहे.
  मराठीत ‘लोकमत’, हिंदीत ‘लोकमत समाचार’ आणि इंग्रजीमध्ये ‘लोकमत टाइम्स’ अशा तीन भाषांमध्ये लोकमत आज प्रसिद्ध होतो. ‘लोकमत’ हे महाराष्ट्र व गोव्यातील सर्वाधिक खपाचं, पहिल्या क्रमाकांचे दैनिक आहे. दोन्ही राज्यांमधील 12 स्ट्रॅटेजिक लोकेशनवरील अद्ययावत छपाई  प्रकल्पात लोकमतच्या 53 आवृत्त्या प्रसिद्ध होतात.
  लोकमतने स्वत:ला फक्त प्रिंट मीडियापुरते सिमीत ठेवले नसून डिजिटलमध्येही लोकमत आघाडीवर आहे. टीव्हीच्याही अगोदर बातमी देण्याचा विक्रम ‘लोकमत डॉट कॉम’ www.lokmat.com ही आॅनलाईन आवृत्ती करत आहे. ज्यावेळी आपण गाढ झोपेत असतो, त्यावेळी अमेरिका, इंग्लंडसह जगातील मराठी वाचक लोकमत डॉट कॉम वर ताज्या बातम्या पाहात असतो. फेसबुकवर https://www.facebook.com/lokmat/  ‘लोकमत’चे 10 लाख फॉलोअर्स झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच लोकमतने हे डिजिटल शिखर सर केले आहे. 
  लोकमतच्या छपाईसाठी कागदाचे जे रिल्स आम्हाला लागतात, त्या कागदाच्या रिल्सची लांबी एकत्रित केल्यास दरवर्षी 20 लाख किलोमीटर लांब कागदाचा वापर लोकमतच्या छपाईसाठी होतो. आपण सर्वजण लोकमत परिवाराचे पाठिराखे आणि लोकमतच्या यशाचे साक्षीदार आहात, म्हणून हा सर्व आलेख आपणासमोर मांडणे मला महत्त्वाचे वाटते. आपल्याला कल्पना आहे की, शहरी भागाएवढेच लोकमत ग्रामीण भागातही लोकप्रिय आहे. 
  नेहमीप्रमाणे हे वर्षदेखील लोकमतसाठी खूप अभिमानाचे ठरले. लोकमत समूहाचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांना यावर्षी राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन पुरस्कृत केले आहे. अपर्णा वेलणकर यांच्या नेतृत्वाखालील रिपोर्टरच्या टीमने केलेल्या शोधपत्रकारितेबद्दल इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे  रामनाथ गोयनका पारितोषिकही लोकमतला मिळाले आहे. लोकमतच्या दीपोत्सवाला गेले 4 वर्षे सातत्याने देशातील पहिल्या क्रमाकांचे पारितोषिक मिळालेले आहे.
  मित्रहो, लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा आम्हाला नेहमी म्हणायचे. समाजात घडणा-या वाईट गोष्टींवर तुम्ही आसूड ओढा, जे वाईट घडतं त्याच्यावर तुम्ही टीका करा,  मात्र सर्वदूर फक्त अमंगलच आहे, सगळीकडे भ्रष्टाचारच आहे, अशा पद्धतीने तुम्ही नकारार्थी बातम्या देऊ नका. कारण असं केलं तर या समाजामधला पुरुषार्थ संपून जाईल. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम समाजात घडणा-या चांगल्या, सकारात्मक गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी होत आहे. कर्तृत्ववान लोकांना समाजापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम लोकमतच्या माध्यमातून आज येथे होतो आहे. कोणताही उद्योग, व्यवसाय, संस्था अचानक उभी राहात नाही. त्याच्यामागे अपार मेहनत, कल्पकता आणि संघर्ष असतो. अशाच संघर्षातून उभे राहिलेले अनेक आयकॉन्स याठिकाणी आहेत. त्यांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी ‘लोकमत’ने हा उपक्रम हाती घेतला आहे
  महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या आयकॉन्सना पुढे आणण्याचे काम आपण करत आहोत. याकरिता जिल्ह्याजिल्ह्यात कॉफीटेबल बूकचे प्रकाशन केले जात आहे. पुण्यामध्ये   बिझनेस आयकॉन्स समारंभाला आपले राष्ट्रपती महोदय उपस्थित होते. औरंगाबादमधील समारंभाला ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आले होते. लातूरला प्रसिद्ध उद्योगपती डी.एस. कुलकर्णी आवर्जून उपस्थित होते. नांदेडला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आले होते. 
  मित्रहो, आज येथे कायनेटिकचे अध्यक्ष अरुण फिरोदियाजी, विखे पाटीलजी आणि राम शिंदेजी आहेत, याचा मला मनस्वी आनंद होत आहे. कारण अहमदनगर हा कर्तृत्ववान व्यक्तींचा जिल्हा आहे. अहमदनगरला 500 हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी येथीलच भुईकोट किल्ल्यातून ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ लिहून भारताचा वेध घेतला होता. संत ज्ञानेश्वरांनी याच भूमीतून जगासाठी पसायदान मागितले. अहिल्यादेवी होळकर, सेनापती बापटांची ही भूमी. साईबाबांना साकडे घालण्यासाठी जगातील भाविकांची पावले शिर्डीकडे वळतात. आचार्य आंनदऋषीजी महाराज आणि इतर अनेक संतांच्या सहवासाने पावन झालेला हा जिल्हा आहे. स्वातंत्र्यसैनिक, कलावंत, साहित्यिक, असे अनेक कर्तबगार रत्न या जिल्ह्याने दिलेले आहे.  
  स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन बंधू, कवी रेव्हरंड टिळक, माजी संसदपटू मधू दंडवते, शाहू मोडक, राम नगरकर, सदाशिव अमरापूरकर, पद्मभूषण बाळासाहेब भारदे, साहित्यिक दया पवार, शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती केलेले डॉ. भा. पा. हिवाळे, नवनीतभाई बार्शीकर, प्राध्यापक  एसएमआय असीर सर या सर्व मान्यवरांची आज येथे आठवण होते. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नगरचा वाटा आहे. या जिल्ह्यातील श्रीरामपुरातून जहीर खान आणि संगमनेरमधून अजिंक्य राहणे हे भारतीय क्रिकेट संघात खेळत आहेत. अशा रीतीने प्रत्येक क्षेत्रात नगर जिल्हा पुढे आहे.  
  पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांनी प्रवरानगरच्या माळरानावर सहकारी साखर कारखाना काढून सहकारक्षेत्राचे बिजारोपण केले. मोतीलालजी फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब विखे, बाळासाहेब तनपुरे, शंकरराव काळे, मारुतराव घुले, शंकरराव कोल्हे या लोकनायकांनीही सहकाराच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासाला धार दिलेली आहे. दादासाहेब रुपवते, बाबुराव भारस्कर असे नेतेही या जिल्ह्याने दिले. माजी उपमुख्यमंत्री रामरावजी आदिक हे सुद्धा याच जिल्ह्यातले. विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभपतिपद या जिल्ह्याने तीनदा भूषविले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई विधानसभेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान याच जिल्ह्यातील भाऊसाहेब फिरोदियाजी यांना मिळाला. त्यांच्यानंतर बाळासाहेब भारदे हे विधानसभेचे अध्यक्ष होते. ना.स. फरांदे सर हे विधान परिषदेचे सभापती झाले.  हा जिल्हा एकेकाळी डाव्या चळवळीचा बालेकिल्ला देखील राहिला आहे. आजही अण्णा हजारेजी आणि पोपटराव पवार हे मान्यवर ग्रामविकासात व विविध सामाजिक सुधारणांत देशपातळीवर नेतृत्व करताहेत. 
  कृषी, सहकार यासोबत इतरही उद्योगांत या जिल्ह्याची मोठी भागीदारी आहे. कायनेटिक आणि व्हिडीओकॉन या उद्योग समूहांची ही पंढरी आहे. हे दोन उद्योग याच मातीतून बहरले. नंदलालजी धूत तसेच नवलमलजी फिरोदिया आणि हस्तीमलजी फिरोदिया यांच्या उल्लेखाशिवाय नगरचा औद्योगिक इतिहास पूर्ण होणार नाही. आधुनिक जगाचा वेध या दोन्ही परिवारांनी घेतला. कायनेटिक व व्हिडीओकॉनने इथल्या औद्योगिक क्षेत्राला चालना दिली आणि नगरची वेगळी ओळख जागतिक पातळीवर पोहोचवली. 
  नगरची ही सगळी गौरवशाली परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आता नवीन पिढीवर आहे. या जिल्ह्याची शिक्षण, उद्योग, बांधकाम, आरोग्य अशा विविध क्षेत्रातले आयकॉन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. मी येथे एकच छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. जग खूप गतीने बदलत आहे. त्यामुळे काळाबरोबर धावण्यात आपण मागे राहिलो तर आजचा उत्तम व्यवसाय देखील मागे पडू शकतो, याची जाणिवसुद्धा ठेवणे आवश्यक आहे. फोटो फिल्ममध्ये कोडॅक ही 1998 साली सर्वांत मोठी कंपनी होती. 92 टक्के शेअर त्यावर्षी या कंपनीकडे होते. पण आज ही कंपनी दिसत नाही. नोकियाने मोबाईल क्षेत्रात क्रांती घडविली. पण आज ही कंपनीसुद्धा दिसत नाही. 
  कल्पकतेमुळे व्यवसायात उंच भरारी घेणे आज सहज शक्य आहे. उबरकडे स्वत:ची एकही टॅक्सी नाही, पण हाच उबर जगातला सर्वांत मोठा टॅक्सी आॅपरेटर आहे. एअर बी अँड बी अर्थात ब्रेड अँड ब्रेकफास्ट या कंपनीकडे हॉटेलमधलं एकही रूम नाही, पण हॉटेलमधल्या सर्वांत जास्त रूम विकणारी ही सर्वांत मोठी कंपनी आहे. लोकमतमध्ये दररोज या गोष्टींवर आम्ही चर्चा करतो. आता काळ बदलला आहे. तू माझा शत्रू आहे, मी तुझा स्पर्धक आहे असे म्हणण्याचा काळ आता राहिलेला नाही. आता वेळ आलेली आहे. लोकमतमध्ये जर अधिक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असेल, कामगारांची शक्ती उपलब्ध असेल तर ती मी कुणाला तरी उपलब्ध करून द्यायला हवी. एखाद्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध असेल तर मी स्वत:साठी त्याचा वापर करून घ्यायला पाहिजे. असे करणे अतिशय आवश्यक आहे. मला कल्पना आहे, येथे अनेक कर्तृत्ववान मंडळी आहे. आपण सर्वांनी याकडे लक्ष द्यावे. 
  अहमदनगर हा प्रगतशील जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या वाटचालीत लोकमत सतत तुमच्यासोबत होता, आहे आणि यापुढेही राहील, असे अभिवचन मी या ठिकाणी देतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले विखे पाटीलजी आणि प्रा. राम शिंदेजी या जिल्ह्याचे नेतृत्व करताहेत. उद्योग व व्यवसाय वाढीसाठी तेही आपणासोबत आहेत व राहतील. येथील उद्योजकांचे विविध प्रश्न आहेत. ते या दोघांच्याही माध्यमातून सरकार दरबारी सोडवले जातील, अशी मी आशा करतो. 
  या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या हस्ते आज येथे कर्तृत्ववान व्यक्तींचे सत्कार होणार आहेत ते अरुण फिरोदियाजी वेळात वेळ काढून पुण्याहून या ठिकाणी आलेत, राधाकृष्ण विखे पाटीलजी यांचा कळवणला कार्यक्रम होता, प्रा. राम शिंदे यांचा इतरत्र कार्यक्रम होता, त्यांनी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवून लोकमतच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेत, कार्यक्रमाची शोभा वाढविली. याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.  आपण सर्व मंडळी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहात, याबाबत मी मनापासून आभार व्यक्त करतो. 

  जय हिंद, जय महाराष्ट्र !

 • नांदेड आयकॉन्स कॉफीटेबल बूकचे थाटात प्रकाशन
  तारीख : 26 मार्च  2016 
  ठिकाण : नांदेड
  कार्यक्रम : आयकॉन्स आॅफ नांदेड कॉफीटेबल बूकचे प्रकाशन

  लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांचे
  आयकॉन्स आॅफ नांदेड कॉफीटेबल बूक प्रकाशन समारंभातील भाषण


  लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित 'आयकॉन्स आॅफ नांदेड' या देखण्या सोहळ्याचे मुख्य अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोकराव चव्हाण, प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर, या ठिकाणी उपस्थित खासदार राजीव सातव, महापौर श्रीमती स्वामी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, माझे जुने सहकारी आमदार डी.पी. सावंत, अमर राजूरकरजी, आपल्या विभागाचे पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, या सोहळ्यास आवर्जून उपस्थित असलेले लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि आपण सर्व गौरवमूर्ती, शहरातील मान्यवर नागरिक आणि उपस्थित मित्रहो.
  वृत्तपत्राचे काम हे केवळ बातम्या देणे आणि मनोरंजन करण्यापुरते मर्यादित आहे, हे लोकमतला मुळीच  मान्य नाही. समाजातील विविध कर्तृत्ववान व्यक्तिंची ओळख समाजापर्यंत पोहोचविली पाहिजे, यावर लोकमत सातत्याने काम करत आहे. 
  लोकमत हे भारतातील एक अग्रेसर माध्यम समूह आहे. ब्रिटिशांची सत्ता असताना स्वातंत्र्य संग्राम सैनिक जवाहरलालजी दर्डा बाबूजी यांनी साप्ताहिक लोकमत यवतमाळात सुरू केले. पुढे नागपूरला १९७१ साली हे दैनिक स्वरुपात प्रकाशित होऊ लागले. १९७१ मध्ये एका आवृत्तीने, एका एडिशनने सुरु केलेल्या या दैनिकानं आज विविध भाषांमध्ये बहुआयामी माध्यमांचे स्वरुप धारण केलेलं आहे.
  मराठीत लोकमत, हिंदीमध्ये लोकमत समाचार आणि इंग्रजीमध्ये लोकमत टाइम्स अशा तीन भाषांमध्ये लोकमत समूहाची वर्तमानपत्रे आहेत. भाषक वृत्तपत्रांमध्ये सर्वाधिक वाचकसंख्या लाभलेलं लोकमत हे महाराष्ट्र व गोव्यातील पहिल्या क्रमाकांचे दैनिक आहे. लोकमतच्या एकूण ५३ आवृत्त्या निघत आहेत. यासाठी दोन्ही राज्यांमध्ये लोकमतचे १२ अद्ययावत छपाई प्रकल्प आहेत. डिजिटलमध्येही लोकमत आघाडीवर आहे. टीव्हीपेक्षाही आधी बातमी जगापर्यंत पोहचविण्याचं विक्रम लोकमत डॉट कॉम ही आॅनलाईन आवृत्ती करत आहे. या आॅनलाईन एडिशनचे काम अतिशय वेगाने वाढत आहे.
  तुमच्याकडे येत असलेला अंक कधी १६ पानांचा असतो, कधी २० पानांचा तर कधी २४ पानांचा असतो.  या पानांचा विचार केला तर एका महिन्यात दैनिक लोकमतच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये १२० कोटी पानांची छपाई होते. दर महिन्याला लोकमतच्या छपाईसाठी जे रिल्स आम्हाला लागतात, त्या रिल्स एकत्रित केल्या तर  त्याची एकूण लांबी दर महिन्याला १ लाख ६३ हजार ८०० किलोमीटर एवढी होते. याकरिता दरवर्षी १९ लाख ५० हजार किलोमीटर लांब कागदाचा वापर लोकमतच्या छपाईसाठी होतो.
  लोकमतचा आपण जर अभ्यास केला तर लक्षात येईल की, शहरी भागाएवढेच महत्त्व ग्रामीण बातम्यांनासुद्धा दिलं जातं. लोकमतमधून केवळ जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्याच मांडल्या जात नाहीत. तर शासनाकडे सतत पाठपुरावा करून त्या समस्यांचे निराकरण केले जाते. 
  लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा आम्हाला नेहमी म्हणायचे. समाजात घडणा-या वाईट गोष्टींवर आसूड ओढा, मात्र सर्वदूर फक्त अमंगलच आहे, सगळीकडे सर्व भ्रष्टच आहे, अशा पद्धतीने तुम्ही नकारार्थी बातम्या देऊ नका. कारण असं केलं तर या समाजामधला पुरुषार्थ संपून जाईल. म्हणूनच समाजात घडणा-या चांगल्या, सकारात्मक गोष्टींना प्रोत्साहन देण्याचे काम लोकमत करत आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचा हा समारंभ होय. समाजातील कर्तृत्ववान लोकांना समाजापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम लोकमतच्या माध्यमातून आज येथे होतो आहे. 
  महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या आयकॉन्सच्या कार्याचा वेध लोकमत घेत आहे. राज्यातील विविध भागात लोकमतने यापूर्वी कॉफीटेबल बूकचे प्रकाशन केले आहे. पुण्यामध्ये जेव्हा बिझनेस आयकॉन्स झालं, त्यावेळी आपल्या देशाचे राष्ट्रपती महोदय उपस्थित होते. औरंगाबादमधील आयकॉन्सच्या समारंभाला ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आले होते. लातूरला प्रसिद्ध उद्योगपती डी.एस. कुलकर्णी आवर्जून उपस्थित होते. आज येथे, ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये फारमोठा हातभार लावला, ते खासदार अशोकराव चव्हाण प्रमुख अतिथी आहेत, याचा मला आनंद होतो आहे.
  मराठवाडा ही जशी संतांची भूमी आहे, तशीच कर्तृत्ववान लोकांचे आगरसुद्धा आहे. हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून नांदेड, परभणी, हिंगोली या भागातील बिझनेस आयकॉन्सचा लेखाजोखा मांडणा-या कॉफीटेबल बुकचे आज प्रकाशन झाले आहे़. शिक्षण, उद्योग, बांधकाम, आरोग्य अशा विविध क्षेत्रात भरारी घेतलेल्या अनेक नामांकित गौरवमूर्ती येथे उपस्थित आहेत़ मराठवाडा ही तुमच्यासारख्या गुणवंतांची खाण आहे़ वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत निकालाचा उच्चांक गाठणारे शिक्षक इथे   आहेत़ या शिक्षकांमुळेच आयआयटीला जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे़. अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा राखत अभ्यासक्रम उत्कृष्टपणे राबविणा-या संस्था इथे आहेत़ बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारी राज्यात आघाडीवर जी नावे आहेत, त्यातील अनेक लोक नांदेडचे आहेत. पारंपरिक वाटा धुडकावून वेगळ्या क्षेत्रात प्रवेश करणारे अनेक उद्यमशील उद्योजक नांदेडमधील आहेत़. सेवाक्षेत्रामध्ये राज्यातील टॉप टेनमध्ये ज्यांचा उल्लेख करावा लागेल, असे उद्योजक नांदेड, परभणी, हिंगोलीने दिले आहेत़ 
  या उज्ज्वल परंपरेचे बीजारोपण इतिहासातच सापडेल़ प्रसिद्ध मराठी कवी वामन पंडित हे याच जिल्ह्यातले. इतिहासात 'संस्कृत कवींचा जिल्हा' म्हणून प्रसिद्ध आहे. शीख बांधवांचे दहावे गुरू श्री गुरुगोविंदसिंघ जी यांच्यामुळे नांदेडचा लौकिक जगभरात पसरला आहे.
  आज मला येथे स्वर्गवासी शंकरराव चव्हाण साहेब यांची आठवण होत आहे. त्यांनी नेहमीच विकासाचे राजकारण केले़ त्यांनी हैदराबाद मुक्ति संग्रामामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबर काम केले़ ते स्वामीजींच्या हैदराबाद स्टेट काँग्रेसचे सचिव होते़ दोनवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. देशाचे गृहमंत्री, संरक्षणमंत्री झाले. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा त्यांनी महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या विकासाकरिता केला. मराठवाड्यातील जायकवाडी, विष्णूपुरी, इसापूर धरण याशिवाय भीमा व पैनगंगा नदीवरील इतर धरणांची योजना त्यांचीच़ याबद्दल आम्हा सगळ्यांना त्यांचा खूप अभिमान वाटतो.
  विकासाच्या या परंपरेतील खा़ अशोकराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विकासाची  निर्णय प्रक्रिया अतिशय गतिमान केली. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये या राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. राज्याला स्वतंत्र मराठी भाषा विभाग देण्याचं काम त्यांनी केले. स्वतंत्र असं  सांस्कृतिक धोरण दिलं, नवीन औद्योगिक धोरण त्यांच्याच काळात राज्याला मिळाले. गुरू-त्ता-गद्दीच्या काळात या शहराचा चेहरा बदलण्याचे काम त्यांनी केले. अशोकरावजी, भविष्यातही आपल्याकडून लोकांच्या खूप खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा अशोकराव यांच्या दूरदृष्टीतून नक्कीच पूर्ण होतील, हे मी येथे नमूद करू इच्छितो.
  मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रात फार मोठे बदल झाले आहे. कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर मंचावर उपस्थित आहेत़, त्यांचा उल्लेख मला येथे केला पाहिजे. एक निष्णात वैज्ञानिक असलेले कुलगुरू या विद्यापीठाला लाभले आहेत़. मागास भागांच्या विकासाचा विचार करताना शिक्षण ही प्राथमिकता दिली पाहिजे, असे मला वाटते़ समाजाची ही गरज परिपूर्ण करण्याचे काम समोर उपस्थित आयकॉन्स करतील, याविषयी माझ्या मनात मुळीच शंका नाही. प्रगतीचे दरवाजे खुले करायचे असतील तर इन्फ्रास्ट्रक्चरकडे लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी दर्जेदार काम करणारे बांधकाम व्यावसायिक, तंत्रज्ञ समाजाला हवे असतात़ सार्वजनिक आरोग्य सुदृढ असणे हाही एक पैलू आहे़. शेवटी मी एकच म्हणेन की, आपला भारत हा तरूणांना देश आहे. या ठिकाणी 63 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षाच्या खालची आहे. त्यामुळे आपला देश सुपरपॉवर होऊ शकतो. कारण या ठिकाणचा माणूस खरोखरच मेहनी आहे, खूप कल्पक आहे. 
  आज या ठिकाणी उपस्थित सर्व कर्तृत्ववान व्यक्तींना माझे कळकळीचे आवाहन आहे. आपल्या देशात अनेक संशोधनं झाली आहेत, धवल क्रांती झाली, हरित क्रांती झाली, अनेक संशोधक या देशाला मिळाले. पण या संशोधनाचा उपयोग सामान्य माणसाचं जीवन अधिक आनंददायी, सुकर करण्यासाठी होणे अत्यंत आवश्यक आहे. आजही, खारट पाणी, दूषित पाण्याला स्वस्तात शुद्ध कसं करायचं हा प्रश्न आहे.आजही मलेरिया किंवा डेंग्यू पसरवणा-या डासांचे निर्मूलन कसे करायचे याचा मार्ग अद्यापि सापडलेला नाही. अजूनही हातात बॅट घेऊन डास मारायला सुरुवात केली जाते. यासारख्या समस्यांवर आपल्याला मात करावी लागणार आहे. त्यामुळे आजवर झालेल्या संशोधनाचा उपयोग सामान्य जनतेचं जीवन सुकर करण्यासाठी आपल्यासारखे आयकॉन्स करतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. 
  मराठवाडा सध्या दुष्काळाशी लढत आहे. २०१२ पासून सातत्याने तीन दुष्काळाला आम्ही तोंड दिले आहे. आजही सामान्य माणूस दुष्काळाशी सामना करतो आहे. या लढाईत लोकमत पूर्ण ताकदिनीशी  आपल्यासोबत राहील, असं अभिवचन मी या ठिकाणी देत आहे. 
  या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या हस्ते आज येथे कर्तृत्ववान व्यक्तींचे सत्कार होणार आहे, ते अशोकरावजी चव्हाण, कुलगुरू डॉ़पंडित विद्यासागर, आपण सर्व उपस्थित मंडळी, आपण सर्वांनी भरपूर वेळ या कार्यक्रमासाठी देत आहात, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. 
  जय हिंद, जय महाराष्ट्र 


 • सोलापूर डब्ल्यूआयटीमधील सत्कार समारंभातील भाषण
  तारीख :  8 मार्च 2016
  ठिकाण :  सोलापूर 
  कार्यक्रम :  वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये सत्कार समारंभ  

  लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांचे
  सोलापूर डब्ल्यूआयटीमधील सत्कार समारंभातील भाषण 

  वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष शेठ अरविंद दोशीची, मानद सचिव डॉ. रणजितजी गांधी, या संस्थेचे सर्व ट्रस्टी आणि मित्रांनो. खरं म्हणजे ही जैन मायनॉरिटी संस्था असल्यामुळे सुरुवातीलाच मी म्हणेन, 

  दिल मे धडकन है,
  काया मे कंपन है,
  वाणी में गुंजन है,
  भगवान महावीर के चरणों मे शत-शत वंदन है

  या ज्ञानतीर्थावर उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार,
  ज्ञान घेण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी आणि आपल्याजवळ असलेले ज्ञान दुस-याला देण्यासाठी उत्सुक असलेला प्राध्यापकवर्ग. आपल्यामुळे एका तीर्थक्षेत्राचं, मंगल पावन मंदिराचं रुप या संस्थेला प्राप्त झालं आहे. आपल्या सगळ्यांच्या दर्शनाने, भेटीने मला निश्चितच हत्तीचं बळ मिळालेलं आहे आणि काही काळ का असेना चैतन्याचा संचार माझ्या अंगात संचारलयं.
  अरविंद दोशीजी, खरं म्हणजे मी आज येथील सोलापुरातील वेगवेगळे कार्यक्रम आणि संस्थेने ठेवलेल्या विविध बैठकांमुळे येथे येऊ शकेल की नाही, असे मला वाटत होते. या संस्थेबद्दल इतके ऐकले आले की, सत्कार स्वीकारण्याऐवजी फक्त येथे यावे, अरविंद शेठजींना आणि डॉ. गांधीजी यांना पुष्पगुच्छ देऊन चांगल्या कामाबद्दल सत्कार करावा, म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. पण आपण या ठिकाणी माझा सत्कार केला, आपल्या सर्वांपुढे मनोगत व्यक्त करण्याची मला संधी दिली.
  मित्रहो, खरं म्हणजे 132 वर्षांपूर्वी 1885 साली शेठ हिरांचदजी यांनी या ट्रस्टची श्री ऐल्लक दिगंबर जैन पाठशालेची (एस. ए. पी. डी. जे. पाठशाला) स्थापना केली, त्यानंतर वेगवेगळ्या कर्तृत्ववान लोकांनी या संस्थेला वाढविले, चांगली देखभाली केली, या संस्थेची भरभराट केली आणि भरीव योगदान दिले. मला सांगण्यात आले आहे की, फक्त एका संस्कृत पाठशाळेपासून या संस्थेची सुरुवात झाली होती. 1940 मध्ये समंतभद्र महाराजांच्या प्रेरणेने या ठिकाणी जैन गुरुकूलचा विकास झाला. सुरुवातीला फक्त प्राथमिक शिक्षण देणा-या या संस्थेने ज्यावेळी आपल्या 75 व्या वर्षांत पदार्पण केले, त्यावेळी 1962 मध्ये वालचंद कॉलेज आॅफ आर्टस् अ‍ॅण्ड सायन्सची स्थापना केली. नंतर चांगले शिक्षक मिळावेत म्हणून 1970 मध्ये येथे बी.एड. कॉलेज सुरू केले. महाराष्ट्रातलं पहिलं एम.एस.डब्ल्यू कॉलेज या संस्थेने सुरु केले. महाराष्ट्रात वसंतदादांनी मेडिकल व इंजिनियरिंगमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून विनाअनुदान धोरण आणले, त्यावेळी 1983 साली या संस्थेने विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. ज्याला आज वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलजी (डब्ल्यू.आय.टी.) म्हणून संबोधले जाते. या महाविद्यालयाची किर्ती सातासमुद्रापलिकडे जाऊन पोहोचली आहे. या सर्व कामगिरीबद्दल संस्थेच्या विश्वस्तांचं मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो.  
  मी या राज्याचा पूर्णवेळ शिक्षणमंत्री होतो. पूर्णवेळ उल्लेख करण्याचे कारण म्हणजे आज फक्त शिक्षणमंत्री व्हायला कुणी तयार होत नाही. कारण त्यांना शिक्षणसंस्था, प्राध्यापक अनेकांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे कुणी पूर्णवेळ शिक्षणमंत्री होतच नाही. पण सुदैवाने या राज्याचा 4 वर्षेपर्यंत मी पूर्णवेळ शिक्षणमंत्री होतो. त्यावेळी मला एकच गोष्ट जाणवायची, ज्याला आपण शिक्षण म्हणतो आणि आमच्या पूर्वजांनी व जुन्या लोकांनी ज्या शिक्षणसंस्था सुरू केल्या, त्या ख-या अर्थाने ज्ञान देण्यासाठी सुरु केल्या. पण त्याचे रुपांतर पुढे वेगळ्या गोष्टींमध्ये झाले, त्याठिकाणी पैसा पुढे आला. त्यामुळे येथे येत असताना मी चौकशी केली, आपण अ‍ॅडमिशनसाठी देणगी घेता का, त्यावेळी मला सांगण्यात आले की, येथे देणगी घेतली जात नाही. त्याबद्दलसुद्धा आपले मनापासून मी अभिनंदन करतो. 
  आज या ठिकाणी डाव्या बाजूकडे पाहतो तर महिलांची, मुलींची संख्या फार मोठी आहे. योगायोगाने आज जागतिक महिला दिन आहे. या जागतिक दिनानिमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. मित्रहो ही संस्था खरोखरच खूप चांगली आहे. या ठिकाणी शिक्षणमंत्री म्हणून माझा उल्लेख करण्यात आला. मला एक गोष्ट आठवते, ज्यावेळी मी पाहात होतो की, महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याचा बजेट किती असेल,  प्राथमिक शिक्षणाचा बजेट 35 हजार कोटी रुपयांचा आहे. 2 कोटी 18 लक्ष विद्यार्थी शिक्षण घेतात, 5 लाख 76 हजार शिक्षक आहेत. 1 लाख 3 हजार शाळा. एवढा मोठा आमचा संसार होता. मला एकच वाटायचं, एवढ्या शाळा आहेत, मुलं आहेत, एकदा तपासावं की खरंच एवढी मुलं शाळांमध्ये शिकतात का. त्यासाठी तुम्हाला आठवत असेल, माझ्या काळात त्यावेळी पटपडताळणी मोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी टाइम्स आॅफ इंडियाने देखील माझ्यावर चांगला अग्रलेख लिहिला. पटपडताळणीमध्ये मी एकच गोष्ट केली, जर आपण राज्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं बजेट देतो, तर आपण पाहिले पाहिजे की सर्व शाळांमध्ये विद्यार्थी असतात का. त्यासाठी एकाचवेळी तीन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात या 1 लाख 3 हजार शाळांचा मी सर्व्हे केला. त्यावेळी काही गोष्टी लक्षात आल्या. नंदूरबारमधील शाळांमध्ये सुरतवरून विद्यार्थी आणण्याचे काम होत असल्याचे तपासणी पथकाला आढळून आले. शिरपूरच्या शाळेत बाजूच्या मध्य प्रदेशातून विद्यार्थी आणण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यात आम्ही बघत होतो, शेजारच्या आंध्र प्रदेशातून ट्रक भरून विद्यार्थी आणले जात होते. पण हे सर्व करताना एक गोष्ट मात्र त्यांच्या लक्षात आली नाही. सकाळच्या   शिफ्टमध्ये उपस्थित विद्यार्थ्याच्या बोटावर आम्ही शाई लावली  होती. तेच विद्यार्थी दुपारच्या वर्गातही आढळून आले. त्यांना विचारले तर विद्यार्थी म्हणाले की, आमच्या शिक्षकांनीच आम्हाला सांगितले की तुम्ही शाळेतून जाऊ नका म्हणून. त्या मोहिमेमुळे दरवर्षी 1 हजार कोटी रुपयांचा फायदा महाराष्ट्राला झाला, तो फायदा आजही चालू आहे. 
  मित्रहो, शिक्षण हे काही फक्त माहितीचा खजिना नाही. केवळ त्यासाठी शिक्षण दिले जात नाही. शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्य निर्माण झाले पाहिजे. चारित्र्य बाजारात मिळत नाही, ते संस्कारातूनच मिळतात. या संस्थेमध्ये चारित्र्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे, या मला निश्चित आनंद आहे. आज आपण पाहतो की, आपला भारत देश, हिंदुस्तान हा तरूणांना देश आहे. या ठिकाणी 67 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षाच्या खालची आहे. त्यामुळेच 

  The world looks at India as a future superpower. On his visit to India, President Obama of the United States of America lauded India as a superpower. 

  आणि सुपरपॉवर जे होऊ शकते, ते याचमुळे की या ठिकाणचा जो माणूस आहे तो खरा म्हणजे हुशार आहे. म्हणूनच आपला देश सुपरपॉवर होऊ शकतो. 

  The 21st century is the Century of Knowledge, is the century of Science and Technology. 

  आणि त्यामुळे आपल्याला याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. येथे विद्यार्थी आणि पालकांना मी विनंती करेन की कुठे तरी आता मिशन मोड मध्ये येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यांनी आता निश्चितपणे मिशन मोडमध्ये यावे. 
  आज एका गोष्टीचं मला आनंद होतोय. एका ठिकाणी आज सकाळी मी गेलो होतो. त्या ठिकाणी एक मुलगा माझ्याशी इंग्रजीमध्ये बोलत होता. त्यावेळी मला सांगण्यात आलं की, केजीपासून तर आता तो ग्रज्युएट करतो आहे, त्याचे संपूर्ण शिक्षण इंग्रजीमध्ये झालं आहे. मी त्याला म्हटलं, मी तर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून आलो आहे, माझं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं आणि मला त्याचा अभिमान आहे. मला घडविलेल्या शिक्षकांचं मला अभिमान आहे. माझ्या वडिलांना माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, ते पूर्णवेळ राजकारणात होते, स्वातंत्र्य सैनिक होते, माझी आई ती शिकलेली नव्हती. माझ्या शिक्षकांनी मला घडवलं. म्हणूनच मी मुंबईच्या जेजे स्कूलमध्ये गेलो, तेथे मेरिटमध्ये आलो, म्हणून लंडनमध्ये जाऊन स्कॉलरशिप घेतली. तिथे पडेल ते काम केले, घरचा एकही पैसा न घेता माझं पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा मी केलं. हे सर्व मला घडविलेल्या शिक्षकांमुळेच झाले. त्यामुळेच येथे मी शिक्षकांना विनंती करणार आहे, 

  That every teacher should make all efforts to bring out the potentials that lies hidden in student.  

  आणि हेच अत्यंत महत्त्वाचे आहे. परवा एपीजे अब्दुल कलाम साहेबांची आॅटोबायोग्राफी वाचत होतो, सातव्यांदा, आठव्यांदा वाचत होतो. कुठे थोडासा थकवा आला, काही वाटलं की मी ती वाचायला सुरुवात करतो. त्याच्यात त्यांनी उल्लेख करताना ज्यांनी त्यांना घडवलं, मग ते रामेश्वरम मध्ये घडवलं, रामनाथपुरम मध्ये घडवलं असेल, कुठेही घडवलं असेल, त्या सर्व शिक्षकांचा त्यांनी मोठ्या अभिमानाने उल्लेख केला आहे. दोशी साहेब, एका गोष्टीचा येथे मला उल्लेख करायला पाहिजे, येथे फार कमी लोकांना माहीत आहे की, आपले माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेब एमआयटीच्या बाहेर पडले ते हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये गेले. पहिला मॉडेल हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये त्यांनी तयार केला. या हिंदुस्तान एरोनॉटिक्सची स्थापना दोशी परिवारातल्या वालचंद शेठ यांनी केली होती, याचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. आज आपण खरोखरच भाग्यवान आहात, दोशी घराणं आणि त्यात वालचंद शेठ यांचा उल्लेख. त्याकाळात प्रवासाची तीन साधनं होती. रस्ता, हवा आणि पाणी. रस्त्यावर चालण्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये प्रिमियर मोटारची स्थापना केली. त्यावेळी फियाट असायची. जहाजातील प्रवासाकरिता त्यांनी हिंदुस्तान शिपिंग ही संस्था विशाखापट्टणम येथे उभी केली आणि विमान प्रवासाकरिता त्यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्सची स्थापना केली. अशा नामवंत घराण्याची व्यक्ती येथे अध्यक्ष आहे, याचा मला खूप अभिमान आहे. 
  1970 मध्ये श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या कुशल नेतृत्वामुळे संस्थेला कलाटणी मिळाली. एका बाजूला मानद सचिव भाऊसाहेब गांधी आणि दुस-या बाजूला अध्यक्ष शेठ लालचंद हिराचंद या दोघांनी या संस्थेला खूप उंचीवर नेले. आज 132 वर्षानंतर सुध्दा तीच परंपरा सुरू आहे. आपल्याकडे प्रायमरी ते पीजी आहे. आज आपल्या संस्थेची लायब्ररी पाहून आनंद झाला. विद्यार्थी असताना लायब्ररीचा मी खूप वापर केला आहे. 1972 मध्ये मी लंडनमध्ये शिकत असताना आम्हाला दर महिन्याला एक कोर्सवर्क करावा लागत होता. त्यासाठी विषय मिळाल्यावर आम्ही सर्व विद्यार्थी धावत होतो लायब्ररीकडे. त्यावेळी एका एका विद्यार्थ्याला 3 पुस्तकं मिळायची. माझ्याबरोबर माझ्या वर्गात तीन चायनीज मुलं होती, हाँगकाँग किंवा त्या भागातून आलेली आणि मी एकटा भारतीय. ते तिघेही लायब्ररीत जाऊन पटकन 9 पुस्तकं आणायचे. भारतीयाला कॉर्नर करायचा तो सगळा प्रयत्न होता. पण त्यांना आपण पुरून उरलो. तेव्हा मला असं वाटायचं ही पुस्तक डिजिटाईज असती किंवा आॅनलाईन उपलब्ध झाली तर काय होईल. मला या गोष्टीचं आनंद आहे की, तुमची संपूर्ण लायब्ररी आधुनिक आहे. ठिकठिकाणी टर्मिनल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे या सुसज्ज अत्याधुनिक लायब्ररीचा उल्लेख मी येथे करतो आहे. 
  शेवटी सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन की, शिक्षण घ्या, मोठे व्हा, पण आपल्यातील जिज्ञासू वृत्तीचा पूर्ण वापर करावा. आपल्यातील कुतुहलाला मरू देऊ नका. कुतुहलाचा वापर करा. आपल्या निरीक्षण शक्तीचा पॉवर आॅफ आॅब्जरवेशनचा पूर्ण वापर करा. आपल्यातील जिज्ञासा, कुतुहल आणि निरीक्षण शक्ती या गोष्टींचा पुरेपूर वापर केला तर आपल्या भारताला कुणीही मागे टाकू शकत नाही. कारण संशोधनं खूप झाली आहेत, धवल क्रांती झाली, हरित क्रांती झाली, अनेक संशोधक या देशाला मिळाले. पण अजूनही छोट्या छोट्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. खा-या आणि दूषित पाण्याला स्वस्तात शुद्ध कसं करायचं हा प्रश्न आहे. माझ्याकडे औरंगाबादला मलेरिया, डेंग्यु आहे. त्यासाठी कारणीभूत डासांचे निर्मूलन कसे करायचे याचा मार्ग अद्यापि सापडलेला नाही. हातात बॅट घेऊन डास मारायला सुरुवात केली जाते. त्या डासांशी आम्ही अद्याप सामना करू शकत नाही, हे सत्य आहे. सौर ऊर्जा स्वस्तात घरोघरी कसं पोहोचवू यावर छोटे छोटे प्रयोग आपल्या सगळ्यांना करावे लागणार आहे. 
  शेवटी एकच आहे. हिंदीमध्ये मी भाषणाचा शेवट करू इच्छितो. 

  मंदिर तो हमने बहुत बना दिये, लेकिन धर्म से हम बहोत दूर चले गये, 
  विज्ञान ने तो बहुत तरक्की कर ली, लेकिन ज्ञान से हम बहोत दूर चले गये.
  विदेश तो हमारे बहुत करीब आ गया, पर आसपास का पडोसी बहोत दूर चला गया
  इसलिए जरूरी है की, आजकी शिक्षा पद्धती इस तरह की हो की, युवा पिढी वासना को छोडकर उपासना की ओर कदम पढाये. भोग को छोडकर योग की तरफ कदम बढाये.
  आओ दोस्तो हम ऐसा दीप प्रज्वलित करे की भौतिकता के अंधेरे को मिटाकर पुरी युवा पिढी को ज्ञान का प्रकाश दे. इन्ही शब्दों के साथ मै आपला शुक्रिया अदा करता हू. 

  धन्यवाद. जयहिंद. जय महाराष्ट्र. • पुण्यात आयोजित शिक्षण संवाद कार्यक्रमात केलेले भाषण
  तारीख: 20 फेब्रुवारी 2016
  ठिकाण: पुणे
  कार्यक्रम : शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा शिक्षण संवाद कार्यक्रम 

  लोकमतचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी
  शिक्षण संवाद कार्यक्रमात केलेले भाषण

  लोकमत समूहातर्फे आज येथे पुण्यात आयोजित या शिक्षण संवाद कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले महाराष्ट्राचे शालेय, उच्च, तंत्र व वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि माझे मित्र ना. विनोदजी तावडे यांचे लोकमत परिवारातर्फे सर्वप्रथम मी स्वागत करतो. आज महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे अनेक शिक्षण तज्ज्ञ या ठिकाणी आले आहेत, त्यांचेही मी स्वागत करतो. येथे उपस्थित डॉ. अजिंक्यजी पाटील, लोकमत समूहाचे चेअरमन खासदार विजयबाबू दर्डा आणि इतर सर्व, आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. 
  महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल या महत्त्वाच्या मुद्यांवर या ठिकाणी गेले एक तास विचारमंथन झाले. विनोदजी, आता आपल्यासाठी आम्ही या संवादातील  शिक्षण अमृत मंथन एवढा भाग ठेवलेला आहे. फारसं वेळ न घेता, मी एवढंच म्हणेन, ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत अनेक प्रश्न आहेत. याठिकाणी अनेकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. अनेक चांगल्या सूचना केल्यात. महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून शिक्षणमंत्री विनोदजी या सूचनांचा नक्कीच आदर करतील, त्यावर नवीन माहिती आपल्याला देतील. 
  केंद्र सरकारने १ एप्रिल २०१० पासून राइट टू एज्युकेशन अर्थात शिक्षण हक्क कायदा आणला. त्यानुसार, ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं काम सुरू झाले आहे. सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हे या ठिकाणी अभिप्रेत आहे. प्रश्न एकच आहे, एका बाजूला नगरपालिका व महानगरपालिका यांच्या शाळा ओस पडत असताना जिल्हा परिषदेच्या काही अशाही शाळा आहेत, ज्या बीड जिल्ह्यातील आडवळणाच्या गावांमध्ये आाहेत, त्या रविवारीसुद्धा सुरू असतात. याही गोष्टीचा कुठे तरी निश्चितपणे विचार करायला पाहिजे. येथे ग्रामीण भागातून सुद्धा अनेक मंडळी आली आहेत. नक्षलप्रभावीत भागातून वासाडे जी येथे आले आहेत. अनेक नवनवीन प्रयोग त्या भागात होत आहेत. या सर्व प्रयोगांचा आदानप्रदान होणे फार आवश्यक आहे.
  मित्रहो, महाराष्ट्रात आज फक्त पहिली ते बारावी एवढ्याच इयत्तांचा विचार केल्यास, १ लाख ३ हजार शाळा आहेत. यात जवळपास २ कोटी १७ लाख विद्यार्थी आहेत आणि ६ लाख ८७ हजार शिक्षक आहेत. फक्त शालेय शिक्षणावर दरवर्षी जवळपास ३० हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. मला वाटते, यूरोपातील अनेक देशांचे वार्षिक बजेटदेखील एवढे नाही. एवढ्या मोठ्या बजेटच्या खात्याचे प्रमुख विनोद जी आपण या ठिकाणी आहात. म्हणून आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. आज या ठिकाणी चांगली चर्चा झाली, यातून पुढे आलेले काही मुद्दे खरोखरच खूप महत्त्वाचे आहेत. उस्मानाबादहून कुणी एखादा नांदेड विद्यापीठाची किंवा औरंगाबादच्या बामू विद्यापीठाची पदवी घेऊन येथे पुण्यात आला तर त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सर्व विद्यापीठांसाठी एकच सिलॅबस ठेवता येईल का यासारखे अनेक मुद्दे या चर्चेत उपस्थित झाले. आपल्या राज्यात शाळा खूप झाल्या आहेत. आता या शाळांमधील इन्फ्रास्ट्रक्टरकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. गेले अनेक वर्षे याकडे लक्ष दिले जात आहे. 
  प्रत्येक बालकांमध्ये जिज्ञासा वृत्ती असते. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला घोकंपट्टीकडे न नेता, त्याला ख-या अर्थाने ज्ञान देण्याचे प्रयत्न झाल्यास योग्य होईल. जेव्हा शाळेतून बालक बाहेर पडतो, तेव्हा त्याच्यामध्ये असलेले कुतुहल, जिज्ञासा, निरीक्षण शक्ती आणखी विकसित कशा होतील, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. विद्यापीठातून बाहेर पडत असताना, सर्व विद्यार्थ्यांनी संगणकसाक्षरता, इंग्रजी भाषा कौशल्य, आर्थिक साक्षरता आणि विविध समाजात जाऊन काम करण्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आज या ठिकाणी आलेली सर्व मंडळी निश्चितपणे काम करतील, अशी मला अपेक्षा आहे. 
  आजच्या या शिक्षण संवाद  कार्यक्रमात उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांवर, मुद्यांवर शिक्षणमंत्री विनोद जी सकारात्मक उपाय काढतील, अशी मला अपेक्षा आहे. यासाठी मी आता शिक्षणमंत्री विनोद जी तावडे यांना निमंत्रित करतो. धन्यवाद.

 • पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभात भाषण
  तारीख : १६ डिसेंबर २०१५ 
  ठिकाण : साई सभागृह, शंकरनगर चौक, नागपूर 
  कार्यक्रम : पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभ

  लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी 
  पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभात केलेले भाषण

  लोकमतचे पहिले संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ आणि त्यानंतरचे संपादक पत्रमहर्षी .. उपाख्य बाबा दळवी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणा-या पुरस्कार प्रदान समारंभाचे आजचे प्रमुख पाहुणे या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार, कॉन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. वेद प्रताप वैदिकजी, लोकमतचे सर्वेसर्वा आणि ज्यांनी लोकमतला बाबूजींच्या नंतर अधिक गतीनं वाढविलं, त्याचं नेतृत्व केलं ते खासदार विजयबाबू दर्डा, व्यासपीठावरील माझे सहकारी, या ठिकाणी उपस्थित पत्रकार, पुरस्कार विजेते आणि मित्रहो.

  आजलोकमतवृत्तपत्राला देशभक्तीचा इतिहास आहे. १९१८ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यवतमाळला आले असतांना त्यांनी लोकनायक बापुजी अणे यांना सुचवलं की, या ठिकाणी ब्रिटिशांशी लढण्यासाठी लोकमत या नावाने साप्ताहिक सुरू करा. लोकनायक बापूजी अणे यांनी १९१८ ते १९३३ या काळात ब्रिटीशांच्या राजवटीत स्वातंत्र्याची चेतना जागविण्याचे मोठे कार्य लोकमतच्या माध्यमातून मोठ्या निष्ठेने, कष्टाने केले. १९३३ मध्ये लोकमत साप्ताहिक बंद झालं. त्यानंतर १९५३ साली माझे वडील बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांनी यवतमाळवरून परत हे साप्ताहिक सुरू केलं. पुढे १९६० मध्ये ते अर्धसाप्ताहिक झाले आणि १९७१ मध्ये विजयभैय्यांना घेऊन नागपुरात लोकमत दैनिकाची सुरुवात झाली.  

  लोकमत दैनिक नागपुरात सुरू झाले तेव्हापासून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आज लोकमतने महाराष्ट्रात जे देदीप्यमान यश संपादन केले आहे या प्रवासामागे एक तपश्चर्या आहे. कालच दि. १५ डिसेंबरलालोकमतच्या नागपूर आवृत्तीने ४५ व्या वर्षात आणि कालच जळगाव आवृत्तीने ३८ व्या पदार्पण केले आहे. औरंगाबादचा लोकमत ३३ वर्षांचा झाला आहे. सर्वाधिक खप असलेला मराठी लोकमत आपल्या हिंदी आणि इंग्रजी भावंडासह संपूर्ण  राज्यात लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचलेला आहे.

  लोकमत परिवाराची एकूण कल्पक दृष्टी, कठोर परिश्रम आणि संपूर्ण जीव ओतून काम करणारी लोकमतची चमू यामुळेच हे शक्य झाले आहे. द्वादशीवारजी आपण त्याचा उल्लेख केला. लोकमतचे पहिले संपादक पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९८८ मध्ये महाराष्ट्रातील पत्रकार, लेखक, साहित्यिक यांच्यासाठी सामाजिक-आर्थिक विकास लेखन पुरस्कार सुरू केला. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, पां.वा. गाडगीळ यांनी आर्थिक आणि सामाजिक विषयावर विपुल लेखन केले. साम्यवाद आणि समाजवादाचे मध्यसूत्र काढून ते सर्वसामान्य माणसाला अतिशय सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितले. पां.वा. गाडगीळ यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ग्राहक चळवळीला बळ देण्याचेही मोठे काम केले. मला आठवतं, १९७२ ते ७४ या काळात मी लंडनमध्ये होतो आणि पां.वा. गाडगीळ पत्रावर मला प्रश्न लिहून पाठवायचे. लंडनमध्ये ग्राहक चळवळ कशा पद्धतीने सुरू आहे, यावर लिहून पाठव. असे पां.वा. गाडगीळ होते. एकूणच पां.वा. गाडगीळ आजच्या तरूण पत्रकारांनी खरोखरच समजून घ्यायला पाहिजे. त्या काळात १९७२-७३ मध्ये बजाजनगरमधून तर गणेशपेठपर्यंत पां.वा. गाडगीळ उन्हाळ्यातसुद्धा पायी चालत यायचे. त्यामुळेच आज पां.वा. गाडगीळ साहेब आम्हा सगळ्यांना निश्चितपणे आठवतात.

  पां.वा. गाडगीळ यांच्यानंतर लोकमतची वैचारिक धुरा कार्यकारी संपादक .. उपाख्य बाबा दळवी यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या लेखनीला सामाजिक भान होते. पत्रकारितेच्या निष्ठेने ते जितके भारावले होते तितकाच त्यांना परिवर्तनाचा ध्यास होता. त्यामुळे परिवर्तनवादी संपादक म्हणून त्यांनी केवळ लोकमतलाच नव्हे तर महाराष्ट्रातील वृत्तपत्र सृष्टीला त्यांनी समतेचा डोळा दिला, असं म्हटलं तर चूक होणार नाही. बाबांनी शोषितांना लढण्याचे बळ दिले आणि मुक्यांना शब्द दिले. त्यामुळे १९९६ साली आपण बाबा दळवी यांच्या नावाने राज्यस्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार सुरु केला आहे.

  लोकमतचे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांनी लोकमत दैनिक सुरू केले, त्यामागची भावना शोषित वंचितांना न्याय देण्याची आणि स्वातंत्र्य लढ्यातून मिळालेल्या लोकशाहीला अधिक मजबूत करण्याची होती. त्यांनी लोकशाही मूल्यांच्या जोपासनेला प्रथम प्राधान्य दिले. द्वादशीवारजी ज्याचा उल्लेख आपण केला, बाबूंजींसोबत ज्यांनी काम केले, पां.वा. यांनी काम केले, बाबांनी काम केलं, आपण केलं, भावेंनी केलं, केतकरजींनी काम केलं. आपण सगळ्यांनी त्यांना पाहिलं, वर्तमानपत्र चालवत असताना संपादकांना, पत्रकारांना लिखानाचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यावर बाबूजींचा कटाक्ष होता. त्यांनी कधीही संपादकांवर सेन्सारशिप लादली नाही. आजही ती परंपरा चालू आहे. म्हणूनचलोकमतनिर्भिडपणे आपली जबाबदारी पार पाडू शकले.

  लोकांचे प्रश्न घेवून त्यासाठी संघर्ष करणारे दैनिक ही प्रतिमा लोकमतने निर्माण केली आहे. देवेंद्रजी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. बाबूजी आम्हाला नेहमी म्हणायचे, समाजामधे सर्वच काही अमंगल नसतं, सर्वच काही भ्रष्ट नसतं, आवश्यक असेल त्यावेळी अशा गोष्टींवर कठोर प्रहार करावेत, मात्र फक्त याच बातम्या देवून समाजाचा पुरुषार्थ संपवू नये हे मानणारे आम्ही आहोत. जे-जे चांगलं आहे, जे-जे मंगल आहे. नवनवीन प्रयोग लोकमतच्या माध्यमातून केले पाहिजे, ही शिकवण बाबूजींनी आम्हाला दिली.

  बाबुजींनी आम्हाला घडवलं. लहानपणी ४२ च्या चलेजाव अंदोलनाबद्दल किंवा ४० च्या वैयक्तीक सत्याग्रह आंदोलनाबद्दल आम्ही त्यांच्याकडून ऐकलं. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात पाऊने दोन वर्षे जबलपुरच्या तुरुंगात ते होते. बाबुजी सांगायचे, त्या काळात असं कधी वाटलं नव्हतं देशाला स्वातंत्र्य मिळेल आणि आपण या कोठडीतून बाहेर पडू.

  मला एकच म्हणायचे आहे की आमच्यापैकी अनेकांनी पारतंत्र्य काय असत हे पाहिले नाही. आमच्या पैकी काहींनी त्या भारावलेल्या दिवसाचे वर्णन ऐकले, आजच्या तरुणांनी तेही ऐकले नाही आणि त्यामुळेच कष्टाने मिळविलेल्या या स्वातंत्र्याला अधिक चांगले दिवस यावेत अशी अपेक्षा करणे चूक होणार नाही.

  देशात लोकशाही असली तरी, लोकशाहीचे धिंडवडे निघत आहे, विधिमंडळात, संसदेत विकासाची चर्चा होण्याऐवजी विध्वंसक कामकाजामुळे विधिमंडळाचा वेळ वाया जातोय. जनहिताच्या विधेयकांना चर्चेशिवाय मंजुरी देण्यात येत आहे. योजनांच्या अंमलबजावणीबाबत आग्रही भूमिका घेतली जात नाही. मा. मुख्यमंत्रीजी, आपण उत्तम संसदपटू आहात. अभ्यास करून आपण यायचे. आपल्यासोबत आमदार म्हणून १५ वर्षे विधिमंडळात काम करण्याची संधी मलाही मिळाली. आपण अभ्यासपूर्ण भाषण करायचे. आज मात्र अभ्यासपूर्ण भाषणांचा निश्चितपणे अभाव दिसतो आणि लक्षात राहतो तो गोंधळ आणि त्या गोंधळामुळे स्थगित करावे लागणारे कामकाज. एक गोष्ट नक्की आहे. सरकार आणि विरोधक ही दोन्ही लोकशाहीची चाकं आहेत. त्यामुळे सरकारने विरोधकांना लक्षात घेतलेच पाहिजे. त्याच बरोबर विरोधी पक्षांनी सुद्धा देशासाठी आणि राज्यासाठी जे चांगले असेल असे विधेयक मार्गी लावणं तितकच महत्त्वाचं आहे.

  एका गोष्टीचं उल्लेख करून मी थांबणार आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीत लोकमत वृत्तपत्र समूहाने ग्रामीण भागातील तरूणांना पत्रकारितेचं प्रशिक्षण देण्याचं काम केले. वृत्तपत्राचा अनुभव नसलेले पण सामाजिक जाणीव असलेले पदवीधर तरुणांना दोन वर्षे पत्रकारिता शिकविण्याचा कार्यक्रम राबविला. आज महाराष्ट्रातील सर्व आवृत्तीत महत्त्वाच्या पदावर काम करणारे हे पत्रकार आज लोकमतची फार मोठी ताकद आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या तरुणांनी लोकमत घडविण्यामध्ये फार योगदान दिले आहेत्याचे प्रतिबिंब निश्चीतच लोकमतमध्ये पाहावयास मिळत आहे. शेवटी एक परिपूर्ण वृत्तपत्र देण्याचा आणि वाचक हाच केंद्रबिंदू मानून लोकमतची वाटचाल सुरू राहील, असं अविभवचन देऊन मी माझं मनोगत संपवतो.

  धन्यवाद. जयहिंद, जय महाराष्ट्र.


 • प्रा. शरश्चंद्र टोंगो राष्ट्रीय कथा स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभात भाषण
  तारीख: 24 नोव्हेंबर २०१५
  ठिकाण: यवतमाळ
  कार्यक्रम: प्रा. शरश्चंद्र टोंगो राष्ट्रीय कथा स्पर्धा पुरस्कार वितरण

  लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी 
  प्रा. शरश्चंद्र टोंगो राष्ट्रीय कथा स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभात केलेले भाषण

  लोकमतद्वारा आयोजित ख्यातनाम मराठी कथाकार, कादंबरीकार, आणि लोकमत परिवाराचे ज्येष्ठ जुने सदस्य पत्रकार कैलासवासी प्रा. शरश्चंद्र टोंगो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जी देशपातळीवर राष्ट्रीय कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचे प्रमुख पाहुणे आमचे मित्र आणि या राज्याचे अर्थ,नियोजन वनमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, लोकमतचे चेअरमन खासदार सन्माननीय विजयबाबू दर्डा, या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजय राठोड जी, खासदार भावनाजी गवळी, या भागाचे लोकप्रिय आमदार मदनरावजी येरावार, ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक वामनरावजी तेलंग, आमचे सर आमचे गुरुजी आणि इतिहासाचे अभ्यासक अरूण हळबेजी, लोकमतचे संपादक आणि ज्येष्ठ साहित्यिक सुरेश  द्वादशीवारजी, या ठिकाणी आलेले राजस्थानच्या मनीष मीडियाचे चेअरमन चांदमल कुमावतजी आणि टोंगो सरांवर प्रेम करणारी या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व मंडळी आणि माझे मित्र अभय टोंगो, रोहिणीजी आणि उपस्थित असलेले सर्व मित्र.

  खरं म्हणजे शरश्चंद्रजी टोंगो ज्यांना मी टोंगो सर म्हणायचो, त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही देशपातळीवरील कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली. जसं तेलंग सरांनी सांगितलं की कथा हा जो साहित्यातला एक विश्व आहे, हा विश्वच गेल्या काही वर्षांत मागे पडला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने देशातून ५०० वर प्रवेशिका आल्या, त्याच्यातून आज या ठिकाणी पुरस्कार विजेते ठरलेले आहेत, खरं म्हणजे सरांबद्दल बोलायचे असेल तर एक स्वच्छ, सहृदय, सरल हृदयाचा साहित्यिक ही शरश्चंद्र टोंगो यांची खरी ओळख. शांत आणि संयत प्रवृत्तीचे आणि कुठलाही अभिनिवेष बाळगता सर्वांशी संवादपूर्ण संबंध जपणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आज या ठिकाणी त्यांच्या साहित्याबद्दल अनेक जण बोललेले आहेत, पण मी टोंगो सरांना पत्रकार म्हणून जे काही अनुभवलेलं आहे ते मी या ठिकाणी सांगणार आहे. विजयभैय्या आणि मी आम्ही दोघं खूप लहान होतो आणि पृथ्वीवंदनमध्ये, गांधी चौकातील पृथ्वीवंदनमध्ये खाली आम्ही आलो तर, त्या ठिकाणी टोंगो सर हे लोकमतचे संपादन करताना आणि लोकमतसाठी अग्रलेख लिहिताना त्या काळात आम्ही त्यांना पाहिले आहे. कुटुंबाचा भार सांभाळण्यासाठी त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षी नगर परिषद प्राथमिक शाळेमध्ये नोकरी धरली. त्यानंतर ते माध्यमिक शाळेत अध्यापन करीत राहिले. प्राथमिक माध्यमिक शाळेत त्यांनी अध्यापन केलेले असल्यामुळे अनेक तत्कालीन पुढा-यांचे ते गुरुजी होते. त्यामुळेच त्यांनी जेव्हा पहिल नाटक लिहिलं, नव्या डहाळ्या नवे खापे हे नाटक जेव्हा बसवलं, त्यामध्ये प्रमुख कलाकार होते जांबुवंतरावजी धोटे आणि त्याला पार्श्वगायक घारफळकर जी होते. अशा पद्धतीने त्या सर्व जुन्या मंडळींना टोंगो सरांनी एकत्रित आणली होती. टोंगो सर अध्यापन करत असताना, प्राध्यापक म्हणून काम करत असताना यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयात आले, मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं.

  इकडे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमचे बाबूजी स्वातंत्र्य संग्राम सैनिक जवाहरलालजी दर्डा यांनी सुरुवातीला नवेजग काढलं आणि नवेजगच्या नंतर त्यांनी १९५२ मध्ये लोकमत साप्ताहिक म्हणून सुरू केले. पुढे १९६० मध्ये अर्धसाप्ताहिक झाले. या काळात १९५८ च्या नंतर कळणावत सर आणि टोंगो सर यांनी या लोकमत सातहिकाचं आणि नंतर अर्धसाप्ताहिकाचं संपादन करण्यामध्ये खूप मोठी जबाबदारी उचलली आहे. खरं म्हणजे टोंगो सर हे नियमितपणे लोकमतमध्ये साप्ताहिक अर्धसाप्ताहिक असताना त्यावेळी अग्रलेख लिहायचे. सरांचे अग्रलेख अतिशय संतुलित असायचे. विजयभैय्या, लोकमत साप्ताहिकामध्ये २७ मार्च १९५९ ज्यावेळला लोकमत साप्ताहिक होतं यवतमाळात त्यावेळी त्यांनी एक अग्रलेख लिहिला होता सोन्याचा दिवस. आणि हा अग्रलेख त्यावेळला खूप गाजला. त्यानंतर अर्धसाप्ताहिकामध्ये राजाजींचा इंग्रजी पक्षी, कालचा काश्मीरचा शेर आज पाकिस्तानच्या ताटाखाली हा अग्रलेख आणि मरगळलेला मध्यमवर्ग, दुरितांचे तिमिर जाओ असे त्यांचे अनेक अग्रलेख गाजले आहेत. त्यांचे तत्कालीन सहकारी प्राध्यापक कळणावत यांनी त्यांच्या लेखामध्येदेखील याचा उल्लेख केला आहे. आज सरांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशपातळीवरील अनेक कथाकार एकत्र आले, त्यांना हा पुरस्कार मिळतोय, त्यामुळे याचा आम्हाला निश्चितच खूप आनंद होतोय.

  आज आणखी एक आठवण मला येतेय, टोंगो सर जसे अग्रलेख लिहायचे, तसंच लोकमत साप्ताहिकामध्ये ताकापुरता रामायण हे सदर ते लिहायचे आणि या ताकापुरत्या रामायणामध्ये त्या आठवड्यात घडलेल्या घटनांचं मार्मिक खुशखुशीत विवेचन ते करायचे. आज लोकमतमध्ये भाष्य येतं. त्याकाळातसुद्धा बाबूजी संपादक असताना ताकापुरता रामायण हे सदर गाजलेलं आहे. मला आठवतं की वा.ना. देशपांडे फार मोठे साहित्यिक होते, सगळ्यांना याची कल्पना आहे, बाबूजी आणि टोंगो सरांमध्ये वा.ना. देशपांडे हेसुद्धा फार मोठा दुवा होते. वा.ना. देशपांडे यांचा भिंतीला कानं हे फारमोठं गाजलेलं सदर होतं. १८ कादंब-या, नाटकं, दोनशेहून जास्त कथा असा प्रचंड साहित्य पसारा टोंगो सरांचा होता. रक्ताचा मोबदला ही जी त्यांची पहिली कथा होती, ती वयाच्या विसाव्या वर्षी लिहिली होती. ती   कथा एका महिलेच्या टोपण नावाने लिहिली होती. कारण महिलेच्या नावाने कथा लिहिली तर त्या काळात लवकर छापल्या जायची. म्हणून त्यांनी महिलेच्या टोपण नावाने त्यांनी कथा लिहिली. ना.सी. फडकेंनी या कथेचं त्यावेळी कौतुक केलं होतं. शरश्चंद्र टोंगो यांनी भरपूर लेखन केले. मोहक भाषाशैली, समाजात वावरणा-या सामान्य माणसांचं यथार्थ चित्रण, आटोपशिर रचना, आकर्षक मात्र वास्तव वातावरण ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. सुक्ष्म अवलोकन, भाव भावनांचे हळूवार चित्रण, शेवटपर्यंत कायम राहणारी उत्सुकता, हे त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य होतं. रविवार ते रविवार, अशोक हॉटेलमधील दुसरी खोली, आतड्याची जखम, चढउतार, चौथे पत्र या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या लोकमत दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेतएक काळ असा होता, लोकमत साप्ताहिक असताना शिलेदार गुरुजींच राशिभविष्य आणि टोंगो सरांची कादंबरी हे दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य होतं, याचा आज मला उल्लेख करता आला याचा मला निश्चित आनंद होत आहे.

  सुधीरभाऊ मी आजच्या काळात वावरणारा माणूस आहे, मी भूतकाळाकडे पाहत नाही, भविष्याचा विचार करत नाही. आपण आणि यापूर्वीच्या वक्त्यांनी माझ्या नावासमोर माजी शिक्षणमंत्री असा उल्लेख केला आहे. पण मी माझ्या नावाला कधीही माजी लावत नाही. लोकमत या प्रतिष्ठित माध्यम समूहाचा मी मुख्य एडिटर-इन-चीफ आहे, याचा मला जास्त आनंद आहे. मला हेही सांगितलं पाहिजे की, टोंगो सरांनी मोठ्यांसाठीच नव्हे तर मुलांसाठीही भरपूर लेखन केले आहे. जलपरी, चंद्रचूड बंगला, एक वर्ष, बाबूराव देशमुख, कुणी एक जोसेफ, किमया अशा बालकादंब-या लिहिल्या. लोकमतचे संस्थापक बाबूजींचे ते निकटस्थ होते, त्यामुळे लोकमतने ही कथा स्पर्धा आयोजित केली, आज जन्मशताब्दीनिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आहे, अभय, राजेंद्र, रोहिणीताई परिवारासह येथे आल्या आहेत, आपलं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. लोकमतला अशी स्पर्धा आयोजित करण्याची संधी आपण आम्हाला दिली. या ठिकाणी मी चांगला वेळ घेतला आहे. सुधीरभाऊ आपण हाऊसमध्ये चांगलं भाषण करता, १५ वर्षे आपण सहकारी म्हणून विधानसभेत काम केलेलं आहे. आपल्या भाषणासाठी सगळे आतूर आहेत. आता आपण भाषण करावं अशी मी आपल्याला विनंती करतो.

  जय हिंद, जय महाराष्ट्र !

 • अपंगांना जयपूर फूट नि:शुल्क वितरण समारंभात केलेले भाषण
  तारीख: २२ नोव्हेंबर २०१५
  ठिकाणी: मातोश्री सभागृह, यवतमाळ
  कार्यक्रम: जवाहरलालजी दर्डा स्मृतिप्रित्यर्थ अपंगांना जयपूर फूट वितरण

  लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी 
  अपंगांना जयपूर फूट नि:शुल्क वितरण समारंभात केलेले भाषण

  माननीय जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंगजी, मेरे भाई किशोर, यहा स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा फाऊंडेशन और साधू वासवाणी मिशन पुणे, इनके माध्यम से आज जयपूर फूट जैसा कृत्रिम हातपैर बिठाने का जो कार्यक्रम हो रहा है, उसके लिए यहा आए हुए सन्माननीय जैन साहब, जाधव साहब, ढगेजी, यहा उपस्थित सांगळे सर, भोयर बाबू और जिन्होने इस पुरे कार्यक्रम को सुचारू ढंग से होना चाहिए करके लोकमत के माध्यम से जिन्होने भरसक कोशिस की वे अमिताभ श्रीवास्तवजी और यहा उपस्थित सभी पेशंट.

  खरं म्हणजे सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, बाबूजी स्वर्गवासी जवाहरलालजी दर्डा हे या जिल्ह्याचेच सुपूत्र आणि या शहराच्या विकासामध्ये ते मंत्री असताना त्यांनी केलेले कार्य आपल्या सगळ्यांनाच विदित आहे. पंचवीस तारखेला २५ नोव्हेंबरला त्यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन, साधू वासवानी मिशन पुणे आणि लोकमत, लोकमत समाचार, यांच्या माध्यमातून आज कृत्रिम हातपाय बसविण्याचं हे शिबिर आयोजित करण्यात आलंआहे. माहिती म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, १८ आॅक्टोबरला म्हणजे एक महिन्यापूर्वी या ठिकाणी नि:शुल्क शिबिरात विविध ठिकाणांहून आलेल्या २२८ लोकांची तपासणी झाली होती. त्यापैकी २२४ व्यक्ती यांना कृत्रिम हातपाय बसविण्याचं ठरलं. यात ५५ लोक असे आहेत की गुडघ्याच्या वर त्यांना कृत्रिम पाय मिळणार आहेत, ९५ असे आहेत की ज्यांना गुडघ्याच्या खाली कृत्रिम पाय मिळणार आहेत आणि ५५ लोकांना कृत्रिम हात बसविण्यात येणार आहेत. आता आपण एका मुलीला पाहिलं, तिला दोन्ही हात दिले जाणार आहेत आणि सुदैवानं जिल्हाधिकारी साहेब त्यांना ओळखतात. त्यांनी पाहिलं आहे की लायब्ररीमध्ये ती अभ्यास करते. तेव्हा एक चांगलं कार्य या ठिकाणी होत आहे. 
  मी फारसं न बोलता, मी साधू वासवानी मिशन, त्यांचे सगळे स्पेशॅलिस्ट, कारण एक लक्षात घेतलं गेलं पाहिजे, हे नि:शुल्क शिबिर आहे आणि या ठिकाणी जी सेवा केली जाते, त्या सेवेच्या मागे फार मोठी भावना आहे, आज स्वत: एक म्हणजे याच्यात कोणी इंजिनियर आहेत, विशेषज्ञ आहेत, टेक्निशियन्स आहेत आणि ते आपल्याला ही सेवा देत आहेत. तेव्हा मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती करीन की, ज्या संपूर्ण टिमने ज्याच्यात मिलिंद जाधव आहेत, सुशिल ढगे आहेत, जैन साहेब आहेत, कृत्रिम हातपाय विशेषज्ञ सलिल जैनजी आहेत. त्यांच्या संपूर्ण टिमसाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, आभार व्यक्त केलं पाहिजे, परत एकदा आपण सगळ्यांनी ही संधी आम्हाला दिली, मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद.
 • पर्यूषण पर्वानिमित्त केलेले भाषण
  तारीख : २० आॅक्टोबर २०१५
  ठिकाण : महावीर भवन, औरंगाबाद
  कार्यक्रम : पर्युषण पर्वानिमित्त केलेले भाषण

  लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी
  पर्यूषण पर्वानिमित्त केलेले भाषण

  आपल्या देशातील अतिप्राचीन जैन धर्माचे आपण सर्व उपासक आहोत. भारतीय अध्यात्मात जैन दर्शनाला वेदांत इत्यादी अन्य दर्शनांच्या बरोबरीचे स्थान आहे, यात नवल नाही. साहजिकच हिंदू धर्मीयांचा चातुर्मास व आपले पर्युषण पर्व हे हातात हात घालून चालतात. जैन धर्मानुसार जैन साधूंचे वर्तन हा श्रावक व श्राविकांसाठी एक आदर्श असतो. साहजिकच दशलक्षण पर्वात क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य या दशधर्मांचे पालन, चिंतन आणि मनन श्रावक व श्राविकाही त्याच निष्ठेने करतात, ज्या निष्ठेने आपले महान साधू करीत असतात.
  मी माझे महतभाग्य मानतो की, माझ्या ज्या बंधू-भगिनींनी पर्युषण पर्वाच्या काळात ते निष्ठेने पालन करण्याचा प्रयत्न केला व ज्यात ते यशस्वी झाले, त्यांचा सन्मान करण्याची सुवर्णसंधी आपण मला दिलीत. आपल्या धर्मनिष्ठेचे हे पालन अन्य श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन ठरेल, असा मला विश्वास वाटतो.
  यंत्रयुगाच्या या काळात व जीवनात यशस्वी होण्यासाठी अटीतटीचा संघर्ष करण्याच्या दिव्यातून जात असताना आपल्या वंदनीय पूर्वजांपेक्षा आपल्या नैतिक शक्तीचा, तसेच मानसिक शक्तीचा क्षय अधिक होतो हे नाकारण्यात अर्थ नाही. त्यामुळे दिव्य-शक्ती समाचार दशलक्षण पर्व या विशेषांकाचे महत्त्व निश्चितच फार मोठे आहे. वेळ मिळताच सहजी उपलब्ध होईल, साध्या व सोप्या भाषेत आपल्या धर्माचा संदेश आपल्या अनुयायांपर्यंत सहज पोचेल, यादृष्टीने हा विशेषांक अत्यंत मोलाचा आहे.
  या विशेषांकाचे विमोचन करण्याची ही संधी आपण मला दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानत मी या विशेषांकाचे विमोचन झाल्याचे जाहीर करतो.
  जैन धर्माचे लोक इतर धर्मीयांच्या सहवासाने आणि सामाजिक रूढींमुळे इतर सण साजरे करीत असले तरी त्यांचे काही विशिष्ट धार्मिक सण आहेत. ‘चातुर्मास’ (आषाढ शुद्ध १४ ते कार्तिक शुद्ध १४) हा त्यांचा एक पर्वकाल आहे. यावेळी जैन साधू विहार न करता एके ठिकाणी राहून धर्माचरण आणि धर्मोपदेश करतात. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावास्या (विशेषत: चातुर्मासातील) हे सर्व दिवस मानलेले आहेत. याशिवाय अक्षयतृतीया (वैशाख शुद्ध ३), श्रुत पंचमी (ज्येष्ठ शुद्ध ५), पर्युषण पर्व वीरनिर्वाण (आश्विन वद्य १४, उत्तररात्र) इ. प्रमुख जैनधर्मीय सण किंवा पर्व दिवस आहेत. यामध्ये पर्युषण पर्व हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा पर्वकाल आहे. दशलक्ष पर्व असेही त्याचे नाव आहे. श्वेतांबर हे ‘पजूसण’पर्व श्रावण वद्य १२ ते भाद्रपद शुद्ध ५ पर्यंत पाळतात. या वार्षिक पर्वकाळात मंदिरामध्ये पूजा-अर्चा, तत्त्वार्थाधिगमसूत्रासारख्या ग्रंथाचे वाचन (स्वाध्याय) आणि इतर कार्यक्रमही होतात. विशेषत: क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप,त्याग, आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य या दशधर्मांचे या विशेष स्वरूपाच्या पर्वकाळात चिंतन, मनन किंवा व्याख्यान चर्चा केली जाते. आत्मशुद्धी करण्याला अतिशय अनुकूल असा पर्वकाल असल्याने तो पर्वराज म्हणूनही ओळखला जातो.
  या दहा धर्मांचा साधू धर्मामध्ये अंतर्भाव होतो; परंतु या कालात श्रावक-श्राविकांनीही ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, हा उद्देश या पर्वाच्या पाठीमागे आहे. हा समारंभही केला जातो. त्यावेळी समाजातील लहान-थोर सर्वजण एकमेकांना भेटून एकमेकांची क्षमा मागतात.
 • मॅजिक रेडिओवर केलेले भाषण
  तारीख :  १५ आॅगस्ट २०१४
  ठिकाण : औरंगाबाद
  कार्यक्रम :  मॅजिक रेडिओवरील भाषण

  शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  मॅजिक रेडिओवर केलेले भाषण

  बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो!
  मित्रांनो, भारताच्या ६८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! या ६७ वर्षांत स्वतंत्र भारताने केलेली प्रगतीची वाटचाल बघून मन अभिमानाने फुलून जातं. अहिंसेच्या मार्गाने या देशाला महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवून दिले.
  मित्रहो, 
  अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे,
  ध्वज विजयाचा उंच धरा रे 
  उंच धरा रे !
  माती मधल्या कणाकणातून
  स्वातंत्र्याचे घुमते गायन
  प्रगतीचे रे पाऊल पुढे,
  विकासाचा मंत्र जपा करे....
  ध्वज विजयाचा उंच धरा रे...
  सन १६०० च्या सुमारास इस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले आणि दीडशे वर्षांत १७५७ च्या प्लासीच्या लढाईनंतर भारतावर कब्जा केला. त्यांनी भारतीयांवर अत्याचार केले, छळ केला. येथील जनतेच्या अस्वस्थतेला १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्याने तोंड फुटले. स्वातंत्र्याची पहिली ठिणगी उडाली आणि नव्वद वर्षांत याचा वणवा झाला. यात अनेकांची आहुती गेली, त्या सर्वांना माझा प्रणाम!
  मंगल पांडे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान, नेताजी सुभाषचंद्र बोस या सर्वांना मी अभिवादन करतो!
  आजचा स्वातंत्र्यसैनिक आपले रक्षण करणारा आपला सैनिक आणि आपले पोषण करणारा आपला शेतकरी आहे. विकासाचा ध्यास आणि प्रगतीची कास हा आपला श्वास आहे.
  असे अनेक थोर देशभक्त होऊन गेले ज्यांचे आपत्याला नावसुद्धा माहीत नाही. नाही चिरा... नाही पणती... तेथे मस्तक माझे झुकती...
  हजारो सैनिकांनी आपले प्राण दिले, त्यांच्या घरच्यांनी त्यांना निरोप देताना म्हटले असेल...
  ‘पाहा टाकले पुसुनी डोळे, गिळला मी हुंदका, रणांगणी जा सुखे राजसा, परतुनी पाहू नका!’
  आणि तेही निधड्या छातीने शत्रूंना सामोरे गेले असतील...
  ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या...
  उडवीन राई राई एवढ्या...
  या सर्व शूरवीरांना मी सलामी देतो...
  आज आपण स्वातंत्र्यात श्वास घेत आहोत... पण आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली... शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंचे नाव घेताच ऊर श्रद्धेनं आणि स्वाभिमानानं भरून येतो. केवढं त्यांचं शौर्य आणि केवढा त्यांचा त्याग! यांच्या बरोबरच मदनलाल ढिंगरा, मास्टर सूर्यसेन, महाबीर सिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, कुशल कुमार, जतिंदरनाथ दास, अश्फाकुल्ला खान, बटुकेश्वर दत्त, बिरसा मुंडा, लाला लजपत राय यांच्या तेजस्वी स्मृतीलासुद्धा मी वंदन करतो... 
  येथे सुरेश भटांचे गीत आठवते
  गे मायभू तुझे मी फेडेन पांग सारे...
  आणेन आरतीला, हे सूर्य, चंद्र, तारे...
  स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियासुद्धा मागे नव्हत्या. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हजारो भगिनींनी आपलं योगदान दिलं...
  झांशीची शूर राणी लक्ष्मीबाई, शहीद कनकलता बारुआ, प्रीतीलता वड्डेदार, कित्तूर राणी चेन्नम्मा यांना माझा प्रणाम!
  याशिवाय सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली, भगिनी निवेदिता, बेगम हजरत महल, अ‍ॅनी बेझंट, कमला नेहरू, विजयालक्ष्मी पंडित, भारताच्या तिरंग्याचे पहिले प्रारूप तयार करणाºया भिकाजी कामा या सर्वांनी महात्मा गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली विसाव्या शतकात स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान दिलं. या थोर भगिनींना आपण वंदन करूया.!
  राम प्रसाद बिस्मिल या स्वातंत्र्यसेनानीच्या या दोन ओळी अजरामर झाल्यात...
  ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है...
  देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है...
  विसाव्या शतकात गांधीजींच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली. बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, गोपाळकृष्ण गोखले यांनी स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग आणि संघर्ष अद्वितीय आहे.
  नेताजी बोस म्हणाले होते...
  ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो...’
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य...
  ‘आय अ‍ॅम अ‍ॅन इंडियन फर्स्ट अँड अ‍ॅन इंडियन लास्ट’
  हे सगळ्यांनी कायम लक्षात ठेवायला हवं!
  मध्यरात्री १५ आॅगस्ट १९४७ ला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यावर नेहरूंचे भाषण अजरामर आहे. ‘मध्यरात्री जेव्हा जग झोपलेले आहे तेव्हा भारत स्वातंत्र्यात जागा होत आहे.’ या वाक्याने आजसुद्धा अभिमानाने रोमांच उभे राहतात.! 
  बंकिमचंद्र चटर्र्जींनी नारा दिला...
  ‘वंदे मातरम्... सुजलाम्, सुफलाम्, सश्यश्यामला मातरम्!
  सरदार पटेलांनी म्हटले होते...
  ‘देशाने तुम्हाला अनेक प्रकारचे हक्क दिले... हक्काबरोबर कर्तव्यसुद्धा येतात, हे लक्षात ठेवा...’
  चला, आपण सर्व आपला खारीचा वाटा उचलूया! विकासाने, एकात्मकतेने, एकजुटीने भारताला जगात सर्वांत सुंदर, सुदृढ बनवूया. थेंबे थेंबे तळे साचे! आपण सर्वांनी दिलेल्या छोट्या छोट्या योगदानानेच आपला देश पुढे जाईल. आणखी सुजलाम् सुफलाम् होईल!
  भारतीय मी, भारतीय मी,
  भारत माझा देश!
 • सर्वपक्षीय सभेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना वाहिलेली श्रद्धांजली
  तारीख :  ८ जून २०१४
  ठिकाण  :  जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाट्यगृह, सिडको
  कार्यक्रम :  सर्वपक्षीय सभेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली

  शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी 
  र्वपक्षीय सभेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना वाहिलेली श्रद्धांजली


  प्रदेश भाजपचे अध्यक्ष, मा. देवेंद्र फडणवीसजी, खा. राजकुमार धूत, रावसाहेब दानवेजी, हरिभाऊ बागडेजी, महापौर कला ओझा, आ. दिवाकर रावते, आ. पाशा पटेल, आ. सतीश चव्हाण, माजी खासदार मोरेश्वरजी सावे, माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर, आ. संजय शिरसाट, श्रीकांत जोशी, विवेक देशपांडे, उपस्थित बंधू-भगिनी व पत्रकार मित्रांनो,
  लोकनेता गोपीनाथजी मुंडे यांच्या अपघाती व अकाली निधनाने संपूर्ण देश सुन्न झाला आणि महाराष्ट्राला तर अद्यापही हुंदका आवरता आला नाही. ग्रामीण राजकारणाशी आणि समाजकारणाशी नाळ जोडणारा, आपल्या वक्तृत्वाने समोरची गर्दी लीलया जिंकणारा, सामाजिक निर्णय घेत असताना आपल्या पक्षाविरुद्ध बाजू घेणारा आणि मित्रांचा मित्र असलेले गोपीनाथरावजी यांच्या जाण्याने आज आम्हा सगळ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
  गोपीनाथजी मुंडे - एक झंझावात...
  आपल्या पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचविणारा धडाडीचा नेता.
  गोपीनाथजींचं वर्णन- एक लढवय्या, धाडसी आणि जिगरबाज नेता असेच करावे लागेल.
  आमच्याच मराठवाड्याने ज्येष्ठ नेते विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथराव यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. दोघांची भाषणामधील जुगलबंदी आम्ही कधीही विसरू शकत नाही.
  युती शासनात मुंडे साहेब ऊर्जामंत्री होते आणि त्यांच्यानंतर १९९९ साली मी ऊर्जा राज्यमंत्री झालो. एन्रॉनवरून विधानसभेत खूप खटकेही उडाले; पण गोपीनाथरावांची आणि आमची मैत्री शेवटपर्यंत राहिली. १९९९ साली आघाडी शासनाकडे काठावरचंच बहुमत होतं आणि त्या काळात ते विधानसभेत भाषणाला उभे राहिले की, काही वेळातच आपल्या भाषणाने ते सभागृहाचा ताबा घ्यायचे. ते टोप्या उडवायचे. चिमटे काढायचे, पण कधी कुणाला जखमी करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. 
  ग्रामीण महाराष्ट्र त्यांना तळहातावरच्या रेषेइतका माहीत होता. प्रत्येक गावागावातले नेते, त्यांचे स्वभाव, त्यांचे गुण, त्यांचे दोष याची त्यांना माहिती होती आणि त्याचा फायदा त्यांनी आपला पक्ष वाढविण्यासाठी करून घेतला होता.
  महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेणा-यांमध्ये गोपीनाथजी मुंडे यांचा मोठा वाटा राहिला.
  संघ विचाराच्या पक्षामध्ये राहूनही मुंडे आपल्या तत्त्वांवर ठाम राहिले.
  मंडल आयोगासंबंधी भूमिका, मराठवाडा विकास परिषदेचे आंदोलन, विद्यापीठ नामांतरप्रश्नी तर त्यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या पुरोगामी व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारी ठरली.
  गोपीनाथ मुंडे यांच्याच पुढाकाराने भटक्या-विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली.
  टाडा कायद्याखाली अटक झालेल्या ३५ निरापराध मुस्लिमांची सुटका, हज कमिटीला कायद्यानुसार परवानगी, अखलियत कमिशन रद्द करणे, उर्दू अकादमीची स्थापना या अशा अनेक निर्णयांमुळे गोपीनाथ मुंडे यांच्यामधील सामाजिक न्यायासाठी कसे लढायचे हे लक्षात येते.
  मी थकणार नाही
  रुकणार नाही
  झुकणार नाही
  असं गोपीनाथ मुंडे नेहमी म्हणायचे. त्यांच्या जीवनाची ही त्रिसूत्री होती आणि अखेरच्या क्षणापर्यंत ते तसेच जगले.
  उभा महाराष्ट्र गोपीनाथ मुंडे यांना तोंडपाठ होता. ते मराठवाड्याचे असले तरी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र किंवा खान्देश, कोकण त्यांना त्या त्या भागातील इत्थंभुत माहिती होती. महाराष्ट्रातील दलित, पीडित, ओबीसी, शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्गाविषयी त्यांच्या मनात कमालीची आस्था होती. विधिमंडळात ते अनेक प्रश्न पोटतिडकीने मांडायचे. सभागृह अक्षरश: हलवून सोडायचे. सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडायचे. रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हे त्यांच्या स्वभावातच होते.
  मराठवाड्याचा माणूस कष्टकरी आहे, प्रामाणिक आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात तो पुढे येत आहे. त्याला विशेष संधी उपलब्ध करून दिल्या तर तो कष्टाने, कर्तृत्वाने स्वत:च्या पायावर उभा राहील, असा विश्वास गोपीनाथ मुंडे यांच्या मनात होता.
  गोपीनाथराव राजकारणी म्हणून ते कसे होते हे सगळ्यांनी सांगितले आहे; पण मी त्यांच्यामध्ये अतिशय ममत्व असणारा, सतत दुस-यांच्या मदतीला धावून जाणारा, चुकीच्या रुढी परंपररांना फाटा देणारा आगळा वेगळा माणूस पाहिलेला आहे.
  माझे त्यांचे अत्यंत पारिवारिक संबंध होते.
  अनेकदा राजकीय त्रास सहन करून त्यांनी अनेकांना मदत केली. सगळीच उदाहरणं सांगण्यासारखी नाहीत, पण एखादा माणूस चांगला आहे, त्याचे हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक आहेत आणि तो समाजासाठी तळमळीने काम करतोय हे कळाल्यानंतर तर मुंडेजी कोणत्याही परिणामांचा विचार न करता मदतीसाठी धावून जायचे आणि कोणी काही विचारलंच तर म्हणायचे, होय मी मदत केलीय... काही आॅब्जेक्शन आहे का तुमचं... एवढा बिनधास्तपणादेखील याच व्यक्तीकडे होता.
  अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्यांना कायम राग होता. त्यांनी स्वत: ब्राह्मण मुलीशी लग्न केले.
  सामाजिक बदल स्वत:च्या घरापासून घडले पाहिजेत असा त्यांचा आग्रह कायम होता.
  ते ज्या वंजारी समाजातून आले त्यात रावजी आणि लाड असे दोन प्रकार आहेत. त्यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत नव्हते. थोडक्यात सांगायचे तर नाशिक आणि बीड जिल्ह्यांत हे व्यवहार होत नव्हते. तेव्हा मुंडेसाहेब म्हणाले, मी माझी मुलगी नाशिकमध्ये देतो... आणि ते केवळ बोलून थांबले नाहीत तर त्यांची मुलगी डॉ. प्रीतमचे लग्न त्यांनी नाशिकमध्ये लावून दिले.
  समाज बदलण्याची, समाजाला नव्या जगाकडे घेऊन जाण्याची हिंमत लागते जी केवळ आणि केवळ मुंडे साहेबांकडे होती.
  भगवानगड हा मुंडे साहेबांसाठी कायम श्रद्धेचा विषय होता. त्या जागेचा त्यांनी खूप विकासदेखील केला.
  रुढी परंपरांना कायम दूर ठेवणा-या या नेत्याने आपल्या मुलांवरदेखील तसेच संस्कार केले. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी पंकजाने त्यांना मुखाग्नी दिला.
  आज माझं मन खूप भरून आलंय..  मुंडे साहेबांचा सहवास कायम   हवाहवासा वाटत असताना ते आमच्यातून गेले... कधीही न भरून येणारी पोकळी आहे ही. मी व्यक्तिगत आयुष्यात त्यांच्या जाण्याने खूप काही गमावल्याची भावना माझ्या मनात आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ आणि त्यांच्या परिवारावर कोसळलेला हा दु:खाचा आघात सहन करण्याची ताकद देओ, अशी मी प्रार्थना करतोे.
 • घाटीमधील नेफ्रो बिल्डिंग उद्घाटन समारंभात केलेले भाषण
  तारीख : २० फेब्रुवारी २०१४
  ठिकाण : औरंगाबाद
  कार्यक्रम : नेफ्रो बिल्डिंग उद्घाटन

  शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  घाटीमधील नेफ्रो बिल्डिंग उद्घाटन समारंभात केलेले भाषण

  या समारंभाला उपस्थित घाटी रुग्णालय अभ्यागत समितीचे अध्यक्ष आ. एम.एम. शेख, आ. सतीश चव्हाण, आ.डॉ. कल्याण काळे, वैद्यकीय शिक्षण (दंत) सहसंचालक डॉ. मानसिंग पवार, अधिष्ठाता डॉ. के.एस. भोपळे, डॉ. सुरेश बारपांडे, कुमुदिनी गावित, डॉ. सुभाष जेवळीकर,डॉ. मंगला बोरकर, यशवंत कांबळे, व्यासपीठावर व समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो.
  गेल्या ३०-३२ वर्षांपासून औरंगाबादच्या या घाटी हॉस्पिटलचा पत्रकार म्हणून, आमदार म्हणून संबंध आलेला आहे.
  हे रुग्णालय मराठवाड्याशिवाय ७-८ जिल्ह्यांचे आशास्थान आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये दरवर्षी १५० विद्यार्थी एमबीबीएसला प्रवेश घेतात. जवळजवळ २०० विद्यार्थी पदव्युत्तर (एम.डी. किंवा एम.एस.) प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतात. येथील वॉर्डाच्या खाटा नेहमी भरलेल्या असतात. हजारोंच्या संख्येने ओ.पी.डी., आंतररुग्ण म्हणून पेशंट येतात. ‘सिरियस’ म्हणून बाहेरच्या हॉस्पिटल्समध्ये नाकारलेले अनेक गंभीर रुग्ण येथे येतात आणि बरेचसे चांगले होऊन घरी परततात. माझा या घाटी हॉस्पिटलशी जवळचा संबंध आला, जेव्हा २००६ साली मी या कॉलेजच्या अभ्यागत मंडळाचा अध्यक्ष झालो! साडेतीन वर्षांत आमच्या समितीने सुमारे २० बैठका घेतल्या. याशिवाय अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगानिमित्त हॉस्पिटलला भेटी दिल्या. २००६ ते २००९ या काळात शासनाकडून जवळजवळ १०० कोटी रुपयांचा निधी या हॉस्पिटलसाठी मिळवून देण्यात आम्हाला यश आले. त्या काळात केंद्राकडून आता मिळतो तसा निधी मिळत नसे. आम्ही सतत पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाकडून हा निधी मिळविला. ज्या भूमीवर आपण आज उद्घाटन केलेली नेफ्रॉलॉजीची इमारत उभी आहे, त्या जागेवर पूर्वी घाटीचा कचरा टाकला जायचा. आमच्या समितीने सगळ्यात आधी ही जागा स्वच्छ करून घेतली. कचरा नेण्यासाठी कॉर्पोरेशनची गाडी नियमित केली, कचरा जाळण्याचे यंत्र (इन्सिनरेटर) सुरू करविले.  नंतर याच जमिनीवर नेफ्रॉलॉजीच्या वास्तूचे बांधकाम सुरू झाले. एकीकडे मेडिसीन विभागाची नवीन इमारत आणि दुसरीकडे ही इमारत - असे जवळजवळ ५०-७० टक्के बांधकाम आमच्या समितीच्या काळात पूर्ण झाले होते. ते १०० टक्के पूर्ण होऊन आज त्याचे उद्घाटन झाले, याचा मला मनापासून आनंद होत आहे आणि या सोहळ्यात मी सहभागी होऊ शकलो, याचा आणखीनच आनंद होत आहे!
  सीव्हीटीएसची इमारत २००५ साली बांधून ९० टक्के तयार झाली होती. ती २००८ साली आम्ही पाठपुरावा करून सुरू केली. तिथे बरेच काम होते; पण अजूनही म्हणावे तितके नाही.
  १०० खाटांचे कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबादला व्हावे, यासाठी आमच्या समितीने प्रचंड पाठपुरावा केला. त्याचे बांधकाम सुरू असताना अनेकदा पाहणी केली. तेथे किचन, लाँड्री, ब्लड बँक, सुसज्ज प्रयोगशाळा हवी. मुख्य म्हणजे रेसिडेंट डॉक्टर्स हवेत, कारण मला माहीत आहे की, सर्व सरकारी हॉस्पिटल्सचे काम रेसिडेंट डॉक्टर्सवरच सुरळीतपणे चालते. तेथील पे स्केल चुकीचा आहे, तो दुरुस्त करावा म्हणजे तेथे दैनंदिन रुग्णसेवेसाठी रेसिडेंट डॉक्टर्स मिळतील. तुम्ही ‘इमर्जन्सी रुग्णसेवेचा’ एम.डी. कोर्स नवीनच सुरू केला आहे असे ऐकतो...? त्याचप्रमाणे कॉर्डियोलॉजी, नेफ्रोलॉजी, कॅन्सर, रेडिओथेरपी यासारखे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावेत म्हणजे मराठवाड्यातील गरीब रुग्णांना सुपर स्पेशालिस्टची सेवा मिळेल आणि आपल्या येथील विद्यार्थ्यांनासुद्धा संधी मिळेल.
  आमच्या काळात सुरू झालेली एनआयसीयू, एसआयसीयूची सुविधा चार वर्षानंतर का होईना, अलीकडे कार्यान्वित झाल्याचे कळाले. न्यूरोसर्जरी विभागाची आपल्याला खूप गरज आहे. त्याबाबतीत तातडीने काही तरी केले पाहिजे. जर संख्या कमी असल्यामुळे सुपर स्पेशालिस्टस् मिळत नसतील, तर येथील तज्ज्ञ डॉक्टरांना काही विशेष प्रशिक्षण देता येईल का, हे बघायला हवे, म्हणजे रुग्णसेवा सुरळीत सुरू राहील.
  घाटीत पोलीस चौकी असायला हवी, अशी आम्ही अनेकदा मागणी केली होती. तसंच सुलभ शौचालय, नातेवाईकांसाठी आणखी एखादी धर्मशाळा यांची पण गरज आहे. येथील प्रयोगशाळा चांगली असेलच; पण अनेकदा ‘बाहेर’ रक्त चाचण्यांसाठी पाठवावे लागते, अशा बातम्या कानावर येतात. इतका निधी हल्ली मिळतो. त्यातील थोडा निधी या गोष्टींसाठी वर्ग केला तर गरीब रुग्णांना फायदा होईल.
  राजीव गांधी योजना अलीकडे सुरू झाली आहे; पण मला काही जणांनी सांगितले की, त्यांना फायदा मिळाला नाही. चौकशी केल्यानंतर योजना राबविण्यासाठी लागणारा स्टाफ कमी असल्याचे कळाले. ही योजना गरिबांना अतिशय फायद्याची आहे. कारण वैद्यकीय उपचारांचा खर्च बहुतेकांच्या आवाक्याबाहेरचा झालेला आहे. तरी ही योजना कशी आणखी चांगल्या प्रकारे राबविता येईल याकडे आपण सर्वांनीच लक्ष घालायला हवे.
  आपण जशा नर्सेस भगिनींच्या ४,००० जागा भरल्या, तसेच क्लास फोरच्या जागासुद्धा भराव्यात. कारण त्याशिवाय स्वच्छता राहणार नाही. स्वच्छतेसाठी काही नवीन उपकरणे मिळतात, तीसुद्धा घ्यायला हवीत, म्हणजे कमी मनुष्यबळातसुद्धा काम नीट होऊ शकते.
 • निर्मलग्राम पुरस्कार प्रदान समारंभात केलेले भाषण
  तारीख : २६ आॅगस्ट २०१३
  ठिकाण : औरंगाबाद
  कार्यक्रम : निर्मल ग्राम पुरस्कार सोहळा

  शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  निर्मलग्राम पुरस्कार प्रदान समारंभात केलेले भाषण 

  या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे महामहिम राज्यपाल के . संकरनारायणन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. दिलीप सोपल, राज्यमंत्री ना. रणजित कांबळे, शहराच्या प्रथम नागरिक महापौर कला ओझा, खा. चंद्रकांत खैरै, खा. रावसाहेब दानवे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजया निकम, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, उपसचिव शैला, विभागीय आयुक्त संजीव जायस्वाल, व्यासपीठावर व समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो.
  निर्मल ग्राम अभियान-२०११ मधील राज्यातील ४४२ ग्रामपंचायतींचा गौरव आज औरंगाबादला होत आहे. ही औरंगाबाद जिल्ह्याला चालना व प्रेरणा देणारी बाब आहे.  
  या ग्रामस्वच्छता अभियानात पुरस्कारासाठी एकेक गुण मिळविण्यासाठी मोठी लढाई करावी लागते. निकषही अवघड आहेत; पण ही लढाई जिंकून आज महाराष्ट्रातील तब्बल ४४२ गावातील सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे सभापती, निर्मल ग्राम अभियानाचे समन्वयक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी असे सर्व या कार्यक्रमासाठी राज्यातून आलेले आहेत. औरंगाबादचा प्रतिनिधी म्हणून या ऐतिहासिक शहरात मी आपले मनापासून स्वागत करीत आहे.
  झाडू हातात घेतल्याशिवाय ग्रामप्रवेश नाही, असा वेगळा वसा घेऊन ग्रामस्वच्छतेचे काम केलेल्या संत गाडगेबाबा महाराजांचा या राज्याला वारसा आहे. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून बहुजन समाजापर्यंत ग्रामस्वच्छतेचे महत्त्व नेले. हा संतांचा वारसा लक्षात घेऊनच १९९९ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू झाले. ज्या गावाला पुढारी नाही, कोणी गॉडफादर नाही, असे गावही काम केले तर पुढे जाते, त्याला बक्षीस मिळते हा संदेश गावागावांमध्ये पोहोचला. साधेसुधे कार्यकर्ते झपाटून कामाला लागले आणि त्यातूनच महाराष्ट्रातील ९,५२३ ग्रामपंचायतींपर्यंत हे अभियान पोहोचले. या अभियानातून ग्रामपातळीवर नवे नेतृत्व उदयाला आले. हे काम शासकीय निधीतून नव्हे, तर लोकसहभागातून उभे राहिलेले आहे. पण लोकसहभाग नोंदविला की, ग्रामविकासासाठी निधी मिळतो, बक्षीस मिळते हा संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्यामुळे या अभियानातील सातत्य टिकून आहे.
  आजच्या या कार्यक्रमामध्ये २०११ निर्मल ग्राम अभियानासाठी सर्वाधिक ७० ग्रामपंचायतींची निवड ही सोलापूर जिल्ह्यातून करण्यात आली आहे. या जिल्ह्याचा या अभियानात वरचा क्रमांक आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ५६ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. सोलापूरकरांनी या अभियानात आघाडी घेतली ही अभिमानाची बाब आहे. स्वच्छता या विषयालाही प्रतिष्ठा देण्याचे कारण केवळ या विषयाची गावाला आवड निर्माण व्हावी एवढेच मर्यादित नाही, तर स्वच्छतेचा संबंध हा गावक-यांच्या आरोग्याशी आहे.  फिंगर, फूड, फ्ल्युईड, फ्लाय, फिसिस म्हणजे हाताची बोटे, अन्न, पाणी, माशा आणि विष्ठा) या फाईव्ह एफमुळेच ग्रामीण आरोग्याचे प्रश्न तयार होतात. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी हे अभियान आहे.
  एकेकाळी हे अभियान सुरू झाले त्यावेळी उद्दिष्टपूर्तीसाठी शौचालये बांधण्यात आली; पण त्यांचा वापर फारसा झाला नाही. आता हे अभियान अशा पद्धतीने रुजले आहे की, लोक या शौचालयाचा वापर करू लागले आहेत.  निर्मल ग्राम अभियानातून ग्रामपंचायतीला प्राधान्य देऊन लोकसहभागाला चालना दिली गेली. 
  आता हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबविला जात आहे. केवळ शौचालयाची बांधणी हा एकच निकष न ठेवता व्यक्तिगत स्वच्छता, पाण्याचा पुनर्वापर, वनीकरण, घनकच-याची विल्हेवाट, अपारंपरिक ऊर्जास्रोत्रांचा वापर अशा अनेक गोष्टींचा साकल्याने विचार करून हे पारितोषिक देण्यात येते.  जागतिक तापमान वाढीमधला एक गॅस म्हणून मिथेनचा उल्लेख वेळोवेळी केला जातो. मानवी विष्ठेतील घटकांमध्ये मिथेनबरोबरच हायड्रोकार्बनही मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित केला जातो. त्याचा तापमानवाढीशी संबंध आहे. त्यासाठी या गॅसेसची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर होणे गरजेचे आहे.
  कर्नाटक आणि केरळच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील निर्मल ग्राम अभियानात सहभागी ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे; पण राज्यातील एकही जिल्हा परिषद पूर्णपणे निर्मल ग्राम झालेली नाही. प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी हा कार्यक्रम अधिक व्यापक करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण लक्षात घेता शहरातील वस्त्या-वस्त्यांमध्ये याच जोमाने, नेटाने निर्मलनगर अभियान राबविणे आवश्यक आहे. पण शहरातील स्वच्छता अभियान कोणत्या योजनेमध्ये बंदिस्त न करता त्यालाही अशा अभियानाचे स्वरूप यावे, अशी माझी उत्कट इच्छा आहे. 
  आपलं शहरीकरण आता पन्नास टक्क्याकडे झुकत आहे. शहरातील वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये या अभियानाची तितकीच गरज आहे. ज्या झपाटलेपणाने, लोकसहभागाने निर्मलग्राम अभियान राबविले गेले त्याचप्रमाणे एक अभियान म्हणून (योजना म्हणून नव्हे) निर्मलनगर अभियान राबविण्याची या घडीला गरज आहे. शेवटी निर्मलग्रामचा मानाचा पुरस्कार घेणा-या महाराष्ट्रातील सर्व मानक-यांचे मनापासून अभिनंदन.
 • नॅशनल युनिव्हर्सिटी स्टुडंटस् स्किल डेव्हलपमेंट समारंभात केलेले भाषण
  तारीख :  २३ आॅगस्ट २०१३
  ठिकाण :  औरंगाबाद
  कार्यक्रम नॅशनल युनिव्हर्सिटी स्टुडंटस् स्किल डेव्हलपमेंट

  शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी 
  नॅशनल युनिव्हर्सिटी स्टुडंटस् स्किल डेव्हलपमेंट समारंभात केलेले भाषण

  या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. राजेश टोपे, राज्यमंत्री ना. डी. पी. सावंत, आ. विक्रम काळे, एनएसडीएचे अध्यक्ष एस. रामदुराई, टीआयएसएसचे संचालक  एस. परशुरामन, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विजय पांढरीपांडे, कुलसचिव डॉ. डी. आर. माने, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्र मकु मार, व्यासपीठावर व समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो.
  ‘‘मंजीले उन्हींको मिलती है,
  जिनके सपनों में जान होती है.
  पंख से कुछ नही होता
  हौंसलों से उडान होती है.’’
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी आणि मराठवाडा प्रदेशासाठी आजचा क्षण हा आनंददायी आणि शिक्षणात परिवर्तन घडविणारा आहे. श्रमसंस्कृतीला कौशल्यविकासाची जोड देणारा आहे. शिक्षणाला कौशल्याची जोड देणा-या नॅशनल युनिव्हर्सिटी स्किल डेव्हलपमेंटच्या देशातील दहा विद्यापीठांच्या कार्यक्रमाचे लाँचिंग आपल्या विद्यापीठापासून होत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने तयार केलेल्या आर्थिक साक्षरतेच्या कार्यक्रमाची रुजुवातसुद्धा आपल्या विद्यापीठापासून होत आहे.
  अर्थात, या परिवर्तनशील कार्यक्रमाचे अध्वर्यू पंतप्रधान सल्लागार कार्यालयातील ज्येष्ठ सल्लागार आणि टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सचे अध्यक्ष रामो दोराई हे आहेत. प्रत्यक्षात हा कार्यक्रम या संस्थेचे संचालक डॉ. परशुराम यांच्या नेतृत्वाखाली राबविला जाणार आहे. या निमित्ताने आमच्या विद्यापीठाचे सामाजिक क्षेत्रातील एका मातब्बर संस्थेशी नाते जोडले गेले, ही मोठी जमेची बाजू आहे.
  एकीकडे उच्च पदवीधारकांना नोक-या नाहीत म्हणून ओरड होते आणि दुसरीकडे उद्योग क्षेत्रातील मंडळी आम्हाला कौशल्य असलेला पदवीधारक मिळत नाही, अशी तक्रार करतात. पदवीचा आणि ज्ञानाचा काही संबंध नाही, अशी टीकाही वारंवार केली जायची. यावर एक चांगला मध्यम मार्ग सामाजिक क्षेत्रामध्ये देशपातळीवर अग्रेसर असणाºया टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स या संस्थेने काढला आहे. भारत सरकारच्या युथ अफेअर्स मिनिस्ट्री आणि पंतप्रधान सल्लागार कार्यालयाने कौशल्यविकासासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली आहेत आणि त्याला अनुसरून हा क्रेडिट बेस अभ्यासक्रम शनिवार, रविवार आणि सुटीच्या काळात राबविला जाणार आहे. औरंगाबादेतील विवेकानंद  महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय आणि मत्स्योदरी महाविद्यालय, अंबड या चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू होत आहे.
  राष्ट्रीय सेवा योजनेला या अभ्यासक्रमाची अत्यंत कल्पकपणे जोड दिलेली आहे. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एन.एस.एस.मधून महाराष्ट्रात अनेक चांगले सामाजिक उपक्रम आतापर्यंत राबविले गेले आहेत. नव्या पिढीमध्ये एक श्रमसंस्कृती या कार्यक्रमाने जोपासली आहे आणि आता या श्रमसंस्कृतीला कौशल्यविकासाची जोड मिळणार आहे. पदवीचे शिक्षण विद्यापीठ स्तरावर तर दिले जाणार आहेच; पण दुसºया बाजूला कौशल्यविकासाचे वेगळे दालन खुले करण्यात आले आहे. तसेच हे कौशल्य आत्मसात केल्याबद्दल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्राथमिक टप्प्यामध्ये संगणक साक्षरता, इंग्रजी भाषाकौशल्य, आर्थिक साक्षरता आणि निरनिराळ्या समाजघटकांबरोबर काम करण्याचे कौशल्य या चार विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा मूलभूत स्वरूपाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा हा विकासाला चालना देणारा आहे. औरंगाबादसारख्या औद्योगिक क्षेत्रातील घटकांशी सल्लामसलत करून रोजगारक्षम आणि गरजांवर आधारित असा कौशल्याचा अभ्यासक्रम तयार केला जाईल आणि या अभ्यासक्रमामधील विविध कौशल्यांमध्ये विद्यार्थी पारंगत झाल्यानंतर त्याला पदवीबरोबर हे कौशल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.
  सांगण्यास अभिमान वाटतो की, आर्थिक साक्षरतेबद्दलचा पहिलाच अभ्यासक्रम औरंगाबादेतून सुरू करण्यात येणार आहे. सध्या जी आर्थिक साक्षरता आहे, ती केवळ शहरापुरती आणि विशिष्ट घटकांपुरती मर्यादित आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने आर्थिक साक्षरतेबद्दल एक अभ्यासक्रम तयार केला आहे. हा आर्थिक साक्षरतेचा अभ्यासक्रम केवळ एक महिन्याचा आहे. पदवीबरोबर कौशल्यविकासाचे हे ज्ञान मिळत असल्यामुळे नोकरीचे वेगळे दालन खुले होणार आहे. एखादा कोणताही मोठा उपक्रम जेव्हा पूर्ण होत येतो तेव्हा शेवटी शेवटी मराठवाड्यात त्याची रुजुवात होते, असा आजवरचा अनुभव आहे. प्रथमच या विभागाच्या मागासलेपणाचा अनुशेष दूर करणाºया या कार्यक्रमाची सुरुवात औरंगाबादपासून होत आहे, ही माझ्यासाठी अभिमान आणि समाधानाची बाब आहे.
  ‘‘आओ चुने कांटे, और इस तरह चुनें के,
  बाद हमारे जो आए उसे एक कांटा भी ना मिले...’’
 • मराठवाडा आॅटो क्लस्टर प्रथम टप्पा लोकार्पण समारंभात केलेले भाषण
  तारीख :  ३१ आॅगस्ट २०१२
  ठिकाण :  एम.आय.डी.सी., वाळूज, औरंगाबाद
  कार्यक्रम : मराठवाडा आॅटो क्लस्टर - प्रथम चरणाचा लोकार्पण सोहळा

  शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  मराठवाडा आॅटो क्लस्टर प्रथम टप्पा लोकार्पण समारंभात केलेले भाषण

  या समारंभाला उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार,  खा. चंद्रकांत खैरे, आ. सतीश चव्हाण, आ. प्रशांत बंब, मराठवाडा आॅटो क्लस्टरचे चेअरमन राम भोगले, सीएमआयएचे अध्यक्ष सुनील रायगठ्ठा, व्यासपीठावर व समोरील सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो.
  मित्रहो,
  आॅटो क्लस्टरच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणप्रसंगी आपणासमवेत उपस्थित राहताना मला अत्यंत आनंद आहे. अत्याधुनिक यंत्रे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, प्रशिक्षण  केंद्र अशा सर्व मूलभूत सुविधा असलेल्या या जागतिक दर्जाच्या प्रकल्पाने औरंगाबादच्या उद्योग वैभवात मोलाची भर पडली आहे. या प्रकल्पामुळे पुणे आणि नाशिकबरोबर राज्यातील एक आॅटोमोबाईल हब ही औरंगाबादची ओळख आणखी दृढ झाली आहे. शासन आणि जनसहभागातून एखादा प्रकल्प कसा राबविला जाऊ शकतो याचे आॅटो क्लस्टर हे उत्तम उदाहरण आहे. 
  आॅटो क्लस्टरचे अध्यक्ष राम भोगले आणि त्यांच्या टीममधील सर्व सदस्यांचे मी याप्रसंगी हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. सीएमआयएच्या पदाधिका-यांनी या प्रकल्पासाठी किती मेहनत घेतली हे राज्याचा उद्योगमंत्री असताना मी जवळून पाहिले आहे. मी औरंगाबादेत आलो की, आॅटो क्लस्टर प्रकल्पासंबंधी चर्चा करण्यासाठी सीएमआयएचे शिष्टमंडळ मला भेटायला येत असे. मुंबईतही अनेक भेटी झाल्या. ई-मेल्स, एसएमएस आणि फोन कॉलवरून सतत पाठपुरावा चालू असे; पण प्रकल्पाला तत्त्वत: राज्याची मान्यता देणे, राज्याचे भागभांडवल मंजूर करणे आणि एम.आय.डी.सी.मधील ५ एकर जमीन मंजूर करणे आणि अंतिम मंजुरीसाठी प्रकल्प केंद्राला पाठविणे यासारखे निर्णय मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने उद्योगमंत्री म्हणून त्यावेळी घेता आले याचा आनंद होत आहे.
  मित्रहो, आता हा संपूर्ण प्रकल्प केंद्र सरकारने दिलेल्या आॅक्टोबर २०१३ या डेडलाईनपूर्वी पूर्णत्वाला नेण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. ८१.३५ कोटींच्या खर्चापैकी केंद्र शासन ५८.२० कोटी, तर राज्य शासन ८.०६ कोटी एवढा निधी देणार आहे. स्थानिक उद्योगाला उभाराव्या लागणा-या १५.६ कोटींपैकी ४.८० कोटी एवढी रक्कम उभी करण्यात आली आहे. आपली संघटना येत्या दोन महिन्यांत ८ कोटी रुपयांपर्यंत रक्कम उभी करू शकेल, असा आपला विश्वास आहे. याचा अर्थ १५ कोटींपैकी ८ कोटी रक्कम उद्योजक उभे करू शकतात. मात्र, सध्याच्या औद्योगिक परिस्थितीत उर्वरित ७.५ कोटी रुपयांची जमवाजमव करणे अवघड आहे, असेही पदाधिकारी मला सांगत होते.
  आॅटो क्लस्टर प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी ७.५ कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन शासनाने मंजूर करावे, अशी विनंती मी याप्रसंगी करू इच्छितो.
  दहा वर्षांत समान हप्त्यात हे कर्ज फेडता येईल. पुणे आणि नाशिकनंतर औरंगाबाद हे राज्यातील तिसरे आॅटो क्लस्टर आहे.
  या दोन शहरांत स्थानिक महानगरपालिकांनी प्रकल्पाचा खर्च उचलला आहे. पुण्यामध्ये स्थानिक उद्योगांनी १५ लाखांपेक्षाही कमी रक्कम उभी केली आहे, तर नाशिकमध्ये उद्योगांना ५० लाखांपेक्षा कमी रकमेची तजवीज करावी लागली. त्या तुलनेत औरंगाबादेत उद्योजक ७.५ कोटी रक्कम जमा करणारच आहेत आणि अशा परिस्थितीत उर्वरित ७.५ कोटींच्या रकमेसाठी शासनाने सॉफ्ट लोन देऊन मदतीचा हात पुढे करावा, हे उचित ठरेल. 
  याचवर्षी औरंगाबाद औद्योगिक जगताने आपली ५० वर्षे पूर्ण केली आहेत.  सी.एम.एम.आय.ने मोठा कार्यक्रमही घेतला. अशा वेळी शासनाने मागासलेल्या मराठवाड्याच्या औद्योगिक वाढीला मदत केली, तर ते उचितच ठरेल. एकेकाळी २.५ लाख लोकसंख्या असलेल्या या शहराची लोकसंख्या आता १५ लाख झालेली आहे. उद्योगही मोठ्या प्रमाणात या भागात आले. स्थानिक उद्योजकांचा या वाढीसाठी मोठा हातभार लागला आहे. ८० च्या दशकात ख-या अर्थाने विकासास गती आली.
  अर्थात, काही बाहेरच्या उद्योगांनी शासकीय सवलती संपताच उद्योग बंदही केले. मात्र, त्यानंतर येथे ताकदीने उद्योग उभे केले. ते स्थानिक उद्योजकांनी. प्रसंगी शासनाची मदत न घेताही त्यांनी उद्योग वाढीस हातभार लावला. आज औरंगाबाद हे एक मॅच्युअर औद्योगिक शहर म्हणून उदयास आले आहे. शेंद्र्यात उद्योग येत आहेत आणि येणाºया काळात बिडकीनलाही उद्योग येतील.
  डी.एम.आय.सी. क्षेत्रात शेंद्रा-बिडकीन विभागाचा समावेश आहे.
  जपान सरकार महाराष्ट्रात त्याच्या खर्चाने एक स्मार्ट सिटी उभी करणार आहे. त्यासाठी औरंगाबाद-बिडकीन भागाची निवडही झाली आहे. गेल्या वर्षभरात काही गोष्टी थांबून राहिल्या आहेत याची मला जाणीव आहे. इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरचा महत्त्वाचा प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राज्य सरकार यामध्ये निश्चित लक्ष घालेल. नुकतेच प्रख्यात उद्योगपती रतन टाटा शहरात येऊन गेले. त्यांनीही या शहराच्या उद्योगकतेला सलाम केला. आयटी वगळता येथे सर्व काही आहे आणि आयटीतही आपण लवकरच भरारी घेऊ, असा मला विश्वास आहे.
  येती एक-दोन वर्षे आव्हानात्मक असतील; पण येथील उद्योजकांच्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे.
  सर्व अडचणींवर मात करून ते निश्चितच प्रगतिपथावर चालत राहतील.
  परत एकदा आॅटो क्लस्टरच्या उद्घाटनाबद्दल मी सर्व उद्योगांचे आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो.
  धन्यवाद! जयहिंद, जय महाराष्ट्र..
 • होळीनिमित्त जनतेला शुभेच्छा
  तारीख :  ८ मार्च २०१२
  ठिकाण  :  औरंगाबाद
  कार्यक्रम :  होळी

  शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडून 
  होळीनिमित्त जनतेला शुभेच्छा

  होळीच्या दिवशी अनिष्ट रूढी-परंपरांचीच होळी करायची असा संकेत जरी असला तरी केवळ एवढ्यापुरतेच होळीचे महत्त्व असू नये. या दिवसाच्या निमित्ताने वाईट गोष्टींचा त्याग करताना काही चांगले संकल्पही आपण करायला काय हरकत आहे? तरुणाईला या निमित्ताने एक विशेष संदेश द्यावा वाटतो, तो म्हणजे आजच्या दिवशी रंगांचीच उधळण व्हावी, आयुष्य बेरंग करणा-या व्यसनांना तिलांजली  मिळाली तरच आयुष्यातले सारे रंग फुलतील. व्यसनांसोबत कोणत्याही आमिषाला आपण बळी पडू नये... जीवनाचा मार्ग शोधताना रंगांचा उत्सव कायम तुमच्या आयुष्यात फुलावा हीच या निमित्ताने समस्त तरुणाईला माझ्या शुभेच्छा! सर्व शहरवासीयांना माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 • राज्य शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात केलेले भाषण
  तारीख :  ५ सप्टेंबर २०११
  ठिकाण :  औरंगाबाद
  कार्यक्रम :  शिक्षक दिन

  शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी 
  राज्य शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात केलेले भाषण

  राज्यातील सर्व आदर्श गुरुजनांचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. राजेश टोपे, शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. फौजिया खान, आ. विक्रम काळे, आ.डॉ. कल्याण काळे, आ. सतीश चव्हाण, आ. एम.एम. शेख, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. संजय वाघचौरे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सुमीत मलिक, व्यासपीठावर व समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो.
  आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आपणास सर्वांना मनापासून शुभेच्छा देत आहे. ५ सप्टेंबर हा भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय परंपरेतील थोर तत्त्वज्ञ, प्रगल्भ विचारवंत, समर्पित शिक्षक आणि क्रांतिदर्शी, राजनीतिज्ञ असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व होते. भारतातील श्रेष्ठ गुरू परंपरेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे ख-या अर्थाने आदर्श गुरू होते. 
  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनदृष्टीतील काही भाग आत्मसात केला आणि तो विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, अशा सर्व आदर्श गुरुजनांचे मी अभिनंदन करतो. कोणत्याही समाजाची उन्नती आणि विकास त्या समाजातील ज्ञानाच्या विकासावर आधारित असतो आणि ही ज्ञानसाधना करणारे गुरुजन ज्या राष्ट्रात समर्पित भावाने कार्य करतात ते राष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असते. 
  याप्रसंगी गुरुजनांबद्दल माझ्या भावना व्यक्त करीत असताना माझे शाळेतील दिवस मला आठवतात. माझे उच्च शिक्षण इंग्लंडसारख्या विकसित देशात झाले असले तरी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून झालेले आहे. हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. ज्यांनी झाडाखाली, चावडीत, पारावर विद्यार्थी घडविण्याचे काम केले. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून आजचा संख्यात्मक व गुणात्मक शिक्षणाचा विकास आपल्यासमोर आहे. साधनांच्या अभावामुळे शैक्षणिक विकास थांबू शकत नाही हे ज्या गुरुजनांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केले आहे. हे सर्व हाडाचे शिक्षक होते. तुकारामांच्या भाषेत सांगायचे तर
  ‘निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेची फळ ।।’
  मराठवाडा ही संतांची भूमी आहे. संतांच्या या भूमीत वसलेल्या औरंगाबाद शहराला मोठा इतिहास आहे. औरंगाबाद शहराच्या परिसरातील अजिंठा, वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्या, हिंदूंचे श्रद्धास्थान, घृष्णेश्वर जे ज्योतिर्लिंग, अशा प्राचीन धरोहर या शहराचे सांस्कृतिक जीवन समृद्ध करीत आहेत. औरंगाबाद शहराने आधुनिक भारतात कात टाकली असून, ते एक औद्योगिक केंद्र व या विभागातील विद्याकेंद्र म्हणून समर्थपणे विकसित होत आहे. 
  अशा या माझ्या कर्मभूमीत आपणा गुरुजनांचा सत्कार करण्याचा योग लाभणे हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. आपला भारत देश हा शेतीप्रधान खंडप्राय देश आहे. सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असणारा देश आहे. आज सर्वात जास्त तरुण या देशात आहेत. 
  जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सबंध जग दहशतवाद, हिंसाचार, शस्त्र स्पर्धा, पराकोटीची विषमता अशा अनेक अक्राळ-विक्राळ समस्यांना समोरे जात आहे. शिक्षणविषयक चिंतन करताना शिक्षणविषयक विचारांवर समस्यांचा प्रभाव पडणे अपरिहार्य आहे. 
  राज्यात सर्वदूर शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यावरच समाधान मानन्यासारखी स्थिती नाही. शिक्षणाच्या संख्यात्मक विस्ताराबरोबर शिक्षणाचा गुणात्मक विकासही साधण्याची नितांत आवश्यकता आहे. 
  वैश्विकीकरणाच्या प्रक्रियेबरोबर जग आज छोटे होत आहे. उद्याचा समृद्ध भारत घडवायचा असेल तर त्याचा मार्ग शिक्षणाच्या गुणात्मक विकासातून जातो, यावर माझ्या दृढ विश्वास आहे. शाळांमधून केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधणे शक्य नाही, याची जाणीव सर्व सुज्ज्ञ शिक्षकांनाही आहे. 
  शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास साधणे, समाजाचे राहणीमान उंचावणे, व्यक्तीचा आत्मसन्मान वाढविणे व स्वातंत्र्याचा आस्वाद घेता येईल, अशी समाजरचना निर्माण करणे आवश्यक आहे. मला खात्री आहे, सर्व शिक्षकांनी जर निश्चय केला की, आम्ही असे विद्यार्थी घडवणारच तर हे लक्ष्य आमच्यापासून कोणीही दूर नेऊ शकणार नाही.
  आज या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याचा आढावा घेणे मी अगत्याचे मानतो. राज्यात आज ७५,४६६ प्राथमिक शाळा सुरू असून, या शाळांमधून इयत्ता पहिली ते बारावी या वर्गांमध्ये २ कोटी १७ लाख एवढी मुले शिक्षण घेत आहेत. राज्य शासनाने राज्यात यापूर्वीच दहावीपर्यंत सर्वांना नि:शुल्क शिक्षणाची योजना सुरू केली आहे. तसेच मुलींना बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. राज्यात साधारणपणे ५ कि़मी.च्या क्षेत्रात माध्यमिक शाळा उपलब्ध करून दिल्या असून, त्यांची संख्या १९,६७६ इतकी आहे. तसेच राज्यात ७,२४१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत.
  सर्वशिक्षा अभियान व शालेय पोषण आहार तथा राज्य शासन प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात राबवीत असलेल्या विविध योजनांचा परिपाक म्हणून आज राज्यातील इयत्ता सातवीपर्यंत गळतीचे प्रमाण ७.५८ टक्के इतके खाली आले आहे.
  हे गळतीचे प्रमाण ०.० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी आपण सर्वांनी निर्धार करणे आवश्यक आहे.
  शिक्षण व्यवस्थेत कालसुसंगत बदलांचीही आवश्यकता असते. राज्यातील विद्यार्थी देशाच्या व जागतिक पातळीवर समक्ष ठरवावेत या दृष्टीने गणित आणि विज्ञान हे विषय राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार बदलण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववी या वर्गासाठी हा बदल लागू करण्यात आला असून, सन २०११-१२ मध्ये इयत्ता दहावी व अकरावी या वर्गाच्या गणित व विज्ञानाचे उच्चीकरण करण्यात आले असून, सन २०१२-२०१३ मध्ये इयत्ता बारावीच्या गणित व विज्ञानात बदल करण्यात येणार आहे.
  राज्य शासनाने इयत्ता १० वीसाठी समानीकरण व विद्यार्थ्यांचा ताण-तणाव कमी करण्याच्या हेतूने बेस्ट-५ चा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे राज्य   शासनाला दिलासा दिला होता. 
  सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मोफत स्वाध्याय पुस्तिका, पाठ्यपुस्तके मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली. 
  राज्य शासनाने चालू आर्थिक वर्षात शालेय शिक्षणासाठी २७,५२० कोटी एवढी भरीव आर्थिक तरतूद केलेली आहे. मागील दहा वर्षांत राज्याचा शिक्षणावरील खर्च राज्याच्या एकूण खर्चाच्या १३ ते १९ टक्क्यांदरम्यान राहत आलेला आहे. चालू वर्षी तो २२.६६ टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे.
  राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक शुल्काचे नियमन करण्याच्या दृष्टीने सर्व स्तरांतून मागणी होती. मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की, विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन हा कायदा एकमताने पारित केला आहे. 
  राजीव गांधी विमा योजनेची पुनर्रचना करण्यात आली असून, राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी हा शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असून, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीसच या परीक्षांचे वेळापत्रक, मुलांच्या हाती देण्याचाही निर्णय चालू शैक्षणिक वर्षापासून घेण्यात आला आहे.
  राज्यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शाळेत तीन वर्षे नियमित शिक्षणसेवक पदावरील सेवा पूर्ण करून नियमित शिक्षकपदावर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना पुनर्नियुक्ती देताना यापुढे पुन्हा शिक्षणसेवक पदावर नियुक्ती न देता नियमित शिक्षकपदावर नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
  राज्यातील सीमा भागातील १०१ प्राथमिक मराठी शाळांना व १७ माध्यमिक मराठी शाळांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  नोव्हेंबर, २००५ पूर्वी शिक्षणसेवक पदावर नियुक्ती झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  शिक्षणाच्या गुणात्मक विकासाचा भाग म्हणून यावर्षी इयत्ता १० वी १२ वीच्या परीक्षांमध्ये होणा-या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभाग, महसूल विभाग व गृह विभागाच्या समन्वयातून प्रभावी कामगिरी करण्यात आली आहे.
  राज्यात मराठी शाळांच्या मान्यतेच्या दृष्टीने बृहत् आराखडा तयार करण्यात आला असून, त्यावर लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. 
  कायम शब्द काढलेल्या शाळांचे मूल्यांकन निकष ठरविण्याबाबतची कार्यवाही सुरू असून, लवकरच याबाबतचे निकष अंतिम करण्यात येतील.
 • स्टार माझातर्फे आयोजित मराठवाडा व्हिजन-२०२० मध्ये केलेले भाषण
  तारीख : ११ फेब्रुवारी  २०११
  ठिकाण : हॉटेल ताज रेसिडेन्सी, औरंगाबाद
  कार्यक्रम : स्टार माझातर्फे आयोजित मराठवाडा व्हिजन-२०२० कार्यक्रम

  शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  स्टार माझातर्फे आयोजित मराठवाडा व्हिजन-२०२० मध्ये केलेले भाषण

  * मराठवाडा व्हिजन-२०२० म्हणजे येत्या दहा वर्षांत मराठवाड्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचे स्वप्न.
  * मराठवाडा व्हिजन-२०२० याबाबत चर्चा करताना प्रथम महाराष्ट्राच्या विकासाची सद्य:स्थितीची माहिती नमूद करणे आवश्यक वाटते.
  * महाराष्ट्र राज्य देशामध्ये लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुस-या क्रमांकावर असून, विकासाच्या दृष्टीने विविध क्षेत्रांत अग्रेसर आहे.
  * महाराष्ट्र राज्याचे सरासरी दरडोई उत्पन्न (५४,८६७) देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या (३१,८२१) खूपच जास्त असून, देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १३ टक्के आहे. राज्याचे औद्योगिक उत्पादन देशाच्या एकूण उत्पादनाच्या १/५ असून, रोजगारनिर्मितीत १४ टक्के वाटा आहे. तसेच देशातील विद्युतनिर्मितीपैकी ११ टक्के, निर्यातीमध्ये २७ टक्के, रोजगार निर्मितीत २० टक्के वाटा आहे. तसेच मानवीविकास निर्देशांकात राज्य देशपातळीवर चौथ्या क्रमांकावर आहे. एकंदरीत राज्य विविध क्षेत्रांत देशपातळीवर अग्रेसर असल्याचे दिसून येते.
  * महाराष्ट्र राज्य देशपातळीवर जरी विविध क्षेत्रांत अग्रेसर असले तरी राज्याच्या तुलनेत मराठवाड्याचा विचार करणे आवश्यक आहे. मराठवाड्याची एकूण लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार १ कोटी ५६ लाख असून, महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी त्याचे प्रमाण १६.१५ टक्के आहे.
  * राज्याचे दरडोई उत्पन्न ५४,८६७ असून, मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न खूपच कमी म्हणजे ३४,५३८ आहे.
  * मानवविकास निर्देशांक हा प्रामुख्याने सरासरी आयुष्यमान व आरोग्यपूर्ण जीवन, साक्षरतेचा दर, दरडोई स्थूल उत्पन्न व क्रयशक्ती या मुद्यांच्या आधारे ठरविला जातो. सध्या राज्याचा सरासरी मानवविकास निर्देशांक ०.५८ असून, मराठवाड्याचा हा राज्याच्या सरासरीपेक्षा खूपच कमी म्हणजे ०.३७ टक्के आहे. त्यातही केवळ औरंगाबाद जिल्ह्याचा मानवविकास निर्देशांक सरासरीएवढा आहे.
  * महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर विविध विभागांतर्गत अनुशेष काढण्यासाठी शासनाने दांडेकर समितीची १९८३ मध्ये स्थापना केली, तर माननीय राज्यपालांनी निर्देशांक व अनुशेष समितीची १९९४ मध्ये स्थापना केली. सन १९८४ ते ९४ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये मराठवाड्याचा अनुशेष कमी होण्याच्याऐवजी २३.५६ टक्क्यांवरून ३०.१३ वाढला, तर उर्वरित महाराष्ट्राचा अनुशेष ३७.३२ टक्क्यांवरून २४.५४ टक्के कमी झाला.
  कृषी व फलोत्पादन
  * महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचे लागवडीयोग्य क्षेत्र २७ टक्के असून, मराठवाडा हा शेती उत्पादनावर आधारित एक महत्त्वाचा विभाग आहे. मराठवाड्यात ज्वारी, बाजरी, गहू, मका या अन्नधान्य पिकांप्रमाणेच अलीकडच्या काळात ऊस, कापूस, सोयाबीन या नगदी पिकांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
  * मराठवाड्यामध्ये फळबागांच्या क्षेत्रामध्ये वाढ होत असून, अलीकडच्या काळात औरंगाबाद, बीड व लातूर या जिल्ह्यांत प्रामुख्याने आंब्याची ७ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे.
  * मराठवाड्यातील विविध कृषी उत्पादनांचा विचार करता यावर आधारित साखर, डिस्टिलरी, कॉटन जिनिंग, आॅईल मिल, पल्स मिल इत्यादी उद्योगास मोठा वाव आहे.
  * मराठवाड्यातील शेतक-यांना आधुनिक शेतीचे दालन खुले करून अन्नप्रक्रिया उद्योग उभारून शेतक-यांच्या उत्पादनाला व्हॅल्यू अॅडिशन करण्याचे महत्त्वाचे काम येत्या दहा वर्षांत करावे लागणार आहे.
  दुग्ध व्यवसाय
  * मराठवाड्यात ११ लाख मे. टन दुधाचे उत्पादन होते. मात्र, मराठवाड्यात दुग्ध उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग अत्यंत नगण्य असल्याने या क्षेत्रात खूप मोठा वाव आहे.
  सिंचन
  * महाराष्ट्रातील एकूण पाण्याच्या उपलब्धतेच्या प्रमाणात मराठवाड्याची उपलब्धता केवळ ७ टक्के आहे. तसेच महाराष्ट्रात लागवडीखालील क्षेत्राच्या प्रमाणात सिंचन क्षेत्राचे प्रमाण १७.८ टक्के असून, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड हे जिल्हे राज्याच्या सिंचन क्षेत्राच्या सरासरीपेक्षाही कमी आहे.
  * कृष्णा खोरेअंतर्गत सिंचन प्रकल्पात सद्य:स्थितीत २५ अब्ज घनफूट पाणी वापरात असून, अतिरिक्त २५ अब्ज घनफूट पाणी वापरास परवानगी दिलेली आहे. सदरच्या प्रकल्पांतर्गत जवळपास २,३०० कोटींची कामे हाती घेतली असून, याचा फायदा अवर्षणप्रवणग्रस्त उस्मानाबाद व बीड जिल्ह्यास होणार आहे.
  * मराठवाड्यात एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र अवर्षणप्रवणग्रस्त असून, साधारणत: ८,५०० गावांपैकी ३,२०० गावे यामध्ये येतात. सद्य:स्थितीत मराठवाड्यात लघु, मध्यम व मोठी अशी एकूण ५५६ प्रकल्प असले तरी या अवर्षणप्रवण गावांमध्ये जलसंधारणाची कामे येत्या काळात घेणे आवश्यक आहे.
  * वनराई- मराठवाड्यात एकूण ४.६ टक्के वनक्षेत्र आहे. हे दारुण चित्र सुधारण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण वाढवू. आपली जमीन तितकीशी सुपीक नाही. एकंदरीत पाण्याचे प्रमाण कमी आहे, तरी कडुलिंब, कारंज, शिसू, ग्लायरिसिडिया ही झाडे रस्त्याच्या, रेल्वे रुळांच्या बाजूला, ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत आपण लावू शकतो.
  दळणवळण-
  * रस्ते- रस्ते विकासाचा विचार करता मुंबई, पुणे, औरंगाबाद, जालना हा मार्ग चारपदरी झालेला आहे. तथापि, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड ही जिल्ह्याची ठिकाणे चार पदरी मार्गाने जोडण्याचा कार्यक्रम येत्या काळात होणे आवश्यक आहे. तसेच औरंगाबाद- नाशिक- मुंबई हा मार्ग संपूर्ण चारपदरी होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच औरंगाबाद शहरातील अंतर्गत रस्ते चांगल्या दर्जाचे तसेच शहराबाहेरील वळण रस्ते तातडीने होणे गरजेचे आहे.
  रेल्वे-
  * मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड,   परभणी, लातूर, उस्मानाबाद ही जिल्ह्यांची ठिकाणे रेल्वेमार्गाने जोडलेली आहेत. तथापि, भावी काळात विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा परळी- बीड- नगर हा रेल्वेमार्ग होणे अत्यंत आवश्यक आहे, तसेच सोलापूर- उस्मानाबाद- जालना- खामगाव या रेल्वेमार्गाची मागणी आहे.
  विमानसेवा-
  * सध्या मराठवाड्यामध्ये औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची विमाने उतरण्यासाठीची सुविधा असलेले व लातूर व नांदेड येथेही विमानतळाची सुविधा आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय विमाने, तसेच नागपूर, पुणे, हैदराबाद या शहरांशी जोडणारी विमानसेवा भावी काळात आवश्यक आहे.
  मराठवाड्यातील औद्योगिक विकासाची सद्य:स्थिती
  * महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत मराठवाड्यामध्ये एकूण ३४ औद्योगिक क्षेत्र आहेत. प्रमुख औद्योगिक क्षेत्रांत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, कृष्णूर (नांदेड), जालना, लातूर इत्यादींचा समावेश होतो.
  * मराठवाड्यातील एकूण १०,२३७ भूखंडांपैकी ६,५७७ वर कारखाने उभे राहिले आहेत.
  * व्हिजन-२०२० साध्य करायचे असेल तर नवीन उद्योग आणावे लागतील. त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी भूसंपादनाचे कार्य चालू आहे.
  * एकूण २३ नवीन किंवा अतिरिक्त औद्योगिक वसाहती मराठवाड्यात उदयास येत आहेत. यासाठी ७,१८० हेक्टर जमीन संपादन करण्याची कार्यवाही चालू आहे.
  * यात (आकडे हेक्टरमध्ये) - बिडकीन- २,३६२, अतिरिक्त शेंद्रा- ८१३, अतिरिक्त वाळूज- ३४३, अतिरिक्त नांदेड- २३१, मुदखेड- २९७, अतिरिक्त परभणी- ७०२, भोकर- २६१, अतिरिक्त लातूर- १,०८२, कळंब-उस्मानाबाद- २४२, कौडगाव- ३७०, जालना- २६१ या वसाहतींचा समावेश आहे.
  * मराठवाड्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे उद्योग यांची सद्य:स्थितीतील माहिती
  एकूण सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग - युनिट-११,७१९, रोजगारनिर्मिती- ८७,९३५, गुंतवणूक- १,३१५ कोटी.
 • छत्तीसाव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन समारंभात केलेले भाषण
  तारीख : दि. ३ फेब्रुवारी २०११
  ठिकाण : परभणी
  कार्यक्रम : राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन

  शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  छत्तीसाव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन समारंभात केलेले भाषण

  या छत्तीसाव्या राज्यस्तरीय विज्ञान परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. फौजिया खान, खा. गणेश दुधगावकर, आ. सुरेश देशमुख, आ. बंडू जाधव, आ. मीरा रेंगे, आ. विक्रम काळे, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के.पी. गोरे, भाभा विज्ञान केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर आगरकर, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी. वळवी, समोरील सर्व मान्यवरांचं आणि माझ्या विद्यार्थी मित्रांचं, भावी वैज्ञानिकांचं मी हार्दिक स्वागत करतो.
  या छत्तीसाव्या राज्यस्तरीय विज्ञान परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी जमलेल्या सर्व मान्यवरांचं आणि माझ्या विद्यार्थी मित्रांचं, भावी वैज्ञानिकांचं मी हार्दिक स्वागत करतो.
  परभणीचं हे कृषी विद्यापीठ वैज्ञानिक रीतीनं शेतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतं. 
  १८ वर्षांपूर्वी परभणीमध्येच १८ वं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरलं होतं. आज १८ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या सुवर्ण जयंती वर्षात या विज्ञान प्रदर्शनाच्या भव्य १२० दालनांचं उद्घाटन माझ्या हातून व्हावं, याचा मला मनापासून आनंद होत आहे. 
  इथे जमलेल्या माझ्या छोट्या वैज्ञानिक मित्रांना चांगलं माहीत आहे की, विज्ञान काय आहे. विज्ञान हा नुसता एक विषय नाही, तर आधुनिक युगाच्या प्रगतीचा प्राण आहे. खरेपणा पडताळून पाहण्याची, सत्याचा शोध लावण्याची आणि नवीन नवीन संशोधनं करण्याची ही एक वृत्ती आहे.
  तुम्हाला आर्किमेडिस, न्यूटन, मादाम क्युरी यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ तर माहितीच आहेत. याशिवाय सी.व्ही. रमन, होमी भाभा, जगदीशचंद्र बोस, सुब्रमण्यम चंद्रशेखर, विक्रम साराभाई, हरगोविंद खुराणा, सत्येंद्रनाथ बोस हे महान भारतीय शास्त्रज्ञसुद्धा परिचयाचे असतीलच आणि या सर्वांचं नाव घेताना आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आपण कसं विसरू शकू? मुलांवर आणि विज्ञानावर खूप प्रेम करणारा, सृजनशील शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही सगळे त्यांना ओळखताच!
  अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनांची सुरुवात १९७१ साली आपल्या देशात झाली. आपल्या महाराष्ट्रात १९७५ साली पहिलं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरलं. 
  १९८८ सालापासून बालकांकरिता जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन भरवलं जाऊ लागलं. तुम्हाला माहीत असेल की, राज्यातून या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी शासनमान्य शाळांमधून ३५४ वैज्ञानिक प्रयोग किंवा वस्तू निवडल्या जातात. यामधल्या २० विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनीय साहित्याला, शिक्षकांच्या ५ शैक्षणिक साहित्याला आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या ५ प्रयोग साहित्याला शासनातर्फे रोख पारितोषिकं दिली जातात.
  एनसीईआरटीने या छत्तीसाव्या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी ज्या विषयाची निवड केली आहे, तो आहे ‘‘जीवनातील आव्हानांसाठी विज्ञान व तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर चॅलेंजेस इन लाईफ.’’ यात जैवविविधता (बायोडायव्हरसिटी), हरित ऊर्जा (क्लीन एनर्जी), कृषी तंत्रज्ञान, वाहतूक, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण हे आपल्या जीवनाशी अतिशय जवळचे असणारे विषय येतात.
  मुलांनो, तुम्ही राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आला आहात. तुमच्या गावातल्या, तुमच्या शहरातल्या गरजा, अडचणी वेगवेगळ्या असतील. कुठे पाण्याची समस्या, कुठे वीज कमी-जास्त प्रमाणात असेल. पावसाचं पाणी कसं साठवायचं, पीक कसं वाढवायचं, ग्लोबल वॉर्मिंग कसं कमी करायचं, स्वच्छ ऊर्जा, इंधन कसं बनवायचं याचा तुम्ही मनापासून विचार करायला हवा. तुम्हाला माहीत आहे की, विज्ञानाच्या दोन बाजू आहेत. एक वाढ आणि विकास घडवून आणणारी आहे, तर दुसरी बाजू चुकीच्या विचारांच्या माणसांच्या हातात सर्वांना विनाशाकडे नेणारी आहे.
  अलीकडच्या दोन दशकांत संगणक (कॉम्प्युटर), मोबाईल आणि इंटरनेट या वैज्ञानिक शोधांनी जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे;  पण ज्या संगणकाचा उपयोग तुम्ही शिक्षणासाठी, प्रगतीसाठी करता, तेच संगणक, मोबाईल अतिरेकी भयंकर आतंकवादासाठी वापरतात. तुम्ही इथे जमलेले सगळे भावी वैज्ञानिक आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी, समाजाच्या भल्यासाठीच विज्ञानाचा उपयोग करा, असं माझं तुम्हाला कळकळीचं आवाहन आहे. महाराष्ट्रात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण साधण्याच्या हेतूने शासनाने मोठ्या प्रमाणात शाळा सुरू केलेल्या आहेत. राज्यात ७५,४६६ प्राथमिक, १९,७६७ माध्यमिक व ६६१० उच्च माध्यमिक शाळा आहेत. 
  महाराष्ट्रात इ.  पहिली ते आठवीची १.५९ कोटी इतकी पटनोंदणी असून त्यापैकी ७५ लक्ष इतक्या मुली आहेत. इ. पहिली ते बारावीची राज्यातील पटनोंदणी २.१६ कोटी इतकी आहे.  शालेय शिक्षणावर राज्य शासन एकूण २४,१०८ कोटी इतका खर्च करीत असून राज्याच्या अर्थसंकल्पात या खर्चाचे प्रमाण १९.८१ टक्के इतके आहे. यावरून राज्याच्या शालेय शिक्षणाची व्याप्ती आपल्या लक्षात येऊ शकते. मॅक्समुलरने भारताचे केलेले वर्णन विचारात घेता, आजच्या भारतीय समाजासमोरील असलेल्या सामाजिक, आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण सर्वांनी अथक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
  या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांच्या विज्ञान वस्तू/ साहित्याची निवड झाली आहे त्यांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर मी अपेक्षा करतो की, ही सर्व मुले आपापल्या शाळांमध्ये त्यांच्या या वैज्ञानिक दृष्टीचा विस्तार आपल्या वर्गमित्रांमध्ये करतील. 
  विद्यार्थी मित्रांनो, राजमार्गावर सगळेच लोक चालत असतात, पण जेथे पाऊलवाटही गेली नाही, त्या ठिकाणी आपण पाऊल ठेवून नवा मार्ग समाजाला दाखवून दिला पाहिजे. आपल्यात दडलेल्या संशोधकाला जागे करा. बघा जीवन किती आनंदमय होईल.
  माझ्या दृष्टीने सत्याचा सातत्याने घेतलेला शोध म्हणजेच विज्ञान!
  संत तुकारामांनी आपल्या परखड वाणीत सांगितले-
  सत्य-असत्याशी मन केले ग्वाही ।
  मानियले नाही बहुमता ।।
  समाजासमोर आज असलेल्या समस्यांची उकल करण्यासाठी ज्या- ज्या क्षेत्रात संशोधनाची गरज आहे, ती क्षेत्रे निवडणे, त्यात सातत्याने संशोधन सुरू ठेवणे, संशोधनातून जनसामान्यांना उपयुक्त ठरेल   अशा तंत्रज्ञानाचा विकास करणे, यासाठी मोठे कार्य करण्याची गरज आहे.
  आधुनिक युग हे विज्ञान युग असून विज्ञानाच्या क्षेत्रात जे अग्रेसर राहतील, तेच निर्विवादपणे जागतिक स्पर्धेतही अग्रेसर राहतील.
  माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुढे चालून विज्ञान शाखेची पदवी मिळवा, नाहीतर कला शाखेची, पण आयुष्य जगताना वैज्ञानिक, शास्त्रोक्त दृष्टिकोन ठेवा. 
  ‘जिंदगी की राहों में जब आगे जाओगे
  पिछे इक साया हमेशा पाओगे
  मुडकर देखोंगे तो तन्हाई होगी मगर
  महसूस करोगे तो हमें भा साथ पाओगे’
  मित्रांनो, तुमच्यामध्ये मला कुणी भावी आइन्स्टाईन दिसतो, तर कुणी होमी भाभा! कुणी मेरी क्युरी, तर कुणी विक्रम साराभाई, पण असे मोठे वैज्ञानिक झालात तरी माणुसकी विसरू नका. आपला चांगुलपणा, सौंदर्यदृष्टी, विनम्रता, रसिकता हे गुण जपून ठेवा.
  आणि लक्षात ठेवा, तुमच्या या लढ्यात मी तुमच्या पाठीशी आहे.
 • कै. वसंतराव नाईक यांच्या ३१ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात केलेले भाषण
  तारीख :  १८ आॅगस्ट २०१०
  ठिकाण :  वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद 
  कार्यक्रम :  कै. वसंतरावजी नाईक यांचा ३१ वा स्मृतिदिन समारंभ

  उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  कै. वसंतराव नाईक यांच्या ३१ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात केलेले भाषण

  या कार्यक्रमाला उपस्थित अन्न व औषधी प्रशासन मंत्री माननीय मनोहरराव नाईक, महात्मा फुले विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश मार्इंदे, कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष आमदार डॉ. एन.पी. हिराणी, आमदार शंकरअप्पा धोंडगे, आ. विजयराव खडसे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, विजय पाटील चोंढीकर, अ‍ॅड. अनंतराव देवसरकर, नगराध्यक्ष वर्षा गंधेवार, वसंतराव नाईक कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. नीलय नाईक, जय नाईक, ययाती नाईक, इंद्रनील नाईक, के.डी. जाधव, व्यासपीठावर व समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो.
   महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते आदरणीय माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम मनोभावे वंदन करतो. आज वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्रातील निवडक शेतकरी आणि कृषिशास्त्रज्ञांचा येथे सत्कार करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी आपण मला आमंत्रित केले, त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांचा आभारी आहे.
  महाराष्ट्र राज्य स्थापनेचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सध्या महाराष्ट्र देशात अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत कै. वसंतराव नाईक यांचा फार मोठा वाटा आहे. कै. वसंतराव नाईक  यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या काही योजना आखल्या, नियोजन केले, हरितक्रांतीची बीजे रोवली त्याची फळे आज आपण चाखत आहोत, हे आजच्या प्रसंगी मी आवर्जून सांगू इच्छितो.
  कै. वसंतराव नाईक यांनी शेतीला केंद्रबिंदू मानून हरितक्रांतीची  योजना राज्यभर राबविली, नवे शास्त्रीय ज्ञानविज्ञान व जगभराचे नवे संशोधन ग्रंथित करून त्यासाठी चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली, अन्नधान्य व कडधान्य यामध्ये संकरित वाणांचे नवीन संशोधनाद्वारे हायब्रीड पीकपद्धती अवलंबून उत्पन्नात अभूतपूर्व उच्चांक गाठला, सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाटबंधारे योजना हाती घेतल्या, ख-या अर्थाने याचे श्रेय कै. वसंतराव नाईक यांच्याकडे जाते. 
  कै. सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळात राज्यातील कोरडवाहू शेतक-यांना शाश्वत उत्पादनासाठी पाणलोट विकास हा एकमेव पर्याय आहे हे जाणून कै. नाईक यांनी जलसंधारणाचा धडक कार्यक्रम १९९३ मध्ये सुरू केला. त्याबरोबर शासनामध्ये  या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता जलसंधारण हे खाते नव्याने सुरू करण्यात आले. आज हा पाणलोट विकासाचा कार्यक्रम   स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानसारख्या संस्थांनी पुढे येऊन आणखी मोठ्या प्रमाणावर पाणलोट क्षेत्र विकासाचे काम हाती घ्यावे व त्याचा फायदा विदर्भातील शेतक-यांना निश्चितपणे होईल.
  वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शेती आणि शेतीशी निगडित विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. शेती, सामाजिक आणि ग्रामीण विकास अशा क्षेत्रात गेली तीन दशके कार्य करणा-या या प्रतिष्ठानने अनेक विधायक कामे पार पाडली आहेत. 
  प्रतिष्ठानने शेतक-यांसाठी प्रशिक्षण शिबीर, कृषी प्रदर्शन, पशुसंवर्धन आयोजित करण्यासारखी महत्त्वपूर्ण कार्ये केली आहेत. खास शेतक-यांसाठी वाचनालय सुरू केले आहे, ही अतिशय कौतुकाची बाब आहे.  शेतीबरोबरच प्रतिष्ठानने आरोग्याच्या क्षेत्रातही रोगनिदान शिबिरे, रक्तगट चाचणी शिबिरे, नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, बालरोग निदान शिबिरे इत्यादी उपक्रम हाती घेतले आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठानने केलेले हे कार्य अत्यंत महत्त्वाचे व मोलाचे आहे. शेती, आरोग्य याबरोबरच शेतक-यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, बचतगट प्रशिक्षण कार्यक्रम प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येतात. या कार्याचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांना मिळावा व त्याची व्याप्ती वाढावी, अशी माझी सदिच्छा आहे.
  शेती भारतीय अर्थकारणाचा आधार आहे. कृषी आणि पूरक उद्योगाचा राष्ट्रीय उत्पादनातील वाटा सुमारे १८ टक्के आहे. शेतीमध्ये गुंतलेले मनुष्यबळ ६० टक्क्याच्या आसपास आहे. देशातील सुमारे सत्तर कोटी लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार देणा-या शेती क्षेत्राला भारतीय अर्थ आणि समाज व्यवस्थेत अनन्यसाधारण असे स्थान आहे.
  आज भारतीय आणि महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत.
  कमी उत्पादकता, जमीनधारणेचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. (सध्या सरासरी २.२१ हेक्टर) आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्याची गरज आहे. पावसावर अवलंबून असल्या कारणाने उत्पादनाची अनिश्चितता, शेतीमालाला मिळणा-या भावाची अनिश्चितता, नवनवीन संशोधनामध्ये वेग वाढविण्याची आवश्यकता, शेतीत दररोज होणारे संशोधन व नवनवीन तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविणे.
  वरील आव्हाने पेलण्याकरिता आपापल्या भागातील हवामान, जमीन, पाण्याची उपलब्धता, बाजारपेठ, तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि भांडवल लक्षात घेऊन शेतक-यांच्या पातळीवर एकात्मिक शेती पद्धतीचे नियोजन करावे लागणार आहे. जोडधंदे किंवा शेतीपूरक शेती व्यवसाय तितकेच महत्त्वाचे आहेत. दुग्धव्यवसाय, शेळीपालन, रेशीम उद्योग, कुक्कुटपालन, वराहपालन, मधुमक्षिका पालन, शेतमाल प्रक्रिया उद्योग यांची चाचपणी त्या दृष्टीने करावी लागेल.
  - तसेच ही आव्हाने पेलण्यासाठी शासनाने विविध विभागाबरोबरच प्रतिष्ठानसारख्या सेवाभावी संस्था, प्रगतिशील शेतकरी, शेती तज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठे या सर्वांनी आणखी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
  महाराष्ट्राने इतर राज्यांच्याही पुढचे पाऊल टाकून कृषी क्षेत्रात नवीन क्रांती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी राज्य शासनाने कृषी सप्तक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यातून नक्कीच महाराष्ट्रात अन्नधान्याची विपुलता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
  राज्य शासनाने आता पारंपरिक शेतीच्या पुढे जाऊन आपण काही पावले उचलली आहेत. फलोत्पादन, फुलोत्पादन, वाईन पार्क, वस्त्रोद्योग, शेती क्षेत्रासाठी विशेष आर्थिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रात नवनवीन धोरणे आखून शेती क्षेत्राचे राज्याने विस्तारीकरण केले आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे फ्लोरीकल्चर   पार्क विकसित केला आहे. या पार्कमध्ये विकसित झालेली फुले आता परदेशात निर्यात होत आहेत आणि देशाला परकीय चलन मिळवून देत आहेत. सांगली आणि नाशिक जिल्ह्यात वाईन पार्कची स्थापना करण्यात आली आहे. या परिसरात उत्पादन होणा-या द्राक्षांचे वाईन निर्मितीमुळे चांगले मूल्यवर्धन होत आहे. बुटीबोरी, कागल, चिंचोली, बारामती आणि यवतमाळमध्ये विकसित होणा-या टेक्सटाईल पार्कमुळे रोजगार निर्मिती होईल, त्याचबरोबर शेतीमालाचे  मूल्यवर्धन होईल.
  राज्याने येत्या ५ वर्षात कृषी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करावी यासाठी व्हिजन-२०१४ ची आखणी केली आहे. यामध्ये खालील बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे.
  - सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी  सेंद्रिय रोपवाटिकांखालील क्षेत्रात वाढ, अडीच लाख बचत गट निर्माण करणे, सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.
  - शेतक-यांना अधिक सक्षम करण्यासाठी कृषी विस्तार सेवा, एस.एम.एस.द्वारे सल्ला, शेतक-यांची उत्पादन कंपनी स्थापन करून त्याद्वारे शेतमालाचे विपणन, शेतीशाळा, कीड व रोगांचे नियोजन व व्यवस्थापन आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत
  - शेतीला पूरक म्हणून रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन यासारख्या उद्योगासाठी ेशेतक-यांना प्रोत्साहन देण्यात येईल.
  - शेतक-यांना कृषी व्यववसायासंबंधी अद्ययावत प्रशिक्षण देणे आणि अ‍ॅग्रो टुरिझमसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे या गोष्टी व्हिजन २०१४ अंतर्गत येत्या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहेत.
  उद्योग खात्याच्या पुढाकाराने राज्य शासनाने नुकताच कृषी औद्योगिक धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे. हा मसुदा तयार करण्यासाठी सचिव व मंत्रिस्तरावर अनेक बैठका झाल्या. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असणा-या राबो बँकेच्या मदतीने कच्चा मसुदा तयार करण्यात आला. या मसुद्यातील सर्व मुद्यावर सर्वंकष चर्चा केल्यानंतर मसुद्याचे माननीय मुख्यमंत्री यांना सादरीकरण करण्यात आले. आता हा मसुदा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर जनता व तज्ज्ञांची मते मागविण्यात आली असून त्याद्वारे राज्याचे सर्वव्यापी धोरण निश्चित करण्यास मदत होईल असा मला विश्वास आहे.
  नवीन कृषी औद्योगिक धोरणाची काही वैशिष्ट्याचा मी उल्लेख  करू इच्छितो. शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) करणे, ज्यामुळे शेतकरी तसेच उद्योजकांचा फायदा होईल. अन्नप्रक्रिया उद्योगांना अनुदान व सवलती देणे. मूलभूत व पायाभूत सुविधांची निर्मिती. केंद्र व राज्याच्या सध्याच्या कर धोरणात सुसूत्रता आणणे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या अमलात येणा-या विविध योजनांमध्ये सुसूत्रता आणणे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अन्नप्रक्रिया उद्योगाचे भवितव्य ओळखून व या क्षेत्रातून होणा-या रोजगार निर्मितीचा विचार करून १० मे २०१० रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या अन्न प्रक्रिया उद्योग कार्यक्रमास मा. केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री श्री. सुबोधकांत सहाय यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेस मी आवर्जून उपस्थित होतो. या कार्यशाळेत अन्नप्रक्रिया उद्योगातील राज्यातील व विशेषत: विदर्भातील गुंतवणूक वाढावी या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
  महाराष्ट्राचा उद्योगमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
  - सामूहिक प्रोत्साहन योजना २००७ मध्ये लघु व मध्यम उद्योगांना पूरक असे महत्त्वपूर्ण बदल.  एक खिडकी योजना, प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन धोरण, औद्योगिक क्षेत्रात गॅस वितरणाचे जाळे तयार करणे.  उद्योग सेतू/ उद्योग भवन. नवीन कृषी औद्योगिक धोरण. उद्योग व कृषी हे परस्पराला पूरक आहेत. उद्योगमंत्री म्हणून मी घेतलेले निर्णय हे कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे निश्चितच पूरक ठरतील व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी निश्चितच मदत होईल.
  महाराष्ट्राच्या कृषी विकासामध्ये भावी काळात आपले सर्वांचे निश्चितपणे योगदान राहील, असा विश्वास व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या कृषी विकासासाठी प्रतिष्ठानचे विविध उपक्रम, शास्त्रज्ञांचे संशोधन, प्रगतिशील शेतकरी यांच्या कार्याला.
  शेतकरी व कृषिशास्त्रज्ञांच्या सहभागाने स्थानिक शेतक-यांच्या उद्बोधनासाठी चर्चासत्र आणि शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नांवर कृषीविषयक परिसंवादास तसेच प्रतिष्ठानच्या कार्याला माझ्या शुभेच्छा.
  धन्यवाद!
 • स्वातंत्र्यदिन समारंभात केलेले भाषण
  तारीख : १५ आॅगस्ट २०१०  
  ठिकाण : अमरावती   
  कार्यक्रम : स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री म्हणून केलेले भाषण

  उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री आणि पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  स्वातंत्र्यदिन समारंभात केलेले भाषण

  या समारंभाला उपस्थित विभागीय आयुक्त दिनेश वाघमारे, जिल्हाधिकारी रुचा बागला, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दलवीर भारती, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस अधीक्षक एस. जयकुमार, प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी, सर्व लोकप्रतिनिधी व मान्यवर नागरिक.
  भारतीय स्वातंत्र्याच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती विभागातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना मला अत्यंत आनंद होत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपले बलिदान दिले आणि त्यांच्या असिम त्यागातून भारत स्वतंत्र झाला त्या सर्व शहिदांना व थोर विभूतींना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो.
  अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपवली ती पूर्ण करण्यासाठी मी दृढसंकल्प केला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा व्हीजन-२०१५ तयार करून त्या दृष्टीने विविध क्षेत्रातील विकासाचे मापदंड ठरवून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधताना मानवी विकास व पायाभूत सुविधांची निर्मिती करणे यावर माझा विशेष भर राहणार आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासोबतच शिक्षण व आरोग्य सेवेचे सार्वत्रीकरण करून सर्वांना लाभ मिळावा यासाठी ई-गव्हर्नसचा प्रभावी वापर करून पारदर्शक व जलद प्रशासन देण्यावर विशेष भर राहणार आहे.
  प्रशासनाबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासोबतच प्रशासनामध्ये पारदर्शकता आणणे, कामांचा जलद गतीने निपटारा करणे आणि नागरिकांच्या प्रश्नांची समाधानकारक सोडवणूक करण्यासाठी ई-जिल्हा प्रशासन ही संकल्पना राबविण्याचा संकल्प आहे. या दृष्टीने तालुका स्तरावर तसेच ग्रामीण जनतेच्या सुविधेसाठी ई-महासेवा केंद्र स्थापन करून प्रशासन लोकांच्या दारी हा उपक्रम राबविण्यावर विशेष भर राहणार आहे. शेतकरी, शेतमजूर, तसेच शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली सेवा या माध्यमातून त्यांच्यापर्यंत सहज व सुलभ पद्धतीने पोहोचविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
  विदर्भात सरासरीपेक्षा २५ टक्के अधिक पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. विभागात १०० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दमदार पावसामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी या प्रमुख पिकांची चांगली स्थिती आहे. मागील तीन वर्षांपासून अपु-या व अनियमित पावसामुळे विभागातील सिंचन प्रकल्प कोरडे पडले होते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती; परंतु ते आज भरून वाहत आहेत. शेतक-यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तसेच तो आत्मनिर्भर व्हावा यासाठी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. 
  राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या विभागातील कोरडवाहू क्षेत्रांसाठी वरदान ठरलेल्या शेततळ्यांच्या कार्यक्रमाला माझ्या शासनाने प्राधान्य दिले असून, विभागात सुमारे १२ हजार ७६७ शेततळी पूर्ण झाली आहेत. कापूस, तूर तसेच संत्र्यासारख्या पिकांना संरक्षित सिंचन म्हणून त्याचा लाभ होत असून, उत्पादनवाढीसही साहाय्यभूत ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत चेक डॅम असो अथवा विदर्भ पाणलोट विकास मिशन अंतर्गत पाणलोट क्षेत्र विकासाची कामे या सर्व कार्यक्रमांमध्ये अमरावती जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला आहे.
  विदर्भातील पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून अधिक उत्पादन देणा-या पिकांना प्राधान्य देणे तसेच नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषी विभागाने विशेष उपक्रम सुरू केला असून, अमरावती जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी माझे विशेष प्रयत्न राहणार आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना नेहमीच मदतीचे धोरण असून नियमितपणे कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत अल्प मुदत पीक कर्जासाठी २५ हजार रुपयांपर्यंत कर्ज घेणा-या शेतक-यांना ४ टक्के व्याज सवलत, तर ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणा-या शेतक-यांना २ टक्के व्याज सवलत शासनाने जाहीर केली आहे. शेतक-यांनी या व्याज सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मी याप्रसंगी करतो.
  मला सांगताना आनंद होतो की, लोककल्याणाच्या विविध योजना राबविताना प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कामामुळे महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यक्रमात जिल्ह्यात सर्वाधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमात ११७ ग्रामपंचायतींना निर्मल ग्राम पुरस्कार, तर २९ ग्रामपंचायतींचे प्रस्तावही अंतिम टप्प्यात   आहेत. यशवंत पंचायतराज अभियानामध्ये देवगाव ग्रामपंचायतीला राज्यात द्वितीय पारितोषिक मिळाले असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या यावली शहीद या गावाला विभागीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. श्री संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियानामध्येही अमरावती जिल्ह्याचे उल्लेखनीय कार्य झाले आहे.
  अमरावती शहराच्या विकासामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरणा-या बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरण व सुशोभीकरणाच्या कामांना गती देण्यात आली असून, जमीन अधिग्रहणाचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. तसेच रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या रेल्वे कोच दुरुस्ती प्रकल्पासाठी रेल्वेला आवश्यक असलेली जागा त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
  अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून तांत्रिक कौशल्य मिळविलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मिशन स्वावलंबन या   महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पांतर्गत १० हजार युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून यापैकी सुमारे एक हजार युवकांनी स्वत:चा रोजगार सुरू केला आहे. 
  जिल्ह्यामध्ये नवीन भांडवली गुंतवणूक यावी तसेच उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ‘उद्योग सेतू’ची स्थापना केली आहे. जिल्हा उद्योग केंद्रामध्ये या उद्योग सेतूमार्फत ठराविक कालावधीत आवश्यक परवानगी सहज व सुलभपणे आता उपलब्ध होत आहे. जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच अन्न प्रक्रिया उद्योग, आॅईल मिल तसेच रेडिमेड गारमेंट उद्योगाचे सुमारे दोनशे समूह तयार करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. त्यामुळे या उद्योगांची गुणवत्ता सुधारून दर्जेदार उत्पादन निर्मिती होऊ शकेल. 
  जिल्ह्यात नवीन उद्योग यावेत यासाठी उद्योजकांना निमंत्रित करून पायाभूत सुविधांची माहिती व्हावी यासाठी उद्योग विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 
  अमरावती शहरातील नागरिकांना चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच पिण्याचे पाणी, भुयारी गटार योजना, अंतर्गत रस्ते, झोपडपट्ट्यांचा विकास तसेच अंबादेवी व एकवीरा देवी या धार्मिक स्थळांच्या परिसराचा  विकास आदी कार्यक्रम राबविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. अमरावती शहर विदर्भाची नव्हे तर राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
  अमरावती जिल्ह्यात २५ लाख झाडे लावण्याचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबिविण्यात येत असून, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात येत आहे. वृक्षारोपणाच्या मोहिमेस लोक चळवळीचे स्वरूप आले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित होणा-या गावाजवळील नदी व नाल्यातील गाळ काढण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने राबविला आहे. तसेच चिखलदरा या पर्यटन स्थळाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या कालापाणी तलावाचे खोलीकरण व क्षमता वाढीसाठी लोकसभागातून महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला आहे.
  नवसंजीवन योजनेच्या माध्यमातून आदिवासी  भागांमध्ये आरोग्य,  रोजगार, कृषी विकास आदी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यास निश्चितच मदत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आदिवासी भागात रस्त्यांचे जाळे निर्माण केल्यामुळे प्रत्येक गावामध्ये मूलभूत सुविधा पुरविणे सुलभ झाले आहे.
  अमरावती शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस विभागातर्फे प्रभावीपणे सुरू आहे. अमरावती शहरात तयार करण्यात आलेल्या विशेष कमांडो पथकामुळे अवैध धंदे तसेच काळाबाजार थांबविण्यासाठी विशेष मदत झाली आहे. सामान्य जनतेला पोलीस प्रशासनातर्फे मिळत असलेल्या सौहार्दपूर्ण वागणुकीमुळे जनमानसात पोलिसांची चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनासही जनतेने सुद्धा सहकार्य करावे, असे आवाहन मी या प्रसंगी व्यक्त करतो.
  जिल्ह्यातील नैसर्गिक  वनसंपदा, समृद्ध जैवविविधता जतन करण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी वन विभागातर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांना जनतेचेही सहकार्य अपेक्षित आहे. पर्यटनाच्या नकाशावर अमरावती जिल्ह्याचे नाव अग्रक्रमावर राहावे यासाठी इको टूरिझमसारख्या उपक्रमाला चालना देण्याला माझा अग्रक्रम राहणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातूनच स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील, असा माझा विश्वास आहे.
  राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात अमरावती जिल्हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रातही विकासाच्या मापदंडामध्ये राज्यात अग्रेसर राहील असा विश्वास व्यक्त करताना अमरावती जिल्ह्यातील जनतेने मला जे सहकार्य आणि प्रेम दिले त्यामुळेच जिल्ह्याच्या विकासाला मी पुढे नेऊ शकलो विकासाचे हे काम यापुढेही सुरू ठेवण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य मिळत राहील, अशी खात्री बाळगतो आणि सर्व जनतेला भारतीय स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो.
  जयहिंद- जय महाराष्ट्र!
 • कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण व भूसंपादन मोबदला वितरण समारंभात केलेले भाषण
  तारीख :  ०२ आॅगस्ट २०१०
  ठिकाण  :  कोल्हापूर
  कार्यक्रम :  कोल्हापूर विमानतळविस्तारीकरण, भूसंपादन मोबदला वितरण कार्यक्रम

  उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण व भूसंपादन मोबदला वितरण समारंभात केलेले भाषण

  या समारंभाला उपस्थित पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र खेबुडकर, संघर्ष समितीचे नारायण पोवार, राजू माने, व्यासपीठावर व समोरील सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो.
  कोल्हापूर व कोल्हापूर परिसरातील उद्योग वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची कोल्हापूर विमानसेवा आणि या सेवेच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाचा अंतिम टप्प्याचा मोबदला धनादेश वितरणाच्या कार्यक्रमास आपण सर्व शेतकरी बांधव उपस्थित राहिलात व या कार्यक्रमास मला निमंत्रित केले, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे. १९३९ साली श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्या दूर दृष्टिकोनातून सुरू झालेला कोल्हापूर विमानतळ हा कोल्हापूरच्या औद्योगिक विकासामधील मैलाचा दगड आहे.
  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेपासून आज अखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महामंडळाने १,९०० हेक्टर क्षेत्रावर ७ औद्योगिक वसाहती स्थापन करून अनेक उद्योगरत्नांना आपल्या कर्तृत्वाला गवसणी घालण्यासाठी मोलाची मदत केली आहे. यामध्ये जवळपास प्रत्येक वर्षी अंदाजित १५,००० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याने कोल्हापूर हे महाराष्ट्रातील कृषी, औद्योगिक, सहकार, सांस्कृतिकरीत्या झपाट्याने प्रगती करीत आहे व म्हणून १९९७ साली जेव्हा राज्य शासनाने या विमानतळाच्या देखभालीची जबाबदारी आपल्यावर घेतली त्यावेळेपासून आज अखेर महामंडळ हे अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडत आहे.
  १९९७ साली हा विमानतळ महामंडळाकडे १५ वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीसाठी म्हणून राज्य शासनाने दिला. महामंडळाने कोल्हापूर विमानतळावर विविध कारणांसाठी अंदाजित रुपये ६ कोटी खर्च केलेले आहेत. सदरचा खर्च हा प्रामुख्याने येथे उपलब्ध असणा-या कर्मचा-यांचे पगार, सुरक्षाव्यवस्थेसाठी आवश्यक असणारी साधने उपलब्ध करून देण्यासाठी, प्रवाशांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादीसाठी खर्च केलेला आहे. मात्र, महामंडळाला यातून फक्त रुपये १.५० कोटी उपलब्ध झालेले आहेत. सन २००४ पासून सुरू असणारी तत्कालीन एअर डेक्कनची सेवा व आजची किंगफिशरची सेवा अविरतपणे चालू राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेल्या परिश्रमाची पोहोचपावती आहे. तथापि, सुरक्षेच्या अनुषंगाने अद्यापही काही गोष्टी आवश्यक असल्यास त्या पुरविण्याबाबत राज्य शासनातर्फे आवश्यक असणा-या सर्व गोष्टी करण्यात येतील.
  या विमानतळ विस्तारीकरणासाठी सर्व भूमिग्रस्तांनी दाखविलेला संयम, त्यांची सकारात्मक भूमिका याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
  कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये आय.टी. पार्क करण्यासाठी ५० हेक्टर जागा यापूर्वीच राखून ठेवलेली आहे. तसेच कोल्हापूर आय.टी. क्षेत्र विस्तारित करण्यासाठी विविध उपक्रमांसाठी सुमारे ५ लक्ष आज रोजी मी मंजूर करीत आहे. या आय.टी. पार्क व विमानतळ विस्तारीकरणामुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासाचे नवे पर्व सुरू होण्यास चालना मिळेल.
  याबरोबर उद्योग विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी विविध प्रकारची ५ क्लस्टर जाहीर केलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सिल्व्हर क्लस्टर, कोल्हापूर चप्पलचे क्लस्टर, टेक्स्टाईल क्लस्टर, गुळाचे क्लस्टर व नुकतेच मंजूर झालेले फौंडी क्लस्टर या सर्वांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका शासनाने घेतलेली आहे. या क्लस्टरमधून अंदाजित रुपये १०० कोटी कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहेत.
  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग विकासासाठी जमीन संपादनाचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले आहेत. यामध्ये अंदाजित १,६०० हेक्टर जमीन संपादित होणार आहे. सदर जमीन संपादन करीत असताना-
  १) शेतक-यांना जास्तीत जास्त मोबदला मिळण्यासाठी जिल्हाधिका-यांनी शेतक-यांच्या बरोबर चर्चा करून  मोबदल्याचे दर ठरविण्याचे अधिकार त्यांना देण्यात आलेले आहेत.
  २) सन २००६ नंतर ज्या जमिनीचे ७-१२ उता-यावर शिक्के पडलेले आहेत, अशा सर्व खातेदारांना त्यांच्या संपादित होणा-या जमिनीच्या १५% जमीन मोबदला दराने उद्योगासाठी परत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
  ३) बागायत जमीन ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी संपादित न करण्याचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे.
  ४) या ठिकाणच्या बाधित शेतक-यांच्या कुटुंबातील एकास विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीक्षम अथवा व्यवसायक्षम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योगवाढीसाठी आवश्यक असणारे प्रयत्न व आवश्यक असणारे सहकार्य राज्य शासनामार्फत दिले जाईल.
  कोल्हापूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांनी माझ्याकडे वारंवार अनेक पश्न सोडविण्यासाठी विनंती केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील प्रश्न आहेत.
  १) कोल्हापूर विमानतळ अद्ययावत करणे : कोल्हापूर विमानतळ हा केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडे २०१२ पर्यंत देखभाल व दुरुस्तीसाठी देण्यात आलेला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत सदरचा विमानतळ हा पुढील ३० वर्षांसाठी राज्य शासनाकडे ठेवावा, अशा प्रकारची विनंती राज्य शासनाने केली असल्याची माझी माहिती आहे.
  २) फौंड्री क्लस्टर : फौंड्री क्लस्टर योजनेंतर्गत फौंड्रीसाठी आवश्यक असणा-या सॅण्ड रिक्लनेशनसाठी शिरोलीमध्ये ५ एकर जागा व कॉमन फॅसिलिटी सेंटरकरिता ३ एकर जागा, तसेच गोकुळ शिरगाव येथे आवश्यक असणारी १० एकर जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  ३) फौंड्री क्लस्टरसाठी १० टक्के अनुदानास मंजुरी मिळणेबाबत : फौंड्री क्लस्टरमध्ये राज्य शासनाचा १० टक्के सहभाग कसा देता येईल हे तपासून निर्णय घेण्यात येईल. प्रदूषणही नियंत्रित होईल, याची मला आशा आहे. तसेच या नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये आवश्यकतेनुसार   सीईटीपी चा प्लांट टाकण्याचा विचार महामंडळामार्फत करण्यात येईल. 
  ४) आयटीआय सुरू करण्याबाबत : प्रत्येक औद्योगिक वसाहतीमध्ये आयटीआय सुरू करण्यासंदर्भात निर्णय हा अत्यंत पुरोगामी निर्णय आहे. 
  ५) प्रत्येक एमआयडीसीमध्ये पोलीस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतलेला आहे.
  ६) ई- गव्हर्नन्सकरिता सर्व औद्योगिक क्षेत्रामध्ये १०० चौ.मी. जागा जिल्हाधिका-यांना उपलब्ध करून देण्यात येईल.
  ७) महामंडळाने उद्योजकांची गैरसोय कमी करण्यासाठी ईआरपी प्रणालीची अंमलबाजवणी सुरू केलेली आहे. ईआरपी प्रणालीमध्ये सिंगल विंडो क्लिअरन्स अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण १९ सेवा देण्यात येत आहेत. त्याचा उपयोग सर्व उद्योजकांनी करून घ्यावा. 
  ८) मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) : सर्व उद्योजकांना त्यांना देण्यात आलेल्या भूखंडाचे सविस्तर माहिती असणारे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय उद्योग विभागाने घेतला आहे.
  कोल्हापूरच्या करवीर निवासिनीच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शाहू महाराजांच्या दूरगामी विचाराने पावन झालेल्या या भूमीत मला येण्याची संधी मिळाली याबद्दल व आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. आपण यापुढेही मला असेच सहकार्य कराल अशी आशा व्यक्त करतो व आपली रजा घेतो.
 • महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वर्धापन दिन कार्यक्रमात केलेले भाषण
  तारीख :  १ आॅगस्ट २०१०
  ठिकाण :   मुंबई
  कार्यक्रम :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वर्धापन दिन

  उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वर्धापन दिन कार्यक्रमात केलेले भाषण

  एमआयडीसीच्या या वर्धापन दिन कार्यक्रमात उपस्थित असलेले माझे सहकारी राज्यमंत्री सचिन अहिर, उद्योग खात्याचे प्रधान सचिव एम.ए. खान, विकास आयुक्त संजय सेठी,  एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शिवाजी, व्यासपीठावर व समोर उपस्थित सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो.
  आज औद्योगिक विकास महामंडळाच्या ४८ वा वर्धापन दिनानिमित्त महामंडळाचे अधिकारी/ कर्मचारी यांना शुभेच्छा! संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकीकरणामध्ये अग्रेसर राज्य असून त्यामध्ये महामंडळाचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना ते पहिल्या क्रमांकावर आहे, हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो. १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळी उद्योगधंद्यांच्या विकासाशिवाय स्वयंपूर्णता येणार नाही हे दूरदृष्टी असलेल्या राज्यकर्त्यांनी ओळखले होते. त्यामुळेच १९६१ साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास कायदा केला आणि त्या कायद्याच्या आधारेच १ आॅगस्ट १९६२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची अर्थात एम.आय.डी.सी. ची स्थापना झाली. एमआयडीसीने संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे कार्य केले आहे. केवळ धावता आढावा घेतला तरी, आजच्या घडीला एमआयडीसीच्या २३३ औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुमारे २२,२४३ उद्योग कार्यरत आहेत व आतापर्यंत महामंडळाच्या ताब्यात सुमारे ५८,८८९ हेक्टर जमीन असून सुमारे ३४,००० हेक्टर जमिनींच्या भूसंपादनासाठी कार्यवाही सुरू आहे.
  महामंडळापुरता विचार करावयाचा झाल्यास आपण आता केलेल्या प्रगतीवर समाधान न बाळगता औद्योगिक विकासाची क्षेत्रे निर्माण करीत असताना आपण निवड केलेली क्षेत्रे भविष्यकाळात समृद्ध नागरी औद्योगिक वसाहती म्हणून नावारूपास येतील व त्या ठिकाणी येण्यास सर्वजण उत्सुक राहतील या दृष्टीने आपली पुढील वाटचाल असावी. ही क्षेत्रे पर्यावरणाचा समतोल उत्कृष्टरीत्या राखणारी, नियोजनबद्ध, पूर्णपणे स्वयंपूर्ण असावीत. हरितपट्टे, दाट वृक्षराई, बगीचे, क्रीडांगणे, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, अग्निशमन सेवा, टपाल व दूरसंचार सेवा, विमान धावपट्ट्या, उत्कृष्ट रस्ते अशा सुविधांनी परिपूर्ण असावी, जेणेकरून जनजीवन सामंजस्याच्या पायावर उभे राहू शकेल, अशी औद्योगिक नगरे आपण निर्माण करावीत.
  महाराष्ट्रात मोठ्या उद्योजकांकडून गुंतवणूक होत आहे. शेजारच्या राज्यातून व देशांमधूनही नामांकित उद्योजक स्वत:चा उद्योग महाराष्ट्रात उभारू इच्छित आहेत. उद्योगाची उभारणी करताना आवश्यक त्या औद्योगिक सेवासुविधा जलद गतीने पुरविण्याची कामे शासनाने हाती घेतली आहेत. उत्तम राज्यकारभार, औद्योगिक गुंतवणुकीसाठी लागणा-या सर्व सुखसोयींची उपलब्धता, विजेचा पुरेसा पुरवठा, तंत्रकुशल कामगार उद्योगातील बदलत्या कल्पना आम्ही जागृतपणे अवलोकन करीत आहोत. पारदर्शकता, जलद औद्योगिकीकरण, अत्याधुनिक पायाभूत सेवासुविधांची निर्मिती, माहिती तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान क्षेत्राला अधिक चालना देणे हा नवीन दृष्टिकोन समोर ठेवून एमआयडीसी काम करीत आहे.
  राज्याच्या विकसनशील भागातही (म्हणजे तालुका पातळीवरदेखील) औद्योगिक विकासाला आता वेग येऊ लागला आहे. या विकासाबरोबरच नव्याने रोजंदारी निर्माण होऊन बेकारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. एवढ्यावरच न थांबता हे शासन औद्योगिकीकरण घडवून आणताना अत्याधुनिक तंत्रांचा आणि यंत्रणेचाही वापर करीत आहे. या नवीन कार्यपद्धतीची अंमलबजावणी केल्यामुळे आजवर जी औद्योगिक क्षेत्रे आपण फक्त औद्योगिक वसाहती म्हणून संबोधित होतो तसे ते यापुढे राहणार नाही. ही भविष्यातील औद्योगिक क्षेत्रे आकर्षक नागरी संकुले म्हणून उभारण्यात येणार आहेत.
  मागील काही वर्षांपासून राज्यातील पुणे जिल्ह्यातील चाकण, तळेगाव हा भाग भारत देशासह आशियातील सर्वाधिक मोठे वाहन निर्मिती क्षेत्र म्हणून पुढे येत असून या भागामध्ये जगातील नामवंत वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहन निर्मिती सुरू केलेली आहे. यापुढे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यास गुंतवणूकदार अधिक पसंती देत आहेत, कारण राज्यातील पायाभूत सुविधेमुळे राज्यातील इतर भागातही औद्योगिकीकरण होत असून राज्याच्या संतुलित औद्योगिकीकरणास शासनाने प्राधान्य दिलेले आहे.
  सीप्झ येथील माहिती तंत्रज्ञान आणि रत्न व आभूषण उद्योगाला चालना देण्यासाठी या संकुलामुळे देशस्थ व परदेशस्थ गुंतवणूक होऊन परकीय चलनही वाढत आहे. मऔवि या प्रकारे मोठ्या विशाल प्रकल्पाद्वारे रोजगार वृद्धींसह संपूर्ण औद्योगिकीकरणाद्वारे राज्याच्या विकासातून भविष्यात यापुढे महाराष्ट्र आर्थिक बाबतीत अधिक सक्षम होईल असा मला विश्वास वाटतो. आरंभापासूनच मऔवि महामंडळाच्या जलद औद्योगिकीकरण कार्यामुळे महामंडळाने आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे उद्यमात सकल समृद्धी : औद्योगिकीकरणातून राज्याच्या समृद्धीकडे वाटचाल जोमाने सुरू आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात निश्चितच महामंडळाच्या अधिकारी/ कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे.
  वर्धापन दिनानिमित्त प्रथा व परंपरेप्रमाणेच महामंडळातील कर्मचारी/ अधिकारी हे १ आॅगस्ट या दिवशी एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वर्धापनदिन साजरा करतात. महामंडळाच्या पुढील कार्यास शुभेच्छा!
 • जय महाराष्ट्र डीडी सह्याद्री टीव्हीवर दिलेली मुलाखत
  तारीख :  ६ जुलै २०१०
  कार्यक्रम :  जय महाराष्ट्र डीडी सह्याद्री टीव्हीवर  मुलाखत
   
  उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री राजेंद्र दर्डा यांनी 
  जय महाराष्ट्र डीडी सह्याद्री टीव्हीवर दिलेली मुलाखत
   
  * औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे, राज्याची अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत की, राज्य औद्योगिकदृष्ट्या आघाडीवर आहे?
  - देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या २० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
  - औद्योगिकीकरण वाढीचा दर ९ टक्के आहे.
  - देशाच्या निर्यातीत राज्याचा २७ टक्के वाटा आणि रोजगार निर्मितीत १४ टक्के वाटा आहे.
  - महत्त्वाच्या २५ औद्योगिक क्षेत्रांपैकी १५ क्षेत्रांतील उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे.
  - देशातील एकूण गुंतवणुकीपैकी २० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात (५,५४,३९४ कोटी गुंतवणूक, ६७४३ प्रकल्पांद्वारे) होते. यावरून असे लक्षात येईल की, महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर आहे.
  * देशातीलच नव्हे, तर परदेशातील गुंतवणूकदार आणि उद्योग राज्याकडे आकर्षित व्हावेत यासाठी उद्योग विभागाच्या विशेष उपाययोजना थोडक्यात सांगाल?
  राज्याचे धोरण हे गुंतवणुकीसाठी पोषक असे आहे (इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली पॉलिसी).
  विशाल प्रकल्प धोरण २००५
  इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर पॉलिसी-२००६.
  सामूहिक प्रोत्साहन योजना-२००७ (पीएसआय-२००७)
  दि. ३० जून, २०१० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी फायद्याच्या ठरतील अशा सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे.
  - राज्यात उत्कृष्ट पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर)आहे.
  - देशातील रस्त्यांपैकी ११ टक्के रस्ते, ९ टक्के रेल्वेचे जाळे, ४ आंतरराष्ट्रीय विमानतळ, २१ देशांतर्गत विमानतळ महाराष्ट्रात आहेत.
  - जे.एन.पी.टी., एम.पी.टी. यासारखी मोठी बंदरे महाराष्ट्रात (ज्यातून देशाच्या एकूण निर्यातीपैकी ५७ टक्के निर्यात होते) आहेत.
  - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे देशातील सर्वांत मोठे औद्योगिक महामंडळ असून, याद्वारे विविध सेवा देण्यात येतात.
   
  * राज्यात देशातील विविध विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) आहेत, त्याबाबत काय सांगाल?
  - देशात १५४ विशेष आर्थिक क्षेत्रांस मान्यता, त्यापैकी ५४ विशेष आर्थिक क्षेत्र अधिसूचित आहेत.
  - याद्वारे ५२ हजार कोटी अपेक्षित गुंतवणूक व २१ लाखांपेक्षा जास्त अपेक्षित रोजगार आहे.
  - या विशेष आर्थिक क्षेत्राद्वारे उद्योगांना विविध सवलती मिळून निर्यातीमध्ये वाढ होईल आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होईल.
  - विशेष आर्थिक क्षेत्रासाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करण्याकरिता विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात विधेयक प्रस्तावित केलेले आहे.
  - महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेल्या विविध विशेष आर्थिक क्षेत्रात टेक्स्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, बायोटेक, अ‍ॅग्रो प्रॉडक्टस्, अ‍ॅल्युमिनियम व अ‍ॅल्युमिनियमपूरक उद्योग, फार्मा, इंजिनियरिंग, लेदर, पॉवर जनरेशन, मल्टी प्रॉडक्ट इत्यादी स्पेशलाईज्ड एसईझेड आहेत.
  * विशेष आर्थिक क्षेत्रासाठी जमीन संपादन करण्यासाठी काही ठिकाणी विरोध होत आहे. याबाबत शासनाची भूमिका कशी आहे?
  - विशेष आर्थिक क्षेत्रासाठी भूसंपादन करताना सर्वसाधारणपणे बागायती क्षेत्र संपादित न करण्याचे शासनाचे धोरण आहे. तसेच जमिनीचा मोबदला वाटाघाटीने शेतक-यांना देण्याबाबत शासनाची भूमिका आहे.
  - प्रकल्पग्रस्तांना जास्तीत जास्त सवलती, तसेच संपादित केलेल्या जमिनीच्या १५ टक्के जमीन/भूखंड देण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे.
  - एम.आय.डी.सी.च्या संचालक मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे प्रकल्पग्रस्त एकत्र येऊन ४९ टक्के भागधारकांसह कंपनी स्थापन करू शकतात.
  - प्रकल्पग्रस्तांना आय.टी.आय.मधून येथे येणा-या उद्योगांच्या मार्गदर्शनाखाली जॉब ओरिएंटेड ट्रेनिंग देणे.
  - खाजगी क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या जमिनीवर एस.ई.झेड. ची उभारणी करू शकतात; मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतक-यांचा विरोध असताना जमीन संपादन करण्याचे शासनाचे धोरण नाही.
  * राज्याच्या मागास भागाचा विकास होण्यासाठी विशाल प्रकल्प धोरण आखले. त्या धोरणाला चांगले यश आले आहे. त्याबाबत आपल्या श्रोत्यांना माहिती जाणून घ्यावयाची उत्सुकता आहे.
  - शासनाने १६९ विशाल प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे. या विशाल प्रकल्पाच्या माध्यमातून १ लाख ४० हजार कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित, तसेच २ लाखांपेक्षा जास्त रोजगार अपेक्षित आहेत.
  - यापैकी ७० विशाल प्रकल्प उत्पादनात गेलेले असून, याद्वारे ३८ हजार कोटींची गुंतवणूक झालेली आहे. तसेच ७० हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती झालेली आहे.
  - विशेष म्हणजे यापैकी अनेक विशाल प्रकल्प मराठवाडा, विदर्भासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भागांमध्ये सुरू झालेले आहेत.
  * महाराष्ट्रात पुणे, मुंबई या दोन शहरात माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांचा विकास झाला आहे. या क्षेत्रातील राज्याच्या प्रगतीबाबत माहिती द्याल का?
  - माहिती व तंत्रज्ञानाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. राज्यात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्यात २००३ पासून ८ पटीने वाढली आहे.
  - ९० टक्के माहिती-तंत्रज्ञान व बी.पी.ओ. उद्योग देशाच्या ७ शहरांमध्ये एकवटलेले असून, त्यामध्ये मुंबई व पुणे ही दोन शहरे महाराष्ट्रातील आहेत. तसेच राज्यामध्ये ४०१ माहिती तंत्रज्ञान पार्क सार्वजनिक व खाजगी स्वरूपाचे आहेत. त्यापैकी ७२ खाजगी व ३६ सार्वजनिक क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान पार्क स्थापित झालेले असून, त्याद्वारे १८ कोटींची गुंतवणूक व २ लाख ६८ हजार रोजगार निर्मिती झालेली आहे.
  * महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. कृषी आणि उद्योगाच्या सर्वंकष विकासासाठी राज्याचे कृषी-औद्योगिक धोरण तयार केले जात आहे, त्याबाबत आपल्या श्रोत्यांना सांगाल?
  - रेबो बँकेच्या सल्ल्याने याबाबत एक कच्चा मसुदा तयार करण्यात आला आहे व   याबाबतचे सादरीकरण मा. मुख्यमंत्री यांच्याकडे झालेले आहे. याबाबत लवकरच इंटरनेटद्वारे मसुदा लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ, शेतकरी व जनतेच्या सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येईल. सदर सूचनांच्या अनुषंगाने सदरील धोरण लवकरच अंतिम करण्यात येईल.
  - या धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतीमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन (व्हॅल्यू-अ‍ॅडिशन) करणे, ज्यामुळे शेतकरी, तसेच उद्योजकांचा फायदा होईल.
  - अन्नप्रक्रिया उद्योगांना अनुदान व सवलती देणे.
  - मूलभूत व पायाभूत सवलतींची निर्मिती.
  - केंद्र व राज्याच्या सध्याच्या कर धोरणात सुसूत्रता आणणे.
  * महाराष्ट्र राज्य औद्योगिक  विकास महामंडळाची राज्याच्या औद्योगिकीकरणात महत्त्वाची भूमिका अधिक सक्षमपणे बजावता यावी यासाठी आपण काही खास धोरण आखणार आहात का?
  - राज्यातील सर्व भागात २३० पेक्षा अधिक औद्योगिक वसाहतींची निर्मिती केली जाईल.
  - (५५ हजार हेक्टर जमिनीवर).
  - उच्च प्रतीच्या पायाभूत सुविधांची निर्मिती- रस्ते, पाणीपुरवठा, सिवरेज सिस्टीम, अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण प्रणाली, ई.टी.पी. केली जाईल.
  - विशेष औद्योगिक पार्कची निर्मिती- टेक्सटाईल, जेम्स अँड ज्वेलरी, बायोटेक, अ‍ॅग्रो प्रॉडक्ट, अ‍ॅल्युमिनियम व अ‍ॅल्युमिनियमपूरक उद्योग, फार्मा, इंजिनिअरिंग, लेदर, पॉवर जनरेशन, मल्टी प्रॉडक्ट इत्यादी आहेत.
  - विशेष धोरण- लँड बँक, फ्लॅटेड गाळे, शेडची निर्मिती.
  - गेल-गॅस वाटपासाठी विविध कंपन्यांशी संयुक्त भागीदारी.
  - डी.एम.आय.सी.द्वारा व्यापक औद्योगिकीकरणासाठी जमीन व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार.
  * औद्योगिक प्रकल्प उभारण्यासाठी विविध विभागांची मंजुरी/परवाने मिळवावे लागतात. या प्रक्रियेत वेळ जातो. हा वेळ कमी करण्यासाठी आपण काही पावले उचलली आहेत, त्याबाबत सांगाल?
  - एम.आय.डी.सी. मार्फत विविध परवाने दिले जातात. हे परवाने आता दि. १ मे २०१० पासून आॅनलाईन पद्धतीने एक खिडकी योजनेद्वारे देण्याचे काम सुरू झालेले आहे. तसेच उद्योगासंबंधी इतर विभागांची कार्यालये उद्योग भवनात एकत्र आणून एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. उद्योग विभागाच्या विविध परवान्यांसाठी ठाणे येथील उद्योग सेतूच्या धर्तीवर इतरही ठिकाणी अशी केंद्रे सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे.
  - एम.आय.डी.सी.च्या कामकाजाचे संगणकीकरण करण्याबाबत मायक्रोसॉफ्ट या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीशी एम.आय.डी.सी.ने करार केलेला आहे.
 • विभागस्तरीय रोजगार मेळावा उद्घाटन समारंभात केलेले भाषण
  तारीख : २७ जून २०१० 
  ठिकाण  : औरंगाबाद
  कार्यक्रम :  रोजगार मेळावा

  उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  विभागस्तरीय रोजगार मेळावा उद्घाटन समारंभात केलेले भाषण

  या समारंभाला उपस्थित राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार, रोजगार व स्वयंरोजगार खात्याच्या प्रधान सचिव अॅना दाणी, रोजगार व स्वयंरोजगार आयुक्त राजीव जलोटा, विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डब्ल्यू.झेड. गंधारे व उपस्थित उमेदवार व उद्योजकांचे मी स्वागत करतो.
  मराठवाड्यातील नोकरीस इच्छुक असलेल्या उमेदवारांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
  रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत फक्त शासकीय/निमशासकीय कार्यालयांमधील रिक्त पदे भरण्यासाठीच उमेदवारांच्या याद्या पाठविल्या जातात, अशी भ्रामक कल्पना सर्वसाधारणपणे उमेदवारांच्या मनात असते; परंतु या विभागामार्फत शासकीय/निमशासकीय कार्यालयाबरोबरच खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी मागणी केल्यास सेवायोजन कार्यालयातील नावनोंदणी केलेल्या उमेदवारांची पाठवणीदेखील अशा उद्योजकांकडे करण्यात येत असते.
  नवीन उद्योगाद्वारे निर्माण होणारा रोजगार तसेच पूर्वीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकाकडे निर्माण होणारी रिक्त पदे नोकरीस इच्छुक उमेदवारांना उपलब्ध करून देण्याकरिता, तसेच उद्योजकांना त्यांच्या रिक्त पदांकरिता योग्य उमेदवार उपलब्ध होण्याकरिता, रोजगार व स्वयंरोजगार विभागाने २००७ मध्ये ठाणे व पुणे येथे प्रायोगिक तत्त्वावर नावीन्यपूर्ण रोजगार मेळावे आयोजित केले. सदर मेळाव्यातील भरघोस प्रतिसाद व उपयुक्तता लक्षात घेऊन त्याचवर्षी महाराष्ट्रात प्रथमत: १५ जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर २००९-१० मध्ये या मेळाव्यांची व्याप्ती वाढविण्याकरिता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दरवर्षी प्रत्येकी ४ तसेच विभागीय स्तरावर एक रोजगार मेळावा आयोजित करण्याचे निर्देश शासनाने दिले. 
  राज्यात २००७ पासून आजपर्यंत साधारणत: २०० मेळावे घेण्यात आलेले आहेत व सदर मेळाव्यास १,६०० उद्योजक, जवळजवळ ७३ हजार रिक्तपदांसह उपस्थित होते. सदर मेळाव्यात १.२५ लाख उमेदवारांची उपस्थिती होती व एकूण १७ हजार उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. 
  औरंगाबाद/मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये २००७ पासून आजपर्यंत ६३ मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत व सदर मेळाव्यास १२३ उद्योजक ६,५०० रिक्त पदांसह उपस्थित होते. या मेळाव्यांचा एकूण नऊ हजार उमेदवारांनी लाभ घेतला असून, एकूण १,९०० उमेदवारांना रोजगार प्राप्त झालेला आहे.
  आजच्या या विभागीय स्तरावरील रोजगार मेळाव्यास १७ उद्योजक सहभागी झाले असून, त्यांच्याकडील ९१५ रिक्त पदांसाठी या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
  राज्यात संपन्न झालेल्या या अगोदरच्या मेळाव्यांमध्ये काही बाबी प्रकर्षाने जाणवलेल्या आहेत की, कुशल कामगार किंवा कौशल्यप्राप्त असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होत आहेत. तथापि, अकुशल व कौशल्य नसलेल्या उमेदवारांना फारशा संधी उपलब्ध होत नाहीत. तरी या अनुषंगाने मला उमेदवारांना असे आवाहन करावेसे वाटते की, उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच काळानुरूप व त्यांचे शैक्षणिक अर्हतेस अनुरूप असे विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन स्वत:च्या कौशल्यात वाढ करावी.
  सद्य:स्थितीत काळानुरूप जसे संगणक प्रशिक्षण, सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण, मराठी भाषेबरोबरच इंग्रजी भाषेचे वाचणे, लिहिणे व बोलण्याचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.
  ‘आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो. गि-हाईक कसं ते फिरकेना, 
  मग सोनं पांघरून चिंध्या विकत बसलो, तर गर्दी पेलवता पेलवेना!’
  तसेच नोकरीकरिता स्थलांतराची आवश्यकता असल्यास ती पण तयारी दर्शविल्यास आपणास नोकरी/रोजगार उपलब्ध होण्यास फारशी अडचण येईल, असे मला वाटत नाही.
  या अनुषंगाने इतर राज्यांत रोजगार मेळावे कशा प्रकारे आयोजित केले जातात? व त्यातील नावीन्यपूर्ण बाबी आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील? याचा अभ्यास करण्याकरिता या विभागातील अधिका-यांना पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रोजगार मेळाव्याद्वारे रोजगार प्राप्त होण्याच्या संधीमध्ये वाढ होण्याकरिता काही शिफारशी दिल्यास त्याची अंमलबजावणी तात्काळ करता येऊ शकेल.
  तसेच खाजगी प्लेसमेंट संस्थांचा किंवा शासनातील इतर विभागांचा उदा. उच्च व तंत्रशिक्षण, उद्योग, कामगार व विभागांचा सहभाग व समन्वय कसा वाढविता येईल याचा विचारसुद्धा करण्यात येत आहे. 
  तसेच याशिवाय उमेदवारांकरिता नोंदणी, शैक्षणिक पात्रता वाढ, नूतनीकरण इ. तसेच उद्योजकांची नावनोंदणी इत्यादीकरिता त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या कार्यालयात येऊन त्यांचा पैसा व   वेळ खर्ची होऊ नये, याकरिता या विभागाच्या वेबसाईटवर सर्व सेवांची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 
  याशिवाय रोजगार व स्वयंरोजगार विभागांच्या कार्यालयांचे नूतनीकरण करणे, उमेदारांकरिता त्यांची रोजगार क्षमता/ कौशल्य /रस याची चाचणी घेणे, त्यांना समुपदेशन करणे, आवश्यकतेनुसार टएर अंतर्गत प्रशिक्षण देणे व त्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ करून नोकरी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे शासनाच्या विचारधीन आहे.
  उमेदवारांना वेबसाईटवरून त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सुयोग्य अशी खाजगी उद्योजकांची कोणती रिक्त पदे कोठे उपलब्ध आहेत, ही माहिती तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सध्याच्या विभागाच्या वेबसाईटमध्ये सुधारणा करण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आले आहे.
  उमेदवारांकरिता सद्य:स्थितीत राज्यातील रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या ४९ कार्यालयांत स्पर्धा परीक्षा व इतर करिअरसंबंधित पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. सदर वाचनालयाचा लाभ उमेदवारांनी घ्यावा.
  तसेच लवकरच राज्यात काही ठिकाणी उमेदवारांकरिता स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी करण्याकरिता माहिती व मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. 
  याशिवाय ग्रामीण, अल्पसंख्याक, आदिवासी व इतर उमेदवारांना रोजगार प्राप्त होण्याकरिता खाजगी संस्थांचा, विषयतज्ज्ञांचा, तसेच सार्वजनिक खाजगी सहभाग या तत्त्वाचा उपयोग करता येईल काय? या सर्व शक्यता पडताळून रोजगार वाढविण्याचा शासनाचा विचार आहे.
  भारतरत्न अब्दुल कलाम साहेबांनी म्हटले आहे, “Dream is not something you see in your sleep. Dream is something which does not let you sleep!”
  तरी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या अशा मेळाव्यांचा, तसेच इतर सेवांचा उमेदवार व उद्योजकांनी लाभ घ्यावा व सहकार्य करावे, अशी विनंती या निमित्ताने मी करतो तसेच या मराठवाड्याच्या विभागीय स्तरावरील या कार्यक्रमास उपस्थित राहणा-या उपस्थितांचे आभार मानतो व माझे दोन शब्द संपवितो. 
  धन्यवाद, जयहिंद, जय महाराष्ट्र!
 • निमा हाऊस येथे जिल्हा उद्योगमित्र समितीच्या सभेत केलेले भाषण
  तारीख :  २० मे २०१० 
  ठिकाण  :  नाशिक
  कार्यक्रम :  निमा हाऊस, सातपूर, नाशिक येथे उद्योजकांची सभा

  उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री राजेंद्र दर्डा यांनी 
  निमा हाऊस येथे जिल्हा उद्योगमित्र समितीच्या सभेत केलेले भाषण

  या बैठकीला उपस्थित राज्याचे विकास आयुक्त संजय शेट्टी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. शिवाजी, जिल्हाधिकारी पी. वेलरासू, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी गजानन पाटील, व्यासपीठ व समोरील सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो.
  महाराष्ट्राचा उद्योगमंत्री या नात्याने नाशिक नगरीत मी पहिल्यांदा येत आहे. याप्रसंगी आपणा सर्वांना भेटताना मला आनंद होत आहे. नाशिक दौ-याला एक वेगळे महत्त्व आहे. कारण हे ऐतिहासिक शहर आहे. नाशिकची ओळख एक धर्मक्षेत्र म्हणून होतीच; परंतु मागील शतकाच्या अखेरीस हे शहर हळूहळू औद्योगिक शहर म्हणून उदयास आले व विकसित झाले. मुंबईपासून जवळ, पाण्याने समृद्ध, उत्कृष्ट हवामान, उत्कृष्ट शेती यामुळे हे शहर व हा जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे.
  अलीकडेच नाशिकची ओळख ही ‘वाईन कॅपिटल आॅफ इंडिया’ म्हणून होत आहे. दर्जेदार प्राथमिक व उच्च शैक्षणिक संस्था नाशिककडे आकर्षित झाल्या आहेत. नाशिकमध्ये १० इंटरनॅशनल स्कूल स्थापन झाल्या आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे कार्यरत आहे. त्यामुळेच नाशिक आता विद्येचे माहेरघर झाले आहे.
  द्राक्ष, डाळिंब, कांदे, भाजीपाला आदी कृषी उत्पादनामध्ये नाशिक अग्रेसर आहे. केंद्र शासनाने केशर आंबा, डाळिंब, द्राक्ष, कांदा, द्राक्ष वाईन व फुले यांच्या निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्यास अॅग्रो एक्स्पोर्टस् झोन म्हणून घोषित केले आहे. त्यासाठीच नाशिक जिल्ह्यात टर्मिनल मार्केटची स्थापना होत आहे. ओझर येथे कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी कार्गो एअर टर्मिनल अस्तित्वात आले आहे. नाशिक जिल्ह्यात शीतगृहांची साखळी अस्तित्वात आहे. ७० पेक्षा जास्त शीतगृहे कार्यान्वित आहेत. ३३ वाईनरी उत्पादनात आहेत.
  मुंबई-नाशिक-धुळे व पुढे मध्यप्रदेशापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे  काम सुरू आहे. नाशिक -औरंगाबाद, नाशिक-पुणे या महामार्गाचेही चौपदरीकरण होऊ घातले आहे. मुंबई-घोटी-सिन्नर-औरंगाबाद मार्गे नागपूर या पर्यायी कमी लांबीचा रस्ताही जवळपास तयार झाला आहे. नाशिक शहरात असलेली दोन विमानतळे, रेल्वेमार्ग आदी सुविधांमुळे हे शहर मुंबई व इतर शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. हवाई सेवा पुरेशी नसली तरी भविष्यात ती निश्चितच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.
  केंद्र शासनाकडे सादर करण्यात आलेल्या औद्योगिक आवेदन पत्रांपैकी एकूण १८ % आवेदन पत्र हे महाराष्ट्रात उद्योग स्थापनेसाठी आहेत. परकीय थेट गुंतवणुकीच्या एकूण प्रस्तावांपैकी २० % प्रस्ताव हे महाराष्ट्रासाठी आहेत. 
  राज्याच्या औद्योगिक,  गुंतवणूक व मूलभूत सुविधा धोरण-२००६, माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान पूरक सेवा धोरण- २००३ व २००९, जैव तंत्रज्ञान धोरण या सर्वांचा परिपाक म्हणून महाराष्ट्रात स्थापन होणा-या उद्योगधंद्याची संख्या सतत वाढत आहे. राज्यात एकूण १६४ मेगा प्रोजेक्ट स्थापनेसाठी प्रस्ताव मान्य करण्यात आले असून प्रस्तावित गुंतवणूक रु. १,०६,०००/- कोटी आहे. त्यापैकी नाशिक विभागात १६ मेगा प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आलेली असून प्रस्तावित  गुंतवणूक रु. ५,०६७/- कोटी आहे. पैकी ९ मेगा प्रोजेक्ट उत्पादनात गेलेले असून त्यामधील  गुंतवणूक रु. ३,११९/- कोटी आहे. केंद्र शासनाच्या इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन स्कीम अंतर्गत ३ ठिकाणी प्रकल्प अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी एक नाशिक येथे अस्तित्वात आला आहे. ७ ठिकाणी टेक्स्टाईल पार्कस्ची स्थापना होत आहे. इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत ११ ठिकाणी औद्योगिक वसाहतींच्या स्थापनेचे प्रयोजन आहे. राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहतींचे जाळे उभारले आहे. माहिती तंत्रज्ञान व जैन तंत्रज्ञान उद्यानेही विकसित केली आहेत. त्यासोबतच राज्यात १४२ सहकारी औद्योगिक वसाहती अस्तित्वात आहेत. भारताच्या एकूण निर्यातीपैकी २७ % निर्यात महाराष्ट्रातून होते.
  राज्याच्या विकासाचा वेग टिकवण्यासाठी व तो वाढविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यामध्ये गुंतवणूकदारांना पोषक असे मैत्रीपूर्ण वातावरण तयार करणे, त्यांना योग्य त्या मूलभूत सुविधा वेळेवर उपलब्ध करून देणे, आवश्यकतेनुसार जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, उद्योग व्यवसाय चालविण्यासाठी सुरक्षित परिस्थिती टिकविणे आदी प्रयत्न आहेत.  इतर राज्ये त्यावरून त्यांच्या राज्यांसाठी धोरणे आखत आहेत. थोडक्यात, महाराष्ट्र इतरांना पथदर्शक आहे. विकासाच्या प्रक्रियेत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या संकल्पनेचा वापर करण्यात येत असून त्याचे दृश्य परिणाम रस्ते बांधणे, पुलांची निर्मिती, ऊर्जा निर्मिती केंद्रे, विमानतळाची निर्मिती/आधुनिकीकरण, बंदरांची निर्मिती, विशेष आर्थिक क्षेत्रांची स्थापना यात दिसून येत आहे.
  दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत ठाणे -नाशिक-धुळे-नंदुरबार आदी जिल्ह्यांना लाभ होणार आहे. नाशिक विभागात ३ विशेष आर्थिक क्षेत्रांना स्थापनेसाठी  केंद्र शासनाची मंजुरी मिळाली असून आणखी २ विशेष आर्थिक क्षेत्रांना तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन स्कीम अंतर्गत नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर कार्यरत झाले आहे. जिल्ह्यात केंद्र शासनाच्या समूह विकास योजनेअंतर्गत द्राक्षापासून बेदाणा निर्मिती, येवला येथील पैठणी समूहाचा विकास, द्राक्षापासून वाईन निर्मिती समूह विकास हे प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. 
  त्यासोबतच पॉवर स्टेशनच्या फ्लाय अॅशपासून विविध वस्तूंची निर्मिती करण्यासह समूह विकास करण्याचेही नियोजित आहे. मालेगाव येथे एम.आय.डी.सी.चे औद्योगिक क्षेत्र स्थापन होत आहे. देशाच्या व राज्याच्या विकासात सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचा   मोठा वाटा आहे. 
  एकंदरीत नाशिक जिल्ह्याचे भवितव्य उज्ज्वल आहे. मात्र ते घडविण्यासाठी हातभार लावण्याचे उत्तरदायित्व आपल्या सर्वांवर आहे. येऊ घातलेल्या गुंतवणूकदारांना सर्वतोपरी मदत करणे आपले कर्तव्य आहे. विकास साधताना पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही, कायदा व सुव्यवस्था ढासळणार नाही, तसेच आपली सामाजिक रचना डळमळीत होणार नाही याचीही खबरदारी घेणे आवश्यक आहे.  कारण विकासाच्या प्रक्रियेत माणूस हरवणार नाही याचे भान ठेवले पाहिजे. आपण सर्वांचा निरोप घेताना मी हे म्हणू इच्छितो, ‘अक्सर लोगोंको कहते सुना था, जिंदा रहे तो फिर मिलेंगे. लेकिन आपको मिलकर महसूस किया, मिलते रहे तो जिंदा रहेंगे.
 • जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
  तारीख : १५ मार्च २०१०

  उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडून 
  जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

  आज चैत्रप्रतिपदा. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त. हिंदूंचे आज नवे वर्ष. शालिवाहन शकाची सुरुवात आजपासून होते. गुढीपाडव्याला श्रीरामचंद्रांनी वालीच्या त्रासातून प्रजेची सोडवणूक केली होती असे म्हणतात.
  या दिवशी कडुलिंब व साखरेचा प्रसाद खाण्याची पद्धत आहे. बरेच विचार कडू असतात. आचरणात आणताना आपल्याला कष्ट देतात; पण तेच विचार आपले जीवन उदात्त बनवतात.
  भारतात प्राचीन काळापासून गुढीपाडवा या सणाचे आगळे महत्त्व आहे. पूर्वी विजयोत्सवाची निशाणी म्हणून घरोघरी गुढी उभारली जात असे. हल्ली नवे संकल्प सोडण्यासाठी, नव्या नियोजनासाठी या शुभ दिवसाची निवड केली जात असते.
  जीवनात नव्या आकांक्षा मनात धरून नव्या प्रेरणा रुजविण्याचा आपण निर्धार करावा, यासाठी या शुभदिनी आपणा सर्वांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!

  ‘‘मंजिल उन्होको मिलती है
  जिनके सपनों में जान होती है!
  पंख से कुध नहीं होता,
  हौसले से उडान होती है!’’
 • भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभात केलेले भाषण
  तारीख :  26 जानेवारी 2010
  ठिकाण :  अमरावती
  कार्यक्रम :  भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभ

  उद्योगमंत्री व पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  भारतीय प्रजासत्ताक दिन समारंभात केलेले भाषण

  या समारंभाला उपस्थित विभागीय आयुक्त दिनेश वाघमारे, विशेष पोलिस महानिरीक्षक दलवीर भारती, महापालिका आयुक्त एस.डी. शिंदे, जिल्हाधिकारी रुचा बागला, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर आयुक्त एन. नवीन सोना, सीएच स्टॅलिन, या सोहळ्यासाठी आवर्जून जमलेले सर्व मान्यवर नागरिक.
  भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती जिल्ह्यातील सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा देताना मला अत्यंत आनंद होत आहे. महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सवसुद्धा आपण साजरा करीत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी, तसेच थोर विभूतींनी आपले बलिदान दिले आणि ज्यांच्या असीम त्यागातून आपला देश स्वतंत्र झाला त्या सर्व शहिदांना व थोर विभूतींना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो.
  राज्यातील ऐतिहासिक घटनांची जी शहरे साक्षीदार ठरली. त्यात अमरावतीचा समावेश आहे. इंग्रजांच्या विरोधात लढणा-या क्रांतिकारकांना आश्रय या जिल्ह्याने दिला आणि इंग्रजविरोधी आंदोलनाचे नेतृत्वही केले. लोकजागृतीसाठी पुढाकार घेणा-या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव आपण साजरा करीत आहोत. या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांची ग्रामगीता आणि ग्रामगीतेतील महाराजांच्या संकल्पनेतील व्यवस्था निर्माण करण्यावर शासन कटिबद्ध असून ग्रामविकासाचे अनेक प्रकल्प योजनांच्या माध्यमातून राबवायला सुरुवात झाली आहे. गुरुकुंज मोझरीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्यानुसार राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीचा विकास करण्यात येईल.
  अमरावती जिल्ह्यातील, तसेच विभागातील शेतक-यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय पंतप्रधानांनी विशेष पॅकेज जाहीर केले. यामध्ये उत्पादन वाढीसोबतच सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
  संत्रा हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य. रोजगार हमी योजनेशी निगडित फलोत्पादनाचा धडक कार्यक्रम राबवून जिल्ह्यात ७ हजार २२१ हेक्टर क्षेत्रावर फलोत्पादनाचा कार्यक्रम राबवून मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही अमरावती जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषांतर्गत अनुशेष दूर करण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत ५० प्रकल्पांची कामे सुरू असून त्यापैकी ११ प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे जून अखेरपर्यंत १ लाख हेक्टर प्रत्यक्ष सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. या प्रकल्पामुळे २४.१७ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे.
  अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी अंतर्गत समन्वयित कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पावर सुमारे ५९३ कोटी २३ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून सहा जिल्ह्यातील सुमारे १ हजार २०० गावांचा येत्या ८ वर्षांत समन्वयित विकास करण्यात येणार आहे. 
  जिल्ह्यात रोजगार हमी योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्थानिकरीत्या कामे उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यक्रम राबविला आहे. जिल्ह्यात पुढील कालावधीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोट विकास आधारित मोठ्या प्रमाणावर कामे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढून मजुरांना रोजगारसुद्धा उपलब्ध होईल.
  औद्योगिक विकासाला चालना देताना कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग येथे सुरू व्हावेत यासाठी जीनिंग, प्रेसिंग तसेच प्रोसेसिंग होऊन प्रत्यक्ष कापडाची निर्मिती करणारी कारखानदारी उभी होणे आवश्यक आहे. तसेच परतवाडा आणि धारणी भागात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असताना या भागातही प्रक्रिया उद्योग सुरू व्हावा, यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.
  मेळघाट म्हणजे अमरावती जिल्ह्याला निसर्गाने दिलेले वरदान आहे; परंतु या भागात राहणा-या आदिवासींच्या कुपोषणाकडे विशेष लक्ष देऊन आरोग्य सेवा अधिक प्रभावशाली करून प्रत्येक गावात आरोग्य सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
  ग्रामीण भागात पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २७८ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी ४४ कोटी ३१ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये ४७२ गावांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
  अमरावती शहरात तसेच जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अतिरेकी हल्ल्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस दलातर्फे सर्व प्रकारच्या उपयायोजना करण्यात येत आहेत व कोणत्याही प्रकारच्या अतिरेकी हल्ल्यास तोंड देण्यास पोलीस प्रशासन पूर्णपणे सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज कमांडो पथक तयार करण्यात आले असून सदर पथक २४ तास सदैव सतर्क राहून कार्यरत असते. गुन्ह्यास प्रतिबंध व गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे मोहीम हाती घेण्यात आली असून, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस विभागास यश मिळाले आहे. जनतेला शांततामय वातावरण, तसेच योग्य व चांगले पोलीस प्रशासन देण्यास पोलीस दल सज्ज असून, पोलीस यंत्रणेला आवश्यक सर्व मूलभूत सोयी व सुविधा देऊन सुसज्ज करावयाचे आहे. त्या दिशेने आमचा प्रयत्न सुरू आहे. 
  महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्ण जयंती वर्षात महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान राबविण्याचा निर्णय माझ्या शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत अमरावती पाणीपुरवठा योजनेसाठी ८७९.३० लाख, चिखलदरा पाणीपुरवठा योजनेसाठी ८७.७१ लाख, तसेच अंजनगाव पाणी पुरवठा योजनेसाठी १३२.१४ लाख रुपयांच्या योजनांना मंजुरी मिळाली आहे. या   योजनेंतर्गत नागरी पाणीपुरवठा, मलनिस्सारण, शौचालय बांधकाम आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
  अमरावती पाणीपुरवठा योजनेंतर्गत अमरावती शहराकरिता २४ तास पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून नांदगाव खंडेश्वर या गावातील पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.
  एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत झोपडपट्टी भागात राहणा-या कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे. विभागाच्या सर्वांगीण विकासामध्ये येथील सक्षम प्रशासकीय यंत्रणेचे मोठे योगदान आहे. 
  अमरावती जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच औद्योगिक विकासासाठी निश्चित दिशा ठरवून अमरावती जिल्हा हा विकासाच्या मापदंडामध्ये अग्रक्रमावर राहील यासाठी माझे प्रयत्न राहणार असून या प्रयत्नांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मी करतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना पुनश्च शुभेच्छा देतो.
  जय हिंद...!
 • लोकराज्य आणि महान्यूजला दिलेली मुलाखत
  तारीख : १५ जानेवारी २०१०
  ठिकाण : मुंबई
  कार्यक्रम : लोकराज्य आणि महान्यूजला मुलाखत


  उद्योग, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  लोकराज्य आणि महान्यूजला दिलेली मुलाखत


  राज्यात उद्योग निर्मितीत गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण

  क्रमांक  १ : महाराष्ट्राच्या उद्योग विभागासाठी आपली कार्यपद्धती कशी असेल?
  उत्तर- राज्यात गुंतवणूकदारांसाठी रेड कार्पेट घातली असून गुंतवणूकदारांना अधिकाधिक सोयीसुविधा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने अनेक धोरणांची आखणी केली जात आहे. राज्यातील उद्योग मुंबई, पुणे यासारख्या विकसित शहरांपुरते मर्यादित न राहता विदर्भ, मराठवाडा, कोकण यांसारख्या मागास भागातही वाढीला लागावेत व या भागात येणारी गुंतवणूक वाढावी, या दृष्टीने राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी विशेष लक्ष घालणार आहे. एमआयडीसीच्या क्षेत्रात काही लोक उद्योगासाठी जागा घेतात; परंतु उद्योग सुरू न करता भूखंड  तसेच रिकामे ठेवले जातात. याबाबत मी कडक धोरण स्वीकारणार असून ठराविक मुदतीपेक्षा अधिक काळ हे भूखंड रिकामे राहिले असल्याचे निदर्शनास आल्यास हे भूखंड परत घेतले जातील.
  क्रमांक २ :-  औद्योगिक क्षेत्रात राज्याने आतापर्यंत किती प्रगती साधली आहे, त्या अनुषंगाने कोणती पावले उचलली जात आहेत?
  उत्तर :- २००५ साली राज्याचे विशाल प्रकल्प धोरण जाहीर झाले. त्यानंतरच्या काळात आतापर्यंत १६९ विशाल प्रकल्पांना केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. १ लाख ४० हजार ८२६ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यातून २.१३ लाख नवीन रोजगार निर्माण होतील.
  औद्योगिक प्रगतीबाबतची काही ठळक वैशिष्ट्ये-
  राज्यात विशेष आर्थिक क्षेत्र उभारणीसाठी १०० टक्के मान्यता केंद्र शासनाकडून दिली जाते. 
  इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक १४६ विशेष आर्थिक क्षेत्रांना केंद्र शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार मराठवाड्यात १४, विदर्भात १०, कोकणात ७१, पश्चिम महाराष्ट्रात ५१ अशी विशेष आर्थिक क्षेत्रे संपूर्ण राज्यात स्थापित केली जात आहेत.
  निर्यातीच्या बाबतीतही महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असून देशाच्या एकूण निर्यातीच्या २७ % समभाग (रु. २ लाख २६ हजार ७८४ कोटी २००८-०९ मध्ये) महाराष्ट्र राज्याचा आहे.
  राज्याने नुकतेच राज्याचे वैशिष्ट्यपूर्ण माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवा धोरण २९ आॅगस्टपासून लागू केले आहे.
  क्रमांक :  ३- औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्राची आघाडी कायम राहण्यासाठी आपले काय धोरण असेल?
  उत्तर : महाराष्ट्रात औद्योगिक प्रगती साधण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर माझा कटाक्ष आहे. तसेच लघु आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम राज्य शासन अधिक गतीने करणार आहे.  राज्याची आघाडी ‘प्रोजेक्ट टुडे’  तसेच ‘बिझनेस वर्ल्ड’ यासारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय पत्रकामधून प्रसिद्ध झालेल्या पाहणी अहवालातून सिद्ध झाली आहे. महाराष्ट्राची ही आघाडी कायम राहावी, या दृष्टीने राज्यात गुंतवणुकीसाठी ‘एक खिडकी योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्यावर आपण भर देणार आहोत. गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणूक करताना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे किंवा सवलती याची माहिती घेण्यासाठी अनेक ठिकाणी फिरावे लागते. त्यामुळे प्रकल्प उभारणीसाठी विलंब होतो. हे टाळण्यासाठी एकाच ठिकाणी गुंतवणूकदारांना सर्व गोष्टी उपलब्ध होण्यावर भर देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात विखुरलेली उद्योग विभागाची कार्यालये एका छत्राखाली आणून एका इमारतीत सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबतचे धोरण ठरविण्यात येईल. विदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे व त्यांचे प्रकल्प त्वरेने मंजूर करण्यासाठी मंत्रालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दर्जेदार पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत असून रस्ते, बंदरे, विमानतळे यांचा सार्वजनिक व खाजगी सहभागातून विकास करणे, तसेच उत्पादनाचा  खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक वायू ग्रीड उपलब्ध करून देण्यावरही विशेष लक्ष दिले जाईल. 
  भारतात कोणताही नवा उद्योग सुरू करायचा झाल्यास मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान ९० दिवस लागतात. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने पावले उचलली असून मुख्य सचिव आणि उद्योग सचिवांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना करून प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याचे धोरण अवलंबिले आहे.
  क्रमांक ४ -: विशेष आर्थिक क्षेत्राबाबत आपली काय भूमिका आहे?
  उत्तर :- राज्यात सर्वाधिक म्हणजे १४६ विशेष आर्थिक क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. यापैकी ३६ प्रकल्पांना तत्त्वत: व ५६ प्रकल्पांना अंतिम मान्यता केंद्र शासनाने दिली आहे. यामध्ये ६४ युनिटस् सुरू झाले असून ६५ हजार रोजगार निर्मिती सुरू झाली आहे. विशेष आर्थिक क्षेत्राबाबत अशा वेळी काही ठिकाणी भूसंपादनाच्या बाबतीत विरोध होतो ही वस्तुस्थिती नाकारत नाही. पर्यावरण विभागाच्या मंजुरीशिवाय कोणताही प्रकल्प उभारणीसाठी पुढे येऊ शकत नाही.  भूसंपादनाच्या वेळी स्थानिक जमीन मालकाला  शासनाने आखलेल्या धोरणानुसार योग्य मोबदला दिला जात आहे.
  क्रमांक  ५ : म.औ.वि.महामंडळामार्फत औद्योगिक विकासाची सद्य:स्थिती काय आहे?
  उत्तर :- म.औ.वि. महामंडळामार्फत राज्यात एकूण ५८८८९ हेक्टर जमीन संपादित करून त्यावर २३३ औद्योगिक वसाहतींची स्थापना केली आहे. तसेच पुढील औद्योगिक विकासासाठी ६५००० हेक्टर जमीन संपादनाचे काम सुरू आहे. 
  राज्यातील एकूण मंजूर एसईझेडपैकी १० एसईझेड महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केले आहेत. पैकी ७ खाजगी   सार्वजनिक  तत्त्वावर विकसित होत आहेत आणि संयुक्त सहभागातून विकसित होत आहेत. यातून सुमारे १० लाख लोकांसाठी रोजगार उपलब्ध झाले आहेत. राज्यात अन्नप्रक्रिया उद्योग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने सुरू झाले आहेत. बुटीबोरी, शेंद्रा, नेवासा, लातूर, उस्मानाबाद येथे फूड पार्क उभारण्यात येत आहेत.
  अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बारामती, कोल्हापूर, रत्नागिरी या ठिकाणी विमानतळे विकसित झाली आहेत. शिर्डी, सिंधुदुर्ग येथेही लवकरच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विमानतळे उभारण्यात येणार आहेत. नाशिक, सांगली विभागात वाईन पार्कस् उभारले आहेत. या क्षेत्रात राज्यात अधिकाधिक गुंतवणूक येण्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न होत आहेत.
 • हायटेक-आधार हॉस्पिटल व क्रिटिकल सेंटर उद्घाटन समारंभात केलेले भाषण
  तारीख :  ३१ आॅगस्ट २००८
  ठिकाण  :  औरंगाबाद
  कार्यक्रम :  हायटेक आधार रुग्णालयाचे उद्घाटन

  आमदार राजेंद्र दर्डा यांनी
  हायटेक-आधार हॉस्पिटल व क्रिटिकल सेंटर उद्घाटन समारंभात केलेले भाषण

  या समारंभाला उपस्थित माजी आमदार श्रीकांत जोशी, माजी महापौर डॉ. भागवत कराड, माजी सभापती नंदकुमार घोडेले, नगरसेवक प्रशांत देसरडा, व्यासपीठ व समोरील सर्व मान्यवर मित्रांनो.
  ‘जब किसी के जिदंगी की नैया स्वास्थ्य के नदी में डगमगाएगी आप की निष्ठा और मेहनतही उसे पार ले जाएगी !’
  आज या ‘हायटेक आधार’ अतिदक्षता रुग्णालयाचे उद्घाटन करताना मला आनंदही होत आहे, आणि अनेक भावना मनात येत आहेत. मी औरंगाबादला २७ वर्षांपूर्वी आलो, तेव्हा तेथील लोकसंख्या २ लाख होती, आणि घाटी रुग्णालय हे एकच मोठे हॉस्पिटल औरंगाबादच नाही, तर मराठवाड्यात होते असे मी म्हणेन. आज शहराची लोकसंख्या झाली आहे १२ लाख, आणि निदान १० मोठे आणि २५ अतीदक्षता सोयी असलेले रुग्णालये औरंगाबादला आहेत. पूर्वी कुणीही आजारी पडले की मुंबई, पुण्याला धाव घ्यावी लागायची सिरीयस पेशंट्सकडे तेवढा वेळ नसतो आणि बहुतेकांकडे तेवढा पैसा नसतो.
  मी येथील घाटी हॉस्पिटल, म्हणजेच शा.वै.म.वि.च्या अभ्यागत समितीचा अध्यक्ष मे, २००६ पासून आहे. गेल्या २ वर्षात घाटीला प्रचंड अनुदान मिळवून देण्यात आणि तिची प्रतिमा सुधारण्यात माझा व माझ्या समितीचा बराच वाटा आहे, हे की विनम्रपणे आणि अभिमानाने सांगू इच्छितो. आजारपण हे कष्टदायक असतेच. त्यात गरिबी आजारपणा या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की, त्या व्यक्तिव्य आणि  त्याच्या हतबल कुटुंबीयांवर आभाळच कोसळते. यासाठी सुरुवातीपासून आम्ही वैद्यकीय अतिदक्षता विभागात पुरेसे व्हेंटीलेटर मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि तो ब-याच प्रमाणात यशस्वी झाला. उश्ळर विभाग टप्प्या टप्प्याने कार्यान्वित होत आहे. ‘कॅज्युअल्टी’ (अपघात विभाग) तसेच शस्त्रक्रिया विभागाचे Surgical ICU, operation theatres जागतिक पातळीचे व्हावेत, यासाठी माझा आग्रह आणि प्रयत्न आहे. कॅन्सर हॉस्पिटल (१०० खाटांचे)साठी निधी मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे, आणि त्याला यश मिळाले आहे. मी अनेक प्रकारचे, अनेक ठिकाणचे रुग्णालये जवळून पाहिली आहेत, त्यांच्या उपकरणांची, उपचारांची मला बरीच माहिती आहे. मी स्वत:ला ब-याचदा अर्धा डॉक्टर आणि अर्धा इंजिनिअर समजतो! डॉक्टरांना पूर्वी ‘देव’ मानायचे. आजही जेव्हा रुग्णाला ‘अतीदक्षता’ विभागात नेतात आणि तो त्या काचेच्या तावदानापलिकडे आपल्या नजरेपासून दूर जातो, तेव्हा बाहेर बसलेले नातेवाईक प्राण डोळ्यात आणून हृदयाने डॉक्टरांचा धावा करीत असतात. त्यांना देवाच्या जागी आपल्या माणसाबरोबर असलेले ओळखीचे / बिन ओळखीचे डॉक्टर दिसतात. 
  ‘जिसके जिंदगी और मौत के बीच आप लगन और हिंमत से खडे है, उसको, उसके चाहनेवालों के लिए आप उपरवाले जितने ही बडे है!’
  आपण सामाजिक बांधिलकीतून जमेल तितकी सेवा रुग्णांना द्यावी, हे मी लोकप्रतिनिधी आणि एक माणूस या नात्याने आपल्याला कळकळीचे आव्हान आणि विनंती करतो.
  ‘‘२५ पेशंट बघून आपण त्रस्त असाल झालेले, 
  शेवटी तुम्हीही माणूसच आहात, शरीर असेल थकलेले! 
  पण २६ व्या पेशंटसाठीही तुम्हीच असाल आशेचा किरण,
  म्हणून रागवू नका, संयम धरा, त्याला द्या ‘आधार’ आपण!’’
 • दृष्टी आय इन्स्टिट्यू उद्घाटन समारंभात केलेले भाषण
  तारीख :  २९ जून २००८
  ठिकाण :  औरंगाबाद
  कार्यक्रम :  दृष्टी आय इन्स्टिट्यूटचे उद्घाटन

  आमदार राजेंद्र दर्डा यांनी
  दृष्टी आय इन्स्टिट्यू उद्घाटन समारंभात केलेले भाषण

  कार्यक्रमाच्या अध्यक्षा महापौर विजया राहाटकर, उपस्थित सखी मंच संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण, शिावसेनेचे राजू वैद्य, डॉ. सुनील कसबेकर, डॉ. आनंद पिंपरकर, डॉ. जगदीश लोया, व्यासपीठावर व समोर उपस्थित मान्यवर मित्रांनो.

  जितक्या कविता आणि शेर डोळ्यांवर केले गेले आहेत, मला वाटतं, हृदय सोडून अन्य कशावरही केले गेले नाहीत. एकादा कवी असो की चित्रकार किंवा तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस-कुणाच्याही चेहºयाकडे पाहिलं की सर्वप्रथम डोळ्यात भरतात ते त्या व्यक्तीचे डोळे! आपण चेहरा कितीही निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही डोळे बोलून जातात, मनातील भावना व्यक्त करतात. (मला वाटतं म्हणूनच बरेच राजकीय नेते ऊन नसतानासुद्धा नेहमी गॉगल घालून वावरतात!)
  ‘डोळे असतात हृदयाची खिडकी आणि झरोका मनाचा, कधी दाखवितात वास्तव, तर कधी इंद्रधनु स्वप्नांचा’ तर अशा या अमूल्य डोळ्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी इथे तीन तरुण हुशार आणि कुशल, उच्च प्रशिक्षित डॉक्टर्स एकत्र आले आहेत आणि आज यांच्या दृष्टी आय इन्स्टिट्यूटचे उद्घाटन होत आहे, याचा मला मनापासून आनंद होत आहे. यांच्या या रुग्णालयात अनेक प्रकारचे नवीन तंत्रज्ञान त्यांनी लोकांसाठी उपलब्ध केले आहे. त्यामुळे औरंगाबादची वैद्यकीय क्षेत्रात आणखी प्रगती होण्यास मदत होणार आहे, याची औरंगाबादचा लोकप्रतिनिधी या नात्याने मला विशेष अभिमान वाटतो.
  जसे चेन्नईचे संकरा नेत्रालय, हैदराबादचे एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट, तामिळनाडूतील अरविंद आय इन्स्टिट्यूट, मुंबईतील डॉ. नटराजन यांचे आदित्यज्योत हॉस्पिटल, तसेच जालना येथील गणपती नेत्रालय जसे सुप्रसिद्ध आहेत, तसेच औरंगाबादचे डोणगावकर आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरचे सर्वत्र नाव होईल.
  नेत्ररोगांच्या उपचारामध्ये दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. यात दृष्टिदोषासाठी लॅसिकसारखी लेझर किरणे, काचबिंदू, मोतीबिंदू आणि रेटायनासाठी नवीन उपचार पद्धती, इतकेच नाही तर कृत्रिम डोळे, लेन्स, लहान मुलांच्या डोळ्याच्या विकारांवर उपचार, तसेच तिरळेपणासाठी किंवा सौंदर्य वाढविण्यासाठी डोळ्यांची कॉस्मेटिक ट्रीटमेंट या सर्वांनी जणूकाही एक क्रांती घडवून आणली आहे.
  भारतात किमान ५ टक्के व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि जगात सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण भारतात आहेत. तेव्हा मधुमेहामुळे होणाºया गुंतागुंतीचे विशेषत: रेटायनावर होणा-या त्यांच्या दुष्परिणामांवर वेळीच योग्य उपचार यामध्ये होतील अशी मी आशा करतो. एक व्यावसायिक रुग्णालय चालविण्याव्यतिरिक्त आपण सामाजिक बांधिलकीने नेत्रदान चळवळीत भाग घ्याल अशी मी अपेक्षा करतो.
  समाजासाठी आपण डोळ्यांच्या आरोग्यावर जनजागरण करावे, यासाठी लोकमत आणि मी नेहमी तुमच्याबरोबर असेन. तसेच औरंगाबाद व आपल्या ग्रामीण परिसरातील गरीब जनतेसाठी आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, शाळेतील मुलांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करावीत व त्यासाठी मी आपल्याला हवी असलेली मदत करण्यास नेहमीच तयार असेन, याची मी या प्रसंगी आपल्याला खात्री देतो.
  कोई आँखे भरके, याद करे, बिछडे साजन को,
  किसान की आँखे तकती है, छुपे हुये सावन को,
  माँ आँखे बिछाती है लाडले के आवन को,
  औरंगाबाद के नैनो की बधाई आज आपके उद्घाटन को

  कत्ल करना है तो नयन से कर
  तलवार में क्या रखा है.
  कि ना हो तकलीफ हो ते रे बापको तलवार उठानेकी
  और मुझे तेही नजर छोडकर सर झुकानेही
  धमेंद्र -मालासिंहच्या आँखे चित्रपटाची थीम होती मुल्क की सरहद को कोई छु नही सकता 
  जिस मुल्क की निगेबान है आँखे
  डोळे तुझे जुल्मी गडे...
  डोळे असतात हृदयाची खिडकी आणि झरोका मनाचा
  तर अशा या अमूल्य डोळ्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी डॉ. स्वप्नील डोणगावकर यांनी डोणगावकर आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटरची सुरुवात केली आहे. डॉ. डोणगावकर उच्चविद्याभूषित तर आहेच परंतु त्यांना ५ वर्षांचा अनुभव जालना येथील सुप्रसिद्ध श्री गणपती नेत्रालय येथे काम करण्याचाही आहे.
  दिल की बाते बता देती है आँखे
  धडकनो को जगा देती है आँखे
  मना के नंदी आती है आँखो के रास्ते
  मगर कभी कबार नींद उडा देती है आँखे
  डोळ्यांना आत्म्याची आणि हृदयाची खिडी म्हणतात. कुणाकडेही बघितले, की सगळ्यात आधी आपलं कक्ष त्या व्यक्तीच्या डोळे बोलूनच जातात. म्हणृनच तर अनेक राजकारणी रात्रीसुद्धा गॉगल लावतात. डोळे आपल्या भावनांचा आरसा असतात. खरचं, जग खूप सुंदर आहे आणि हे सौंदर्य तुम्हाला, आम्हाला सर्वांना दिसायलाच हव.
  डोळे असतात हृदयाची खिडकी आणि झरोका मनाचा, 
  क धी दाखवितात वास्त तर कधी  इंद्रधनु स्वप्नांचा...
 • मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात केलेले भाषण
  तारीख :  १७ सप्टेंबर २००७
  ठिकाण  :  औरंगाबाद
  कार्यक्रम :  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

  आमदार राजेंद्र दर्डा यांनी
  मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात केलेले भाषण

  भावांजली...
  मराठवाड्यातील ५, तेलंगणचे ८, कर्नाटकातील ३ जिल्हे मिळून निजामाचे ‘हैदराबाद संस्थान’ ८२ हजार चौरस मैलांवर पसरले होते. १९४७ साली या संस्थानाची लोकसंख्या होती १ कोटी ६३ लक्ष! आपला देश १५ आॅगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला; पण हैदराबाद संस्थानातील जनता (म्हणजेच आपण सर्व मराठवाड्यातील भूमिपुत्र!) पारतंत्र्यात खितपत पडली होती. जुलुमांना तोंड देत होती. या बेड्या तोडण्यासाठी जनतेने चळवळ उभारली. या चळवळीला जिवावर उदार होऊन, घर संसाराला तिलांजली देऊन ज्या नेत्यांनी दिशा दिली त्यांना आजच्या दिनी माझी मन:पूर्वक आदरांजली आणि या झुंझार नेत्यांच्या मागे जी पीडित जनता उभी राहिली तिलाही माझे प्रणाम! त्यांच्या बलिदानानेच भारताला स्वातंत्र्य मिळूनही पारतंत्र्यात असलेले आपण मराठवाड्यातील सर्व १ वर्ष १ महिन्यानंतर म्हणजेच १७ सप्टेंबर १९४८ साली स्वतंत्र झालो. हे आपण कसं विसरू शकतो.
  आपल्या मराठवाड्याच्या ललाटावर लिहिलेला मागासलेपणा अलीकडे पुसट होत चाललाय. शिक्षणापासून औद्योगिकीकरणापर्यंत या भूमीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. एक लोकप्रतिनिधी आणि संपादक या दुहेरी भूमिकेतून या वाटचालीला कसा हातभार लावता येईल याविषयी अगदी मनापासून मला तळमळ वाटते. चला, आज करूया प्रतिज्ञा, की आपल्या मराठवाड्याला देशातील सर्वात प्रगत प्रदेशाच्या पंक्तित नेऊन बसवूया! राजकारण बाजूला ठेवून, सौहार्दपूर्ण वातावरणात मराठवाड्याच्या विकासाचा विडा उचलूया!

  ‘‘वक्त की राह में चलना सिखो,
  ठोकरे खाओ, संभलना सिखो,
  है वक्त का तकाजा आज यही,
  जीना चाहते हो तो मरना सिखो.’’
 • लोकमत रौप्यमहोत्सव समारंभात केलेले भाषण
  तारीख : ९ जानेवारी २००७ 
  ठिकाण  : औरंगाबाद
  कार्यक्रम :  लोकमत रौप्यमहोत्सव 

  आमदार राजेंद्र दर्डा यांनी
  लोकमत रौप्यमहोत्सव समारंभात केलेले भाषण

  महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील, केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री प्रफुल्लभाई पटेल, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला, माजी केंद्रीय आरोग्यमंत्री व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, भाषिक वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष सुनील डांग, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक भारतकुमार राऊत, माजी मंत्री सुरेशदादा जैन, भंवरलाल जैन, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. विमलताई मुंदडा, नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे, इंडियन न्यूज पेपर सोसायटीचे अध्यक्ष हार्मोस कामा, लोकमत वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक खा. विजय दर्डा, संपादक दिनकर रायकर, उपस्थित बंधू-भगिनी आणि पत्रकार मित्रांनो,
  ‘दैनिक लोकमत’नं बघता बघता रौप्यमहोत्सव गाठला आहे. मन भावनांनी ओथंबून येत आहे. ९ जानेवारी १९८२  रोजी या दैनिकानं मराठवाड्यात जन्म घेतला आणि मग मागे पाहिलं नाही. ऐन उमेदीच्या उंबरठ्यावर मी ‘लोकमत’चं स्वप्न घेऊन मराठवाड्याच्या संस्कृती संपन्न मातीत पाय ठेवला नि या मातीनं केव्हा ‘लोकमत’ला नि मला अंकुरलं, फुलवलं नि नवे पंख दिले, पंखांना बळ दिलं आणि विक्रमांची अनेक उड्डाणं करण्याची सुवर्ण संधी दिली ते कळालंच नाही. नवं, चांगलं तात्काळ स्वीकारायचं हे मराठवाड्याच्या मातीचं वैशिष्ट्य ‘लोकमत’नं अनुभवलं. गेल्या पंचवीस वर्षांत ‘लोकमत’ला मराठवाड्यातील वाचकांनी भरभरून प्रेम दिलं. जाहिरातदार, एजंट, वार्ताहर, जिल्हा प्रतिनिधी, संपादकीय, प्रशासकीय, जाहिरात, वितरण, निर्मिती-मुद्रण विभाग या सा-यांनी झपाटून कामं केली. रात्रीचा दिवस केला. अपार कष्ट उपसले बँकर्स आणि सप्लायर्स यांनी बहुमोल मदत केली आणि त्यातूनच ‘लोकमत’चं आजचं वैभव निर्माण झालं आहे.
  लोकाश्रयाशिवाय वृत्तपत्र जगूच शकत नाही. म्हणूनच मला कृतज्ञता वाटते आहे, ती ‘लोकमत’ला मन:पूर्वक पाठबळ देणा-या लक्ष-लक्ष वाचकांप्रती! माझे पिताजी आणि स्वातंत्र्यसेनानी बाबूजी जवाहरलालजी दर्डा आम्हाला सांगायचे, ‘वृत्तपत्राचा खरा मालक वाचक असतो’. मी मराठवाड्यात माझे ज्येष्ठ सहकारी नि कार्यकारी संपादक कै. बाबा दळवी यांच्यासोबत पाया रोवला तो यशाचा दृढनिश्चय करूनच! यासाठी माझे वडील बाबूजी कै.जवाहरलालजी दर्डा आणि वडील बंधू विजयबाबू दर्डा यांची अनमोल प्रेरणा माझ्या पाठीशी होती. आज लोकमतची वाचकसंख्या १ कोटी ८ लाख आहे. १४ आवृत्ती महाराष्ट्रात प्रथम आणि देशात चौथ्या क्रमांकाची वाचकसंख्या आहे. ही प्रगतीची उत्तुंग झेप पाहिल्यावर माझ्या डोळ्यांत समाधानानं आनंदाश्रू तरळतात.  
  ‘लोकमत’च्या या अभूतपूर्व यशामध्ये ‘लोकमत’नं बाळगलेलं ‘पत्रकारिता मूल्य’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकलं आहे, अशी माझी ठाम धारणा आहे. 
  लातूर-उस्मानाबादच्या भूकंपानंतर पुनर्वसनाचे काम असो, पूरग्रस्तांचे प्रश्न किंवा माजी सैनिकांच्या मुलांना वसतिगृह बांधून देण्याचं कार्य असू द्या, जेव्हा जेव्हा देशासमोर कोणत्याही प्रदेशात संकट उभं ठाकलं तेव्हा तेव्हा ‘लोकमत’नं सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन आपल्या वाचकांच्या बळावर मदतीचा हात दिला. ‘लोकमत’ची समाजाशी नि देशाशी असणारी नाळ अशी अतूट आहे.
  बातम्या देताना ‘लोकमत’ने कधी पक्षपात केला नाही. अगदी माझे वडील आणि मीही सरकारमध्ये मंत्रिपद भूषवीत असताना सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणं कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ‘लोकमत’ने निर्भयपणे छापली. ‘लोकमत’ सर्वांचा आहे ही भावना जोपासली. स्वत:ची निश्चित अशी धर्मनिरपेक्षता व सामाजिक न्यायाची भूमिका असली तरी दुस-या पक्षांना वा विचारांना अस्पृश्य मानलं नाही. देशाचं ऐक्य सर्वांत श्रेष्ठ मानून देशाच्या ऐक्याला तडा जाईल, अशा विचारांना खतपाणी घातलं नाही. जातीय व धार्मिक तंट्यांना कधी चालना दिली नाही. वृत्तपत्र हे माणसं पेटविण्यासाठी नाही, तर माणसं घडविण्याचं माध्यम आम्ही मानलं.
  आज ‘लोकमत’ रौप्यमहोत्सव पूर्ण करीत असताना एका नव्या पर्वात प्रवेश करीत आहे, असे आम्ही मानतो. हा दिवस आम्हा ‘लोकमत परिवारा’च्या जसा आनंदाच्या अभिव्यक्तीचा आहे, तसाच तो आत्मपरीक्षणाचाही आहे, असे आम्ही मानतो.
  लोकमतमध्ये काम करणा-या प्रत्येकाने आपली जनतेप्रती आणि वाचकांप्रती असणारी बांधिलकी निसटून जाऊ नये याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे.
  आपण एका मोठ्या वृत्तपत्राचे घटक आहोत याचा दर्प आणि अहंकार आपल्या वागण्या-बोलण्यात उतरत तर नाही ना, याची काळजी सर्व ‘लोकमत’ परिवारा’नं घ्यायला हवी. डोक्यात हवा शिरू नये याचं भान ठेवावं आणि सतत बदलणा-या या ग्राहकप्रधान जगात ग्राहक नि वाचकांना सतत मोलाचं मानत जावं. उतणार नाही, मातणार नाही व घेतला वसा सोडणार नाही, हे अभिवचन आम्ही वाचकांना आणि हितचिंतकांना देतो आहोत.
  ‘लोकमत’ व्यवस्थापनात आता दर्डा परिवाराची तिसरी पिढी आली आहे. देवेंद्र दर्डा, ऋषी दर्डा आणि करण दर्डा हे ‘लोकमत’ला नव्या कल्पनेनं नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही प्रयोग करीत आहेत. लोकमत विस्ताराच्या योजना आखत आहेत.
  ‘लोकमत’यापुढे आपल्या गुणात्मक वाढीकडे आणि दर्जाकडे अधिक लक्ष देणार आहे. सर्वाधिक खप आहे म्हणून आपणास सुधारणेस वाव नाही,अशी अहंकारी वृत्ती आमच्यात आम्ही बळावू देणार नाही. लोकप्रिय दैनिकही दर्जेदार व सकस मजकूर देऊ शकतं हे आम्ही सिद्ध केलं आहे. नवा शिक्षित महाराष्ट्र घडवायचा आहे. मराठवाड्याच्या परिवर्तनाचा साक्षीदारच नव्हे तर सक्रिय भागीदार व्हायचं आहे. ‘लोकमत’ला मिळालेलं वाचकांचं उदंड प्रेम व लोकाश्रय हीच आमची खरी शक्ती आहे. ते शक्तिस्थान पुढील २५ वर्षांत अधिक मजबूत करण्यासाठी अखंड परिश्रम घेण्याचं आणि वाचकांच्या विश्वासाला जागण्याचं अभिवचन देत आहे.
  ‘‘तुम्हारे कदमों में गर करामत होगी,
  तो हर फरिश्ते से तुम्हारी मुलाकात होगी,
  गर तुम बदल डालो अपना नजरिया,
  हो हर जबा पे तुम्हारी ही बात होगी.’’
 • १६ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनात केलेले अध्यक्षीय भाषण
  तारीख : 13 नोव्हेंबर 2005
  ठिकाण : उस्मानाबाद
  कार्यक्रम : १६ वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलन

  आमदार राजेंद्र दर्डा यांनी
  १६ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनात केलेले अध्यक्षीय भाषण

  सोळावं अ.भा. मराठी जैन साहित्य संमेलन ज्यांच्या मंगल सान्निध्यात संपन्न होत आहे ते परमपूज्य भट्टारक लक्ष्मीसेन महाराज, स्वागताध्यक्ष डॉ. राजेश फडकुले, संमेलनाचे संयोजक प्रा. डॉ. रावसाहेब पाटील, प्रमुख पाहुणे आ. प्रकाशजी आवाडे, आ. शरद पाटील, आ. गजेंद्र ऐनापुरे, आ. राजू शेट्टी आणि मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले, सौ. सुरेखा शहा, डॉ. सुभाषचंद्र आक्कोळे, डॉ. विलास संगवे, विद्युल्लता शहा, श्रेणिकभाई देवधरे, या संमेलनाला उपस्थित असलेल्या शहराच्या नगराध्यक्षा डॉ. ऊर्मिला गजेंद्र गडकर, संघटनेचे सर्व पदाधिकारी, संमेलनाचे प्रमुख आयोजक आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था आणि आर्यनंदी परिवाराचे सदस्य, संपादक अरुण खोरे आणि अरुण करमरकर,  पत्रकार बंधू आणि उपस्थित बंधू-भगिनींनो,  अ.भा. जैन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझ्यासारख्या एका पत्रकाराची निवड करून आपण माझ्याएवढाच माझ्या पत्रकारबांधवांचाही गौरव केला आहे. पत्रकारांच्या लेखणीचा हा सन्मान आहे, असे मी मानतो. सामान्यपणे पत्रकारांनी मांडलेली मते (जर्नालिस्टिक आॅब्झर्व्हेशन्स) ज्ञानवंतांच्या क्षेत्रात फारशी गंभीरपणे घेतली जात नाहीत. या स्थितीत साहित्य संमेलनासारख्या गंभीर सोहळ्याचं नेतृत्व माझ्याकडं सोपवून आपण एक जोखीमही पत्करली आहे. साहित्य क्षेत्रावर माझा अधिकार आहे, असं सांगण्याचं औद्धत्य मी करणार नाही. या क्षेत्रातील माझं स्थान उपासकाचं आणि वाचकाचं आहे. परंपरागत आणि चांगलं साहित्य अतिशय आस्थेनं वाचणारा आणि त्याचं मनन करणारा मी एक सामान्य रसिक आहे. मला अध्यक्षपदी निवडून आपण एका उपासकाला आशीर्वाद आणि एका रसिकाला सन्मान दिला आहे, हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो.
  मराठी जैन साहित्य संमेलनाचं हे सोळावं अधिवेशन मराठवाड्यात प्रथमच साजरं होत आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे. अनेक संतांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या आणि साहित्याची मोठी परंपरा आणि कला-संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या मराठवाड्याच्या भूमीत मराठी जैन साहित्यप्रेमींचा हा साहित्य सोहळा व्हावा, ही निश्चितच औचित्यपूर्ण घटना आहे. इथल्या वेरूळ, अजिंठ्याच्या चित्रशिल्पांनी जगभरातील कलाप्रेमींना मोहिनी घातली आहे, तर जैन आणि बौद्धकालीन लेण्यांनी प्राचीन धर्मपरंपरांचा इतिहास जागता ठेवला आहे. ललित कला, संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प यांना जैन संस्कृतीत आणि साहित्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कलाविष्कारांची, तसेच प्राचीन भारतीय शिल्प, स्थापत्य अभ्यासाची परंपराही मराठी जैन साहित्यानं जोपासली असून, मराठवाड्याशी तिचा अन्योन्य संबंध आहे. मराठवाड्यात प्राचीन जैन मंदिरांचे अवशेष आणि अनेक शिलालेख पाहावयास मिळतात. ज्या उस्मानाबाद शहरात हे साहित्य संमेलन भरलं आहे, त्याच्या जवळच तेर येथे झालेल्या उत्खननामुळे प्राचीन इतिहासावर नवा प्रकाशझोत टाकला गेला आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात धाराशीव इथं करकंडू राजानं सुंदर गुहा, मंदिरे खोदविल्याचा उल्लेख आहे. वेरूळ येथील लेण्यांमधील इंद्रसभा लेणी खोदविणारा एल सामंत हा राष्ट्रकूट राजा इंद्र याचा मांडलिक होता. यादवांची राजधानी असलेल्या देवगिरीच्या अंबरकोटातील जैन मंदिर आजही आपण पाहू शकतो. जैन धर्म आणि संस्कृतीशी संबंधित अनेक शिलालेख मराठवाड्यात आहेत. जैन धर्माचं प्रभावक्षेत्र असलेल्या या परिसरात हे संमेलन भरत आहे. थोर साहित्यिक स्व. मोतीलाल हिराचंद गांधी ऊर्फ कवी ‘अज्ञात’, स्व. गोपाल बालाजी बीडकर ऊर्फ कवी ‘बालसुत’ हेही मराठवाड्याचेच. कोल्हापूरच्या महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या विद्यमाने या विभागात प्रथमच होत असलेल्या मराठी जैन साहित्य संमेलनाद्वारे हा प्रवाह अधिक गतिमान आणि समृद्ध होण्यास निश्चितच मदत होईल. याप्रसंगी मराठवाड्यातील थोर साहित्य प्रेरणा शक्ती आचार्य आर्यनंदीजी महाराज यांचं मी नम्रपणे स्मरण करतो.
  ४ जून १९८४ रोजी जैन समाजातील धर्मप्रेमी आणि साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत कोल्हापूर येथील श्री लक्ष्मीसेन जैन मठाचे परमपूज्य भट्टारक लक्ष्मीसेन महाराज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेची स्थापना झाली. मराठी जैन साहित्य परिषदेचं पहिलं अधिवेशनही त्यांच्याच अध्यक्षतेखाली १२ जून १९८६ रोजी कोल्हापूर इथं पार पडलं. तेव्हापासून जैन साहित्य परिषदेची व्याप्ती सातत्यानं वाढतच राहिली आहे. येथून जवळच सोलापूर इथं भरणा-या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हे सोळावं मराठी जैन साहित्य संमेलन होत असल्यानं वेगळ्या अर्थानं ते लक्षवेधी ठरणं साहजिक आहे. आजवर अनेक दिग्गज साहित्यिक, विचारवंत आणि प्रज्ञावंतांनी या संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषविलं असून, या पदाला एक प्रकारची उंची प्राप्त झाली आहे. या पदावर विराजमान होण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं परमभाग्य समजतो. गेल्या पंधरा साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांनी जैन मराठी साहित्याबाबत अधिकारवाणीनं विचार व्यक्त केले असून, ते अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहेत. खरं तर त्यात मी आणखी काही भर घालावी अशी स्थिती नाही. मराठी जैन साहित्याचा हा प्रवाह अधिक वाढावा, विस्तारावा आणि गतिमान व्हावा यादृष्टीनं एक साहित्यप्रेमी म्हणून मीही त्यात माझी ओंजळ रिती करीत आहे; इतकंच! 
  परमपूज्य भट्टारक लक्ष्मीसेन महाराज, सन्माननीय सुमेरचंद्रजी   जैन, माननीय डॉ. विलासजी संगवे, डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, प्राचार्य जी.के. पाटील, माननीय मा.ज. भिसीकर, प्राचार्य विद्याधर कुमाठे, डॉ. निर्मलकुमार फडकुले, माननीय श्रीमती विद्युल्लता हिराचंद शहा, माननीय श्री. महावीर जोंधळे, डॉ. सौ. शरयू विनोद दोशी, शाहीर कुंतीनाथ करके, प्राचार्य डॉ. मा.प. मंगुडकर, माननीय श्री. शांतीलाल भंडारी, माननीय सौ. सुरेखा चंद्रगुप्त शहा यासारख्या अभ्यासू आणि अधिकारसंपन्न पूर्वसुरींची परंपरा लाभलेले हे अध्यक्षपद मी फार संकोचानं स्वीकारलं आहे. या संकोचावर मात करण्याचं बळ मला वं. भगवान महावीर यांनी जगाला केलेलं चिरंतन स्वरूपाचं नैतिक मार्गदर्शन यावरील श्रद्धेतून मिळविता आलं आहे. एखाद्या धर्मात जन्माला येणंच केवळ पुरेसं नसतं. त्या धर्माची दार्शनिक भूमिका आणि त्याची आचरणविषयक शिकवण अभ्यासानं आत्मसात केल्याखेरीज कुणालाही त्याविषयी बोलण्याचा आणि त्यावर अधिकार सांगण्याचा हक्क ख-या अर्थानं प्राप्तच होत नाही, असं मी नम्रपणे मानत आलो. मी या दिशेनं प्रयत्न करणारा साधा माणूस आहे, हे मी कोणतीही अहंता न बाळगता इथं नमूद करू इच्छितो.
  ‘खुशबू की तरह आपके पास बिखर जायेंगे
  सुकून बनकर दिल में उतर जायेंगे,
  महसूस करने की कोशिश तो कीजिए
  दूर होते हुए भी पास नजर आयेंगे!’
  ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर जैन धर्म हा भारतातील आणि जगातील एक अति प्राचीन धर्म आहे. जैन परंपरेनं या देशाची विचारधारा, संपन्न आणि प्रगल्भ बनविली आहे. भारतीय धर्मपरंपरांना अशा रक्तपाताचा वा हिंसेचा स्पर्श नाही हे त्यांचं मोठेपण होय. या परंपरांनी स्वीकारलेला अहिंसेचा मूलमंत्र सर्वप्रथम जैन धर्मानं त्याच्या विकसित स्वरूपात उच्चारला ही बाब या धर्माच्या अनुयायांसाठी अभिमानाची आहे.  महात्मा गांधींच्या मन:पिंडावर आणि विचारसरणीवर जैन तत्त्वदृष्टीचा संस्कार झालेला होता, असं त्यांनी आपल्या आत्मकथेत नमूद केलं आहे. त्यामुळंच अहिंसा, अपरिग्रह आणि मद्य, मांस यांचा त्याग या विचाराशी त्यांची भूमिका निगडित होती. पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांच्यापासून सुरू होऊन पुढील २२ तीर्थंकरांनी विस्तारित नेलेला हा ज्ञानाचा प्रवाह २४ वे आणि अखेरचे तीर्थंकर भगवान महावीर यांनी दृढमूल केला आणि लोकांच्या कल्याणासाठी तो आपल्या स्वाधीन केला. भगवान महावीरांचा मार्ग हा सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य यावर आधारलेला मोक्षमार्ग आहे. अनेकांतवाद विचाराची विश्वाला मौलिक स्वरूपाची देणगी केवळ जैन धर्मानं दिली, असं विधान अभिमानानं करता येईल.
  भारताच्या राज्यघटनेनं स्वीकारलेल्या सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या उद्दिष्टांचा महावीरांच्या शिकवणीशी संबंध आहे. न्यायाची प्लेटोनं केलेली व्याख्या अशी आहे- ‘प्रत्येकाला त्याच्या योग्यतेनुसार समाजात स्थान प्राप्त होणं’ आहे. प्रत्येकाला ज्ञानाचा अधिकार आणि जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार आहे असं भ. महावीरांनी प्रतिपादन केलं आहे. 
  Talent alone cannot make a writer.
  There must be a man behind the book.
  समाजाला दिशा देण्याचं, नवी मूल्यं देण्याचं काम साहित्यिकांनी करायला हवं. 
  प्रख्यात लेखक स्कॉट फीटझगेराल्ड यानं दिलेला संदेश इथं मला सांगावासा वाटतो. तो म्हणतो,
  “An author ought to write for the youth of his own generation, the critics of the next, and the schoolmasters of ever afterwards.”
  मराठी जैन साहित्य परिषदेची स्थापना करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना भट्टारक लक्ष्मीसेन महाराज यांनी आपल्या पहिल्या अध्यक्षीय भाषणात म्हटलं होतं की, ‘जैन साहित्यिक आणि नवोदित लेखक यांना प्रोत्साहन मिळावं आणि उत्तम दर्जाचं साहित्य निर्माण होऊन समाजप्रबोधन व्हावं, या हेतूनं या साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली.’ प्रारंभीच्या काळात असा मर्यादित हेतू ठेवला गेला असला तरी सुमारे दोन दशकांनंतर हा विचार कृतिशील मार्गानं पुढं नेण्याची आणि परिषदेच्या कार्याला अधिक व्यापकत्व नि विशालत्व प्राप्त करून देण्याची आता वेळ आली आहे. त्यादृष्टीनं जैन धर्माच्या सर्वच अभ्यासक, साहित्यप्रेमींना या प्रवाहात सामील करून घेणं उचित ठरेल. ‘मराठी जैन साहित्य’ म्हणजे ‘मराठीतून लिहिलेलं जैन विद्याविषयक साहित्य’ असा अर्थ अभिप्रेत असल्याचं जैन साहित्याचं गाढे व्यासंगी नि थोर संशोधक डॉ. विलास संगवे यांनी या संमेलनाच्या व्यासपीठावरूनच स्पष्ट केलं होतं. त्यादृष्टीनं मराठी जैन साहित्याच्या कोणाही अभ्यासकास हे व्यासपीठ खुलं असायला हवं. संमेलनाचे उद्घाटक म्हणून जैनेतर साहित्यिकांना निमंत्रित करण्याची परंपरा यापूर्वी सुरू झालेली आहेच; पण यापुढं संमेलनाचं अध्यक्षपद केवळ जैन साहित्याचा अभ्यासक एवढाच निकष न लावता जैन समाजाबाहेरील व्यासंगी व्यक्तीलाही दिलं गेलं, तर ते अधिक सुयोग्य ठरेल.  मराठी जैन साहित्याचा प्रसार नि प्रचार तर व्हायला हवाच; पण विविधांगांनी या साहित्याचा अभ्यास कसा होईल, हेही पाहिलं जायला हवं. यासंदर्भात थोर साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि महाराष्ट्रातील आधुनिक प्रबोधनाचे पाईक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा विचार मला फार मोलाचा वाटतो. ते म्हणतात, ‘जैन मराठी साहित्याची दीर्घ परंपरा आहे. जैन तत्त्वज्ञानातील अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांत या श्रेष्ठ मूल्यांवर आपलं साहित्य आधारलेलं आहे. जैन-मराठी साहित्य संमेलन कोणत्याही अर्थानं जातीय किंवा विशिष्ट धर्मीय संमेलन नसून ते अहिंसा व सत्यप्रेमी, समतावादी माणसांचं साहित्य संमेलन आहे. ‘जैन’ शब्दाचा   सांप्रदायिक अर्थ न घेता तो व्यापक अर्थानं घ्यावा.’ म्हणूनच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महान लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी जैन धर्माचं विश्ववंद्यत्व मान्य करताना म्हटलं आहे,
  “I adore so greatly the principles of the Jain religion that, I would like to to be reborn in a Jain community.”
  ‘जैन धर्माच्या तत्त्वांचा माझ्यावर एवढा प्रभाव आहे की, मला पुढील जन्मी जैन समुदायात जन्म घ्यायला आवडेल.’
  भारतीय तत्त्वज्ञानाची रचना जैन, बौद्ध आणि वैदिक या धर्मांची नि त्यांच्या दर्शनांची बनली आहे. त्यामुळं जैन धर्म आणि दर्शन यांचा सहभाग येथील समाजजीवनाच्या रचनेत कसा झाला आहे याची समीक्षा नव्यानं व्हावयास हवी. जैन धर्म आणि जैन दर्शनानं ‘अहिंसा’ हे मूलगामी मूल्य दिलं; पण त्याचं नेमकं काय झालं? बौद्ध धर्म जगात पसरला; पण जैन धर्म मात्र भारतातच राहिला. जैन समाजाची बंदिस्तता, त्याचा न झालेला जागतिक प्रसार-प्रचार यांची संगती लावणारा अशाही प्रकारचा अभ्यास झाला पाहिजे. अर्थात, त्यासाठी संस्कृत, पाली, अर्धमागधी या भाषांचा अभ्यास व्हायला हवा; त्याखेरीज जैनधर्मीय वाङ्मयातील हे विचारधन जागतिक स्तरावर नेता येणार नाही. जगात आज वाढत चाललेल्या हिंसाचार आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर ‘जगा व जगू द्या’ हा महान संदेश देणा-या आणि अहिंसेचे महत्त्व प्रभावीपणे सांगणा-या या वाङ्मयाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार-प्रसार होण्याची नितांत गरज आहे. आपलं ते चांगलं आहे हे मान्य; पण ते आपल्यापुरतंच ठेवण्याची संकुचित वृत्ती न दाखविता सर्वत्र कसं जाईल, याचा विचार करायला हवा. गेल्या काही वर्षांत जैनेतर विद्वानांनीही या साहित्याचं महत्त्व ओळखून प्राचीन नि मध्ययुगीन जैन साहित्याचं मन:पूर्वक स्वागत केलं आहे. डॉ. वि.भि. कोलते, डॉ. शं.गो. तुळपुळे, डॉ. रा.चिं. ढेरे, डॉ. अ.ना. देशपांडे, डॉ. व.दि. कुलकर्णी आदी साहित्यिकांनी या वाङ्मयाकडं लक्ष वेधण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. मराठी जैन ग्रंथांचा विद्यापीठ पातळीवरही तौलनिक अभ्यास होण्याची गरज आहे. अलीकडंच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ‘महावीर अध्यासन’ सुरू झालं, ही त्यादृष्टीनं आनंदाची बाब म्हणावी लागेल. मी अर्थराज्यमंत्री असताना श्री. आवाडेजी मंत्री होते. मराठीतील महानुभाव आणि वारकरी संतांच्या साहित्याप्रमाणेच जैन साहित्य उपयुक्त आहे, असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. महाराष्ट्राची जी लोकसंस्कृती जैन साहित्यात प्रतिबिंबित झालेली आहे, त्यासंबंधी मोठी जिज्ञासा संस्कृतीच्या अभ्यासकांत निर्माण झालेली आहे.
  जैन धर्म सामान्य समाजाशी एकरूप झाल्यानं जैन साहित्यिकांनी लोकभाषेत वाङ्मयनिर्मिती केली असली तरी, समाजाच्या विशिष्ट वर्गापुरतंच ते सीमित न राहता महाराष्ट्रीय संस्कृतीशी ते व्यापक प्रमाणात एकरूप व्हायला हवं. त्यादृष्टीनं साहित्यिकांच्या नव्या पिढीनं पुढाकार घ्यायला हवा. जैन धर्मीयांच्या विविध घटकांशी निगडित वेगवेगळ्या नियतकालिकांनीही व्यापक दृष्टिकोन बाळगून वाटचाल करणं हितावह ठरेल. ‘जैन बोधक’पासून सुरू झालेला नियतकालिकांचा प्रवास ‘जैन बंधू’, ‘जैन मार्तंड’, ‘वंदे जिनवरम्’, ‘जैन भाग्योदय’, ‘तीर्थंकर’, ‘रत्नत्रय’, ‘सन्मति’, ‘सार्वधर्म’, ‘दिव्यध्वनी’, ‘प्रगती आणि जिनविजय’, ‘जैन जागृती’, ‘जैन परंपरा’ अशा अनेक नियतकालिकांपर्यंत सुरू राहिला आहे. जैन वाङ्मयाप्रमाणेच ही नियतकालिकंही मूल्यसंवर्धन आणि समाजप्रबोधनाचं चांगलं कार्य करीत आहेत. यातील ब-याच नियतकालिकांतील लेखनाला चांगलं साहित्यमूल्य प्राप्त झालं असून, मराठी जैन वाङ्मयात मौलिक भर टाकली जात आहे. भारतीय स्तरावर राजस्थानचे डॉ. रमेश जैन यांनी पत्रकारिता, प्रशिक्षण, जैन पत्रकारिता या क्षेत्रांत केलेल्या अतुलनीय योगदानाचाही मी उल्लेख करू इच्छितो. अशा लेखक, संशोधकांची नोंद आपल्या संमेलनानं घेऊन त्यांचा गौरव करायला हवा, असं मला वाटतं.
  भारतीय संस्कृतीच्या प्रवाहात जैन तत्त्वधारा प्राधान्यानं मिसळली आहे. वैदिक, जैन आणि बौद्ध, वीरशैव, शीख इत्यादी धर्मविचारांच्या अनेक धारा मिळून भारतीय संस्कृती घडलेली आहे. तिला जैन परंपरेचा भक्कम आधार मिळाला आहे. ‘अहिंसा’ हे तर जैन धर्माचं मूलतत्त्व आहे. आत्मसाधना आणि व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच जनकल्याणाचा, सा-या प्राणिमात्रांचं भलं करण्याचा विचार जैनमुनी-साधू यांनी विविध साहित्य कृतीतून मांडला; पण दुर्दैवानं या साहित्य संपदेबद्दल जैन समाजात अशी उदासीनताच आहे, असं खेदानं सांगावसं वाटतं. या साहित्याबद्दल नव्या पिढीत रुची कशी निर्माण होईल, याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे. जैन समाजाशी संबंधित मराठी नियतकालिकांना त्यादृष्टीनं जाणीव जागृतीचा प्रयत्न चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल. देशातील वाढता हिंसाचार आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर तर जैन साहित्यातील तत्त्वविचारांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जैन साहित्यातील अहिंसेच्या तत्त्वज्ञानात केवळ मानवी आणि प्राणिमात्रांच्याच अहिंसेचं तत्त्व अंतर्भूत नाही, तर वृक्षांच्या कत्तलीलाही विरोध दर्शविण्यात आला आहे. ‘पर्यावरण रक्षण’ हा परवलीचा शब्द बनला आहे; पण ‘वसुंधरा वाचवा’ ही संकल्पना अनेक वर्षांपासून जैनाचार्यांनी मांडली आहे. त्यांचं हे द्रष्टेपण थक्क करणारं आहे. शोषणाला, भोगवादाला, वर्णव्यवस्थेतील उच्च-नीचतेला, एवढंच नव्हे तर स्त्री-पुरुष विषमतेलाही जैन आचार्यांनी नेहमीच विरोध केला आहे. तथापि, जैन समाजातील मंडळींनी त्याकडं म्हणावं तेवढं लक्ष दिलेलं नाही. ज्या जैन साहित्यात   समाजजीवन प्रतिबिंबित करण्याचा, जीवनपद्धती सत्शील बनविण्याचा आणि मानवी जीवन सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न झाला आहे, त्या साहित्याकडं नव्या पिढीचं लक्ष आवर्जुन वेधण्याची आवश्यकता आहे. आपल्याजवळ जे चांगलं आहे, त्याचा अभिमानानं उल्लेख करायला हवा.
  मुख्यत्वे दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात बहुसंख्येनं असणारा जैन समाज अधिकतर शेती, व्यापार-उद्योगात गुंतलेला असून, तुलनेनं आर्थिक सुस्थितीतील आहे. धर्माचा प्रभाव असणारा, निर्व्यसनी, परंपरावादी आणि शिक्षणाबाबत आस्था बाळगणारा आहे. नोकरीपेक्षा परंपरागत उद्योग-व्यवसायाकडं अधिक लक्ष द्यावं, असं नव्या पिढीला वाटत असतं. ते त्यांनी जरूर करावं; पण आपल्या उद्योग-व्यवसायाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न करावा. अलीकडं उच्चशिक्षण आणि विशेषत: तंत्रशिक्षणाकडं जाणीवपूर्वक वळणा-यांची संख्याही हळूहळू वाढत चालली आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे. जागतिकीकरणामुळं जग अधिक जवळ येत चाललं आहे. अशा परिस्थितीत आपल्या उद्योग-व्यवसायाच्या कक्षा रुंदावणं आणि कर्तृत्वाची क्षितिजं विस्तारणं ही काळाची गरज बनली आहे. उज्ज्वल भवितव्य आणि उत्कर्षासाठी तरुणांनी कुठंही जाण्याची तयारी ठेवायला हवी. व्यक्तिगत विकासाबरोबरच समाजाच्या विकासासाठी कार्य करण्याचीही संधी त्यांना घेता येऊ शकेल. जैन धर्माच्या मूलतत्त्वांचा प्रचार-प्रसार तर ते करू शकतीलच; पण अहिंसेचं महान तत्त्व पायाभूत असणा-या या शांततावादी धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते अभिमानानं वावरू शकतील. जागतिक स्तरावरील नव्या गरजांचा विचार करून ज्ञानसाधनेला आणि नव्या तंत्रशिक्षणाला तर अग्रक्रम द्यायला हवाच; पण पुरोगामी विचारांचाही अंगीकार करायला हवा. जैन धर्माचा अभ्यास व्यापक पातळीवर कसा होईल हे त्यांनी जरूर पाहावं; पण धर्माचं राजकारण करू पाहणा-या समाजविघातक, स्वार्थी घटकांपासून दूर राहायला हवं. जैन धर्मात समता अभिप्रेत आहे; पण आजही श्वेतांबर, दिगंबर, चतुर्थ-पंचम, असे काही भेद आहेत. या विषमतेचं भान ठेवून किमान धर्मांतर्गत अनिष्ट चालीरीतींना, उच्च-नीचतेला फाटा कसा देता येईल, रोटी-बेटी व्यवहार कसे वाढतील हे पाहायला हवं. समाजातील ज्या वृद्ध नि विधवांची अवस्था शोचनीय आहे, त्यांच्यासाठी काही भरीव काम करता आल्यास ते एक प्रकारे ‘धर्माचे कार्य’ तर ठरू शकेलच; पण आत्मसमाधान देणारंही ठरेल. महिलांना समानतेनं वागणूक देण्याची शिकवण धर्मानं दिली आहे; पण प्रत्यक्षात त्यांना आपण कितपत आत्मसन्मानाची वागणूक देतो, याचाही अंतर्मुख बनून विचार करायला हवा. माझ्या भाषणात मी तरुणांशी काहीशा अधिक धिटाईनं आणि मोकळेपणानं संवाद केला. कारण समाजप्रबोधनाचं, परिवर्तनाचं, बदलाचं आणि नवी दिशा देण्याचं कार्य तेच करू शकतील यावर माझा विश्वास आहे. (मंजील उन्ही को मिलती हैं ।  जिन के सपनों में जान होती है । पंख से कुछ नहीं होता । हौसले से उड़ान होती हैं ।
  जैन संस्कृती : मराठी भाषा जननी
  मराठीतून साहित्य रचना करणारा जैन साहित्यिकांचा वर्ग मोठा, प्रस्थापित नि सन्माननीय आहे. या वर्गानं धर्माची शिकवण आपल्या साहित्यातून मांडत असतानाच मराठी साहित्याचीही उंची आणि प्रगल्भता वाढविली आहे. लिखित मराठी भाषेची सुरुवातच महावीरांच्या अनुयायांनी केली ही गोष्ट सा-या महाराष्ट्राला आता मान्य झाली आहे. श्रवण बेळगोळ येथील भगवान गोमटेश्वरांच्या अभितव्य प्रतिमेच्या पायाशी ‘श्री चामुंडराये करवियले’ हे सांगणारा शिलालेख आहे आणि त्यावरील मराठी वाक्य हे मराठी भाषेतील पहिलं लिखित वाक्य आहे, ही गोष्ट इतिहासानंही मान्य केली आहे. मराठी भाषा ज्ञानेश्वरांच्याही पूर्वीपासून विकसित होत आलेली भाषा आहे. भगवान गोमटेश्वरांच्या पायाशी असणारा शिलालेख हा मराठीच्या विकसनशीलतेची साक्ष पटविणारा आहे. कुंदकुंद, हरिभद्र, मणिभद्र यासारख्या तप:पूत ज्ञानश्रेष्ठांनी जैन तत्त्वज्ञानाचा विकास घडविला, तसा त्यांच्या उत्तराधिका-यांनी ज्ञानाएवढाच मराठीच्या विकासाला हातभार लावला हे सांगणारी ही बाब आहे. आजच्या मराठी साहित्यात महावीरांच्या अनुयायांचा फार मोठा वर्ग आहे. डॉ. मा.प. मंगुडकरांसारखे विद्वान, शांतिलालजी भंडारीजींसारखे अनुभवसंपन्न आणि डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्यासारखे प्रतिभावंत आज याच मार्गावरून चालणारे आहेत. कथा, कादंबरी, कविता, नाटक या सा-या क्षेत्रांत जैन परंपरेचा अभ्यास करणारे आणि अभिमान बाळगणारे संशोधक आणि लेखक आहेत. या सा-यांविषयी मी माझ्या मनातील आदर व्यक्त करतो.
  साहित्य समाजाचं ज्ञानसंचित व भावसंचित
  साहित्याची ही धारा आणखी मोठी व्हावी आणि तिनं आपल्या प्रवाहात सा-यांना सामावून घ्यावं आणि तसं करताना तिचं स्वत:चं वेगळेपण मराठीच्या महान ओघात मिसळून जावं, अशी अपेक्षा मी इथं व्यक्त करतो. तसंही या परंपरेनं साहित्य क्षेत्रात आपलं वेगळेपण कधी सांगितलं नाही वा त्याचा अभिमानही फारसा मिरवला नाही. मराठी साहित्यात अशा वेगळ्या अभिमानाची उतरंडही लहान नाही. जैन साहित्याच्या परंपरेनं या उतरंडीहून मराठी साहित्यातील समांतरपण अधिक जपलं आहे आणि ते या परंपरेचं वैशिष्ट्य म्हणून सांगता येण्याजोगं आहे. साहित्य हे समाजाचं ज्ञानसंचित आहे, तसंच ते समाजाचं भावसंचितही आहे.
  साहित्यानं समाजाचा इतिहास जोपासला आहे तसा त्याचा शेकडो वर्षांचा अनुभवही शब्दबद्ध केला आहे. साहित्याची उपासना नि आवड हे एका अर्थानं   आपल्या संचिताचंच अध्ययन होय. चांगली साहित्यकृती माणसाला केवळ समाजच समजावून देत नाही, ती माणसाला त्याचीही ओळख पटवून देत असते. साहित्य वाचताना आपण आपल्या अधिक जवळ जात असतो.
  ग्रंथवाचनाचे महत्त्व
  चांगलं पुस्तक हे एखाद्या स्वच्छ आरशासारखं असतं. ते आपल्याला आपलं केवळ रूपच दाखवीत नाही, तर आपल्या गुणांची आणि उणिवांची ओळख पटवून देत असतं. साहित्य वाचकाला पुन:प्रत्ययाचा आनंद देतं, असं म्हटलं जातं. माझ्या मते ते वाचकाला पुन:प्रत्ययाएवढाच आत्मप्रत्ययाचाही आनंद प्राप्त करून देतं.
  ग्रंथवाचनानं माणूस समृद्ध होतो. शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक आणि बौद्धिक क्षमता उन्नत होते याचं भान आजच्या जैन समाजासहित भारतातील उच्चभ्रू समाजात किती आहे याबद्दल मी स्वत: साशंक आहे. ग्रंथ विकत घेऊन वाचण्याची क्षमता असणारा समाजही वाचन कमी का करतो हा मला सतत भेडसावणारा प्रश्न आहे. समाजातील उच्चभ्रू, लब्धप्रतिष्ठित आणि संपन्न समाजात वाचन संस्कृती वाढायला हवी. त्यासाठी जाणीवपूर्वक चांगल्या ग्रंथांची देवाण-घेवाण, वाचन व्यासपीठं निर्माण व्हायला हवीत.
  आल्फ्रेड व्हाईटहेड या विचारवंतानं म्हटलं आहे,
  Not ignorance, but ignorance of ignorance, is the death of knowledge.
  अज्ञान नव्हे, तर अज्ञानाबद्दलचं अज्ञान ही ज्ञानाची मृत्युघंटा असते. ब-याचपैकी संपन्न असणा-या जैन समाजानं आपल्या ज्ञानसंपन्नतेचं मागासलेपण भरून काढण्याचा अधिक भरीव प्रयत्न करायला हवा.
  साहित्यिकांना मार्गदर्शन वा उपदेश करणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे; पण समाजाचा एक सामान्य घटक म्हणून मला एका गोष्टीचा निर्देश करणं येथे महत्त्वाचं वाटतं. साहित्य ही माणसं जोडणारी बाब आहे. तिनं माणसं एकत्र आणावीत आणि समाज जोडावा, अशी अपेक्षा आहे. आपल्या दुर्दैवानं भारतीय समाज एकसंध नाही. त्यात धर्मांची भांडणं आहेत, जातींच्या जीवघेण्या स्पर्धा आहेत आणि पंथोपंथांचे परस्परांशी संघर्ष आहेत. याच संघर्षमय जीवनाचं प्रतिबिंब साहित्यात पडत असल्यानं त्या संघर्षांनी साहित्याच्या क्षेत्रातही आता प्रवेश केला आहे. आजारानं औषध बाधित करावं, असा हा दुर्दैवी प्रकार आहे. साहित्यिकांकडं समाज फार मोठ्या अपेक्षा घेऊन पाहतो. आपल्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांवर उपाय सुचविण्याची आणि ते हळुवार हातांनी निकालात काढण्याची क्षमता या प्रतिभावंतांकडं असेल अशीही माझी अपेक्षा आहे. आपल्या समाजातील अशा दोषांवर आवश्यक तिथं प्रहार नि गरज तिथं उपाययोजना सुचविण्याचं उत्तरदायित्व या वर्गानं आता स्वीकारलं पाहिजे, असं मला या व्यासपीठावरून नम्रपणे सूचवावसं वाटतं.
  आजच्या समाजामध्ये ताणतणाव, संघर्ष, कौटुंबिक संघर्ष, हिंसाचार, मालमत्तेचा संघर्ष, अमर्याद आसक्ती, चंगळवाद वाढताना दिसतो आहे. अशा वेळेस भगवान महावीरांच्या विचारांचा पुरस्कार करणारं संस्कार साहित्य ही जगभराची गरज आहे. आजचे प्रश्न आपणच निर्माण केले आहेत, ते सोडविण्याची जबाबदारीही आपलीच आहे. त्यासाठी प्रबोधन आणि सुबोध साहित्य परंपरा, तीदेखील आजच्या काळाला सापेक्ष अशी आपण निर्माण करण्याच्या दृष्टीनं लेखन कार्य हाती घ्याल याबाबत मला खात्री आहे.
  भारतीय स्त्री बदलत आहे. स्त्री साहित्य निर्माण होत आहे. स्त्रीची सृजनशीलता प्रगट होत आहे. स्त्रियांचं नवं रूप सारा समाज अनुभवतो आणि पाहतो आहे. त्यांचं प्रतिबिंब साहित्यात पडतं आहे. श्रीमती कीर्ती जैन या नवी दिल्लीच्या नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाच्या पूर्वसंचालक आहेत. महान नाट्यदिग्दर्शिका आहेत. त्यांनी समाजात होणा-या बदलांचा शोध घेण्याची वृत्ती साहित्य, कला, नाट्य क्षेत्रात विकसित करण्याचा विचार मांडला आहे.
  जागतिक स्तरावर मार्गारेट थॅचरपासून ते इंदिरा गांधींपर्यंत स्त्रियांनी हे सिद्ध केलं आहे की, त्या पुरुषांपेक्षा कोणत्याही क्षेत्रात असमर्थ नाहीत. सर्व क्षेत्रांत स्त्रियांनी संधी मिळताच आपलं कर्तृत्व समर्थपणे दर्शविलं आहे; परंतु एखादी जैन साध्वी प्रकांड पंडित आणि विद्वत्तेनं श्रेष्ठ असली तरी तिला आजही तिच्याहून विद्वत्तेनं आणि व्यासंगानं कमी असलेल्या जैन मुनीपेक्षा कमी मानण्यात येतं. ही आपली पुरुषप्रधान संस्कृतीच नव्हे काय, असा मला प्रश्न पडतो. ‘विद्वानं सर्वत्र पूज्यते’ या न्यायानं आपण स्त्रियांच्या विद्वत्तेचा आदर करायला आणि श्रेष्ठ स्त्रियांना वंदन करण्याची नवी मानसिकता घरी आणि दारी स्वीकारायला हवी. पुरुष असो की स्त्री, समाजातील या दोन्ही घटकांना समानतेच्या दृष्टीनं पाहणं आपलं कर्तव्य ठरतं. असा कालसापेक्ष नवा दृष्टीकोन स्वीकारणं ही तुम्हा-आम्हा सर्वांची नैतिक नि सामाजिक जबाबदारी आहे.
  भारतीय स्तरावर अनेक जैनधर्मीय कवी, कवयित्री, नाट्यकर्मी आपलं योगदान देण्याचं सर्जनशील प्रयत्न करीत आहेत. आपल्या मराठी जैन साहित्य संमेलनामध्ये त्यांनाही निमंत्रित केलं जावं, असं मला वाटतं. हे जे नवं साहित्य भारतीय स्तरावर अभिव्यक्त होत आहे त्याच्याशी आपला संवाद होणं आवश्यक वाटतं. नवी पिढी अतिशय समर्थपणे आणि पारदर्शकतेनं भाष्य करणारी आहे. तिला आपण समजूनही घेतलं पाहिजे.
  शेवटी समाजाची प्रगती, आधुनिकता ही सकारात्मक दृष्टीनंच होऊ शकते. आपल्या नव्या पिढीमध्ये ही सकारात्मक दृष्टी आपण बिंबविण्याचा प्रयत्न करायला हवा. साहित्यिक फार मोलाची भूमिका बजावू शकतात. याबाबत मी आशावादी आहे. आशेवरच जग जगते. स्वत: जगण्याची आणि दुस-यास जगू देण्याची, सहयोगाची, सहजीवनाची, भविष्यवेध घेणारी मानसिकता निर्माण करण्याचं कार्य लेखक नि पत्रकारांना करायचं   आहे.
  मित्रहो, आजच्या जीवन समस्यांकडं धर्माच्या विशाल भूमिकेतून पाहता आलं पाहिजे आणि ते साहित्यात उतरविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असं मला वाटतं. सारेच जण साहित्यिक होऊ शकणार नाहीत हे खरं; पण साहित्यरसिक मात्र होऊ शकतात. या भूमिकेतून आजच्या समाजजीवनातील गुंतागुंत आणि समस्या समजून घेऊन धर्मानं सांगितलेली अहिंसा, समता ही जीवनमूल्यं आचरणात आणण्याचा आणि एकात्मतेची आणि लोककल्याणाची भावना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा आपण निर्धार केला तरी फार मोठा कार्यभाग साधू शकेल.
  या व्यासपीठावरून आपल्यासारख्या रसिक साहित्यप्रेमींशी संवाद साधण्याची मला संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे मन:पूर्वक आभार. आपण दिलेल्या सन्मानाविषयी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून आणि भगवान महावीरांना विनम्र आदरांजली अर्पण करून मी माझं अध्यक्षीय भाषण पुरं करतो.
  धन्यवाद!

 • सैनिकी मुलींच्या वसतिगृह उद्घाटन समारंभात केलेले भाषण
  तारीख :  ३० सप्टेंबर २००५
  ठिकाण : सोलापूर
  कार्यक्रम : सैनिकी मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

  आमदार राजेंद्र दर्डा यांनी
  सैनिकी मुलींच्या वसतिगृह उद्घाटन समारंभात केलेले भाषण

  आंधप्रदेशचे राज्यपाल आदरणीय सुशीलकुमार शिंदेजी, गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रेजी, महापौर विठ्ठल जाधव, खा. विजय दर्डा, खा. रामदास आठवले, खा. सुभाष देशमुख, सैनिकी कल्याण विभागाचे संचालक भगतसिंह देशमुख, लोकमत कारगिल शहीद निधी सल्लागार समितीचे अध्यक्ष लेफ्ट.कर्नल पी.एन. मोडक, आ. सुधाकरपंत परिचारक, उपस्थित बंधू-भगिनी व पत्रकार मित्रांनो,
  माणसांच्या आवाजानं आता घराची दारं उघडत नाहीत. त्यासाठी ‘कॉल बेल’ वाजवावी लागते. अशा मूल्यं हरवत चाललेल्या जमान्यात देशरक्षणाच्या अग्निकुंडात आत्मसमर्पणाची आहुती देणा-या शहीद जवानांना आणि धीरोदात्त जीवन जगणा-या त्यांच्या कुटुंबियांना लोकमत वृत्तपत्र समूहाचा हा सलाम!
  आपण आज जो मुक्त श्वास घेत आहोत, त्याचे सर्व श्रेय भारतीय लष्कराला आणि तळहातावर प्राण घेऊन लढणा-या आपल्या लढवय्या वीर जवानांना दिले पाहिजे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचे सळसळते जवान आपले श्वास आणि तारुण्य धोक्यात घालत असतात. त्यांचा इतिहास नव्या पिढीसमोर कायम राहिला पाहिजे, म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहानं त्या धगधगत्या यज्ञात टाकलेली ही समिधा- म्हणजे हे लोकमत कारगिल शहीद सैनिकी मुलींचे वसतिगृह.
  मित्रहो,
  सच्चे खादिम कौम के
  मर कर भी वो मरते नहीं
  आस्थाँ उनकी कभी भी
  बेचिराग होती नहीं...
  जिंदगी में जो कोई
  अपने लिए जिते नहीं
  वो मुकाम अपना जहाँ में
  मर के भी कभी खोते नहीं...

  दुस-या महायुद्धावर आधारित असलेल्या ‘फेअरवेल टू आर्म्स’मध्ये अर्नेस्ट हेमिंग्वेने घेतलेला युद्धातील क्रौर्याचा, शौर्याचा, माणुसकीचा, प्रेमाचा नि विध्वंसाचा वेध अस्वस्थ करतो, तो  त्यामुळेच.
  कोणतेही युद्ध सैनिकांसाठी कसोटीचा क्षण असते. सैनिकांचे मनोधैर्य, अवधानतत्परता, शौर्य, देशभक्ती या सर्वांची ती सत्त्वपरीक्षा असते आणि म्हणूनच भारत-चीन युद्धाच्या वेळी कवी प्रदीप यांच्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गीतामुळे या देशातील एक वेळ अन्न मिळणा-या माणसानेसुद्धा लष्कराला मदत पाठविताना खारीचा वाटा उचलला होता.
  देशावर ‘कारगिल’च्या निमित्तानं संकट आलं, तेव्हा लोकमत वृत्तपत्र समूहानं एक कोटीच्या घरात असलेल्या आपल्या वाचकांच्या हृदयाला साद घातली आणि जातिभेद- धर्मभेद विसरून लाखो हात कामाला लागले.
  माणसा-माणसांमध्ये भिंतीऐवजी ‘पूल’ बांधण्याचा लोकमतचा हा ध्यास महाराष्ट्राला नवा नाही. मानवी जीवन उद्ध्वस्त करणारा महापूर असो, की अतिवृष्टी, गावंच्या गावं गिळंकृत करणा-या भूकंपाची आपत्ती असो, की देशावर आलेलं संकट, लोकमतनं आपला हा जगन्नाथाचा रथ ओढत मदतीसाठी धावून जाण्याचा वसा कधी सोडला नाही. आमचे संस्थापक संपादक स्व.बाबूजी यांनी आमच्या डोळ्यांत हे स्वप्न पेरलं होतं. या स्वप्नाला आता पंख फुटून विधायक आणि रचनात्मक आकाशात ते झेपावले आहेत.
  मित्रहो,
  मला आठवतंय, तो ३० सप्टेंबरचा दिवस होता, बरोबर १२ वर्षांपूर्वी म्हणजे एका तपापूर्वी - मराठवाड्याच्या संतभूमीत प्रलयंकारी भूकंपानं थैमान घातलं. अवघे भूमंडळ डळमळलं. त्या भूकंपात हजारो माणसं मृत्युमुखी पडली. त्यांच्या कच्च्या-बच्च्यांसाठी लोकमतनं भूकंपग्रस्त भागात अंगणवाड्या उभारल्या.
  आजही ३० सप्टेंबरच आहे. कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या लेकीबाळींसाठी लोकमत हे वसतिगृह लोकार्पण करीत आहे. 
  मला खात्री आहे-  हा क्षण पाहताना आभाळातून आमच्या जवानांचे डोळे आपल्या प्राणप्रिय मातृभूमीला दिलासाच देत असतील-
  ‘कशास आई, भिजविसी डोळे?
  उजळ तुझे भाल...
  रात्रीच्या गर्भात उद्याचा
  असे उष:काल!’

 • बंजारा समाज मेळाव्यात केलेले भाषण
  तारीख :  ४ जानेवारी २००३
  ठिकाण  :  रामायणा कल्चरल हॉल, उल्कानगरी, औरंगाबाद
  कार्यक्रम :  बंजारा समाज मेळावा

  ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  बंजारा समाज  मेळाव्यात केलेले भाषण

  बंजारा समाजेरो कुलदैवत संत सेवालाल महाराज, याडी तळजा भवानी, समाजेरो नेता स्व. वसंतरावजी नाईक येनुन वंदन करन, येत आये हुए, मार गोर भाईन जय सेवालाल. गोर समाजेर ये मेळावेन, मन मार्गदर्शक करन बलाये, हाई, म मारो, घळो मोठो मान समजुछु. ये घडीन, मन, कतरी खुशी वेरीछ, उ, म वातेम के सकुनी. मारे वडीती, ये समाजेन, जतरा फायदो वे सकछ, वतरा, म करीह्युं, हाई, म ये घडीन तमनेन वचन दुछु. तमार सेनुर परवानगी छ, हाई समजन, म मार विचार मराठिम मांडुछु.
  ‘शहरे अंबरी’ औरंगाबादने अनेक वेगवेगळे महोत्सव आजपर्यंत पाहिले आहेत. अनेक चळवळींची मुहूर्तमेढ या शहराने रोवताना पाहिली आहे. पहिलेपणाचा एक अपूर्व आनंददेखील या शहराने अनुभवला आहे.
  त्याच पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी बंजारा लोकांचा ‘बंजारा स्नेहमिलन’ हा आगळावेगळा महोत्सव होत आहे, हे पाहून मनाला निश्चितच समाधान वाटते.
  आम्ही लहानपणी शालेय जीवनात एक प्रतिज्ञा म्हणत असू. ‘भारत माझा देश आहे.’ त्यात ‘विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे’ या वाक्याची आवर्जून आठवण आज येथे होत आहे. सांस्कृतिक मूल्ये जोपासणारी आणि ती वृद्धिंगत करणारा बंजारा समाज हा खरोखरच कौतुकास पात्र आहे.
  आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बंजारा समाजाच्या संस्कृतीची मुक्तकंठाने प्रशंसा करताना म्हटले होते की, माझा पुनर्जन्म झालाच तर तो बंजारा समाजात व्हावा. यावरून या समाजाच्या संस्कृतीचे मोठेपण लक्षात येते.
  २१ व्या शतकाकडे जाताना मागे वळून पाहिल्यास आजही हा समाज दारिद्र्यात खितपत पडलेला दिसून येतो. अनेक सोयी-सुविधांपासून हा समाज आजही वंचित आहे याची मला जाणीव आहे. त्यासाठी या समाजातील सुशिक्षित युवकांनी आपली संस्कृती जोपासण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी  एकजुटीने कार्य केले पाहिजे. त्याच भूमिकेतून बंजारा स्नेहमिलन या कार्यक्रमाचे आयोजन हे एक धाडसी आणि कौतुकास्पद पाऊल आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
  कै. बळीराम पाटील आणि कै. वसंतराव नाईक यांनी समाज जागृतीचे केलेले कार्य खरोखरच अभिनंदनीय आहे. कै . वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवून बंजारा समाजाचे देखील स्वतंत्र अस्तित्व  आहे हे दाखवून दिले आहे.
  हम उबलते है, तो भूवाल खडा होता है,
  हम मचलते है, तो तुफान हो जाता आहे,
  हमे बदलने की कोशिश न कर, ऐ भाई,
  हम बदलते है, तो इतिहास बदल जाते है
  जणू असे सांगतच या समाजाने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेले आहे; पण त्याच सोबत आज मोठमोठ्या पदांवर या समाजातील लोक पोहोचल्याचे दिसून येते. या लोकांनी मात्र आपण या समाजाचे काही तरी देणे लागतो, ही जाणीव ठेवून कार्य केले पाहिजे. दारिद्र्यात खितपत पडलेला हा समाज ख-या अर्थाने दारिद्र्यमुक्त झाला पाहिजे, आणि-
  तुम हमको बुलाओ अपने घर
  हम तुमको बुलाएं अपने घर
  कुछ काम तुम्हारा हो जाये
  कुछ काम हमारा हो जाये
  अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे या समाजातील सुशिक्षित वर्गाने कार्य करण्याची गरज आहे. 
  औरंगाबाद शहरात होत असलेल्या बंजारा स्नेहमिलन या महोत्सवाचे उद्घाटन झाले, असे मी जाहीर करतो. आणि माझ्या वतीने या स्नेहमिलनात सहभागी झालेल्या सा-यांनाच मी हार्दिक शुभेच्छा देतो. 
  या समाजातील तरुण पिढी करत असलेले हे कार्य पाहून शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते,
  जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
  विजा घेऊन येणा-या पिढ्यांशी बोलतो आम्ही.
 • वाचन संस्कृती वाढीसाठी केलेले भाषण
  तारीख :  २००२
  ठिकाण :  बलवंत वाचनालय, औरंगाबाद
  कार्यक्रम :  वाचन संस्कृती वाढीसाठी केलेले भाषण

  ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री राजेंद्र दर्डा यांनी  
  वाचन संस्कृती वाढीसाठी केलेले भाषण

  महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एकदा एका कार्यक्रमात म्हटले होते, ‘आपल्या देशात शिक्षण वाढले; परंतु ग्रंथवाचनाची आवड निर्माण झाली नाही. देश मोठा करायचा असेल, तर त्यासाठी देशातील माणूस मोठा झाला पाहिजे आणि हे काम फक्त ज्ञान आणि विचारानेच होऊ शकते. हे महत्त्वाचे कार्य फक्त ग्रंथालयेच करू शकतात.’
  ‘ग्रंथालय सेवा’ ही पवित्र सेवा आहे. भुकेलेल्यांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी देणे, पाणपोई लावणे यामागे जी पवित्र संकल्पना आहे, त्यापेक्षा ही उदात्त अशी पवित्र भावना ग्रंथालय सुरू करण्यामागे आहे, ती असावीही.
  भारतीय संस्कृतीची ओळख ज्या मूलभूत आधारांवर होऊ शकते, त्यापैकी ग्रंथालये ही प्रमुख आधारस्तंभ आहेत. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘ग्रंथाशिवाय जीवनात तरणोपाय नाही. वाचाल तरच वाचाल.’ वास्तवात हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या विद्वान उपासकांनी ग्रंथालय आणि ग्रंथालयाचे महत्त्व वेळोवेळी विशद केले आहे.
  एकविसावे शतक माहिती आणि ज्ञानाच्या विस्फोटाचे शतक ठरत आहे. भारतीय समाजाला ‘ज्ञानी’ समाज बनविण्यासाठी आणि भारताला ज्ञानाची महासत्ता बनविण्यासाठी ग्रंथालये समृद्ध करणे, ग्रंथालयातील सेवांचा गुणवत्तापूर्ण विस्तार करणे आणि वाचन संस्कृतीला चालना देणे गरजेचे आहे.
  ग्रंथालय सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक सुधारणा करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. जगाला पारखण्याची दृष्टी ग्रंथालयाचा विद्यार्थी झाल्याने मिळते.
  बदलत्या काळानुसार ग्रंथालयशास्त्राच्या अभ्यासक्रमात वर्गीकरण, तालिकीकरण या विषयांसह संगणक व त्याची मूलतत्त्वे, त्याचा ग्रंथालयातील वापर याचा समावेश झालेला आहे. ‘डिझिटीजेशन’ या आधुनिक पद्धतीत स्कॅनर आणि संगणकाचा वापर करून ग्रंथालयातील ऐतिहासिक, प्राचीन अशी दुर्मिळ पुस्तके, हस्तलिखिते, जुनी वर्तमानपत्रे आणि इतर कागदपत्रांचे जतन व संरक्षण करता येते. शास्त्रशुद्ध ग्रंथालय सेवा देण्यासाठी डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालयशास्त्राची पाच सूत्रे दिली आहेत- १) ग्रंथ उपयोगासाठी आहे. २) प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळालाच पाहिजे. ३) प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळालाच पाहिजे. ४) वाचकांचा वेळ वाचवावा. ५) ग्रंथालये वर्धिष्णू आहेत. या पाच तत्त्वांवर संपूर्ण ग्रंथालयशास्त्र आधारलेले आहे.
  ग्रंथालये ही आधुनिक ज्ञानमंदिरे असून, अशा मंदिराचा उपयोग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. ग्रंथालयाचा उपयोग करून तरुणांनी भविष्य घडवायला हवे.
  युवक-युवतींनी स्वत:चा विकास करावा, कीर्तिमान व्हावे आणि समाजात आगळेवेगळे स्थान निर्माण करावे, असे वाटत असेल तर त्यांनी ग्रंथालयात जाऊन चांगल्या ग्रंथांचे वाचन करावे आणि योग्य वाटणारे विचार आचरणात आणावेत.
  व्यक्तींपासून ज्ञान कुणीही हिरावू शकत नाही. उलट, ज्ञानाचा संचय हवा तेवढा करता येतो. यश आणि कीर्ती मिळविण्याकरिता सुलभ साधन म्हणजे ज्ञान आणि हे ज्ञान मिळविण्याचे माध्यम म्हणजे ग्रंथालय. म्हणतात ना, ‘स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते।।’
  ग्रंथालयात मानवजातीचा पुरुषार्थ कोठवर पोहोचलेला आहे याची सर्वांगीण व अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. लोकशाहीला जर समर्थ, विचारवंत आणि दीर्घद्रष्टे लोकसेवक आणि लोकनेते मिळवावयाचे असतील, तर ग्रंथालये आणि वाचनालये देशात जितकी पसरतील, तितकी हवी आहेत.
  ‘ग्रंथ हे संस्कृतीचे मस्तक आहे. कोणत्याही संस्कृतीचे सार हे त्यातील ग्रंथांमध्ये अक्षरबद्ध केलेले असते. ग्रंथ माणसांना ज्ञान देतात. विचारशक्ती देतात, मार्ग दाखवितात. ग्रंथ सगळ्या संस्कृतीचे जणू मापदंड असतात.
 • नांदगाव डायमंड ज्युनिअर चेंबर उद्घाटन व शपथविधी समारंभात केलेले भाषण
  तारीख :  ६ आॅगस्ट २०००
  ठिकाण : नांदगाव (नाशिक)
  कार्यक्रम :  नांदगाव डायमंड ज्युनिअर चेंबर उद्घाटन व शपथविधी समारंभ

  वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  नांदगाव डायमंड ज्युनिअर चेंबर उद्घाटन व शपथविधी समारंभात केलेले भाषण

  ‘सोच बदली  तो सितारे बदल जायेंगे,
  नजर बदलो तो नजारे बदल जायेंगे,
  बार-बार कश्तिया बदलनेसे क्या होता है?
  धार बदलो, प्रवाह बदलो तो किनारे मिल जायेंगे....’’
  या शतकाने महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, एकापेक्षा एक जबरदस्त माणसं गेल्या  शतकाने पाहिली.  गेल्या शतकातच बर्लिनची भिंत तुटली. १९ राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळू शकतं तेही आम्ही पाहिलं. जमिनीवर वावरणारा माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला, दंगलग्रस्तांच्या मध्ये उभं राहून एका मिनिटात दंगलग्रस्तांना शांत करणारे साने गुरुजी गेल्या शतकाने पाहिले आणि त्यामुळेच पुढच्या पिढीला देण्यासाठी आमच्याकडे काय आहे हा विचार समोर येतो. महाराष्ट्राच्या कुटुंबातील आई दिसत नाही. जन्मानंतर तीन महिन्यात मुलं जातात पाळणाघरात, आई  जाते कार्यालयात, मग मुलांवर संस्कार घडवायचे तरी कुणी? लहानपणी आम्हा तरुणांना आठवड्याला चार आणे मिळायचे आणि त्यातील एक पैसा शनिवारी मारुतीला तेल वाहण्यासाठी घालवीत असे.
  पण आजच्या तरुणाने प्रगती केली आहे. आजचा तरुण एक पाऊल पुढे गेला आहे. तो शनिवारपर्यंत थांबत नाही. तो दिवसाआड पेट्रोल पंपावर जातो आणि मारुतीत पेट्रोल टाकतो. आज प्रत्येक घरात चार माणसे चार विचारांची दिसतात. टी.व्ही.वर एक अदृश्य चॅनेल आहे जे घराघरात फाळणी करीत आहे. एखाद्या घराच्या  बाजूने जावे तर मोठमोठ्याने भांडण होत असते. आत डोकवाल तर लक्षात येते की, घरात जे भांडण चाललं आहे त्याचं कारण मुलगा कार्टून्स पाहू इच्छितो, तर त्याच वेळी आजीची इच्छा चित्रपट पाहायची असते. आई बोल्ड अँड ब्युटीफूल, तर वडील क्रिकेट पाहू इच्छितात.
   वाढलेले शिक्षण, ग्रामीण भागात उभी राहिलेली विद्यालये, महाविद्यालये, संगणकीय शिक्षण असे बरेच  झाले आहे; पण ४० वर्षांत  वाढलेल्या लोकसंख्येने सर्व धुऊन काढलेले आहे. १९६० साली तीन कोटीचा महाराष्ट्र आज चाळीस वर्षांत साडे सात कोटींवर पोहोचला आहे. ४३ लाख नोंदणी झालेल्या बेरोजगार हातांना काम देणे हे प्राधान्याचे झाले आहे. ४० वर्षांपूर्वी शासन रोखीवर चालत होते. आज ४० वर्षांनंतर शासन रोख्यावर चालते. ४० वर्षांत समाजमनात फरक पडला आहे.
  एकदा एका हॉटेलमध्ये पाच-सहा मोठी माणसं बसली होती. तेथे पाच माशा घोंगावत होत्या. त्या ठिकाणी एक मुलगा बसला होता. सर्वजण त्रस्त होत होते. कधी त्या माशा दारूच्या बाटल्यांवर बसत होत्या, तर कधी त्या सजावटीसाठी असलेल्या आरशावर बसायच्या. तेथे बसलेल्या त्या मुलाने त्या  पाच माशा मारल्या आणि जाहीर केले की, मारलेल्या दोन माशा मादी आहेत, तर तीन नर होत्या. सर्वांनी त्या मुलाकडे आश्चर्याने पाहिले. तेव्हा तो म्हणाला, त्यात विशेष काय? ज्या दोन माशा आरशावर वारंवार बसत होत्या त्या मादी आणि ज्या तीन दारूच्या बाटल्यावर बसायच्या त्या नर. जीवनाचे इतके सूक्ष्म निरीक्षण असायला हवे.
  विकास कशाला म्हणायचे-
  स्टँडर्ड आॅफ लिव्हिंग वाढले आहे.
  पण क्वालिटी आॅफ लाईफ वाढली काय? 
  राहणीमानाचा दर्जा उंचावला म्हणून जीवनाचा दर्जा वाढत नाही. समाजजीवन ढवळून काढण्याची ही वेळ आहे; पण त्यासाठी माझ्यातील मी संपलं पाहिजे.
  ऊंचे ख्वाबों की उडान लेना,
  अपने कार्यो को उंचाई देना,
  ढेर सारी सफलता पाना,
  लेकीन पैर हमेशा जमी पर रखना!
 • आचार्य अत्रे पुरस्कार समारंभात केलेले भाषण
  तारीख:  १३ फेब्रुवारी २०००
  ठिकाण:  अंबाजोगाई 
  कार्यक्रम :  आचार्य अत्रे पुरस्कार समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रम

  ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री राजेंद्र दर्डा यांनी
  आचार्य अत्रे पुरस्कार समारंभात केलेले भाषण

  प्रसिद्ध व्यंगचित्रकार, आदरणीय आर.के. लक्ष्मणजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण क्षेत्रातील वयोवृद्ध तपस्वी ए.मा. कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलावंत सौ. कमला लक्ष्मण, सावज प्रतिष्ठानचे अध्यक्ष भगवानराव लोमटे, गिरिधरलाल भराडिया, यशवंतराव पाटील, मधुकर भावे, अंबानगरीतील प्रतिष्ठित बंधू-भगिनी व पत्रकार मित्रांनो!
  आज आपल्या उपस्थितीत आचार्य अत्रे पुरस्कार देऊन आपण माझा गौरव करीत आहात यासारखा अभिमानाचा दुसरा क्षण नाही. ज्यांच्या नावाने पत्रकारितेतील माझ्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार आपण मला दिला त्या आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आपल्या उज्ज्वल पत्रकारितेची परंपरा निर्माण केली. ते फक्त पत्रकार नव्हते, ते लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते होते; नाटककार होते, विनोदी लेखक होते. त्यांची लेखणी मर्मभेदक होती, शब्द अंगार होते, विचार परिपक्व होते; म्हणूनच त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विरोधाला न जुमानता ताठपणे काम केले, माणसे दिली, कार्यकर्ते निर्माण केले, कामगारांना बळ दिले, दीनदुबळ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, चुकणा-या राज्यकर्त्यांच्या पाठीवर शब्दाचे आसूड ओढले. एक शिक्षक, काव्यातून व्यंग व्यक्त करणारा कवी, एक नाटककार, एक चित्रपटकार, जबरदस्त वक्ता आणि पत्रकार अशा चढत्या श्रेणीने प्रत्येक दालनात आचार्य अत्रे यांनी त्यांचे कर्तृत्व गाजविले आणि म्हणून अत्रे एक की दहा? असा प्रश्ना पडावा, इतके चौरस व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात पाहायला मिळालेले नाही. त्यांच्या विनोदाने माणसे गडगडा लोळेपर्यंत हसली आणि त्यांच्या नाटकातील भीषण नाट्यामुळे डोळ्यातून अश्रंूची धारही लागली. एकाच वेळी हसू आणि आसू असा विलक्षण चमत्कार करण्याची हातोटी आचार्य अत्रे यांच्याजवळ होती. त्यामुळेच ‘नवयुग’मधून त्यांनी महाराष्ट्राला जे काही दिले, ते तेवढेच दर्जेदार होते. 
  पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान असताना संयुक्त महाराष्ट्र देत नाहीत म्हणून त्यांच्यावर लेखणीद्वारे प्रहार करणारे आचार्य अत्रे, पंडितजींच्या निधनानंतर तेरा दिवस त्यांनी जे अग्रलेख लिहिले, ते आजच्या पत्रकारितेमधील आदर्श मृत्यूलेख आहेत. ‘सूर्यास्त’ या नावाने हे पुस्तक आजही अजरामर मानले जाते. पत्रकाराचे लेखन सामान्यपणे तात्कालिक असते आणि त्या त्या दिवसापुरते असते; परंतु आचार्य अत्रे यांचे लेखन, त्यांचे विनोद, त्यांचा हंशा, टाळ्या हा कायमस्वरूपी दाद देणारा ठेवा समजला जातो. अशा या महापुरुषाच्या नावाने आज पुरस्कार देऊन आपण माझा सन्मान करीत आहात. आपला हा सन्मान मी अतिशय विनम्रपणे स्वीकारीत आहे.
  ज्यांच्या हस्ते तो मला दिला गेला त्यांची रेषा म्हणजे शब्दापेक्षाही मर्मभेदी. रेषेच्या माध्यमातून त्यांनी केलेले जनजागरण हे आम्हा नव्या पिढीतील पत्रकारांना एकप्रकारचे मार्गदर्शनच असते. लक्ष्मण हे या देशातील ‘कॉमन मॅन’चे, सामान्य माणसाचे ‘जनक’ आहेत, ते स्वत:च  या सामान्य माणसाचे प्रतिनिधी आहेत, प्रतीक आहेत. त्यांचा तो सामान्य माणूस, अर्धा सदरा चौकटीचा कोट व धोतर घालून राष्ट्रपती भवनापासून बाजारापर्यंत हिंडणारा सामान्य माणूस आपणाला सुपरिचित आहे. एक किस्सा सांगतात, स्वत: लक्ष्मण यांनीच तो सांगितला आहे. ते परदेश दौ-यावर गेले होते. हायडलबर्ग विद्यापीठात व्याख्यानासाठी निमंत्रण होते. ते विमानतळावर उतरले व कोणी घ्यायला आले आहे काय याची चौकशी करू लागले. गर्दी ओसरत असताना एका कोप-यात एक गृहस्थ यांच्यासाठी पाटी उंचावून उभे होते. त्यांनी पाटीवर ‘आर. के. लक्ष्मण’ अशी अक्षरे लिहिण्याऐवजी ‘कॉमन मॅन’चे चित्र डकवून आणले होते. ते यजमान तिथल्या विद्यापीठातील विद्वान होते. तिकडे दूर देशात लक्ष्मण यांची ओळख ‘कॉमन मॅन’च्या चित्राच्या रूपात आहे आणि भारताच्या ‘कॉमन मॅन’ची ओळख लक्ष्मण यांच्या रूपाने आहे, इतके ते, सामान्य माणूस व लक्ष्मण एकरूप आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून हा पुरस्कार देणे म्हणजे आपल्या ‘कॉमन मॅन’ने पुरस्कार देणे आहे, असे मला वाटते. अशा या सामान्य माणसाच्या हातून पुरस्कार मिळणे यासारखी दुसरी धन्यता नाही, सामान्य माणसाचे आशीर्वाद हेच खरे आशीर्वाद आहेत. 
  अंबानगरी हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी जोगाईचे शक्तिपीठ आहे. मुकुंदराज हे आद्य कवी. तेही इथलेच. दासोपंतांच्या पासोडीचा महिमा आपण जाणता. जैन धर्मीयांची गुंफा याच परिसरात बघावयास मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंबाजोगाईकरांचे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील योगदान भरीव, तितकेच ठाशीव; म्हणून न विसरता येणारे. स्वामी रामानंद तीर्थांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही अंबानगरी अनेक विद्वानांची प्रेरणास्थान आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील लढाईत अंबाजोगाईकरांनी बजावलेली कामगिरी तेवढीच मोलाची. परिवर्तनाची चळवळ याच भूमीत मोठ्या जोमाने विकसित झाली. एक गाव एक पाणवठा, गायरान मुक्ती चळवळ, दलित शिष्यवृत्ती आंदोलनाचा जन्मही याच भूमीत. अशा या ऐतिहासिक, सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या, तसेच साहित्य-कलाक्षेत्राची जाण असलेल्या या अंबानगरीत आजचा हा  सोहळा होतो आहे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
  आज माझे पिताजी स्व. बाबूजी यांचे स्मरण होणे साहजिक आहे. त्यांनी दाखविलेली दिशा, दाखवलेला मार्ग व सांगितलेले तंत्र आणि मंत्र याच्याच जोरावर मला आणि माझ्या परिवाराला या क्षेत्रात वेगळे काही  करून दाखविण्याची संधी मिळाली. यवतमाळसारख्या लहानशा गावात साध्या ट्रेडलवर लोकनायक बापूजी अणे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेले साप्ताहिक पुढे   दैनिकात रूपांतरित झाले. नंतर विदर्भासाठी प्रादेशिक वृत्तपत्र म्हणून नावलौकिक प्राप्त केल्यानंतर खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि आता राजधानी मुंबईत ते पोहोचले आहे. राज्यभर विस्तारले असतानाही  ‘लोकमत’ने प्रादेशिकता सोडली नाही. त्या त्या भागाची अस्मिता जोपासण्याचे काम करीत असतानाच तेथील विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, हे लोकमतचे खास वैशिष्ट्य राहिले आहे.
  महाराष्ट्राला पत्रकारितेची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले, न. चिं.केळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, वा. रा. कोठारी, पां. वा. गाडगीळ, ह. रा. महाजनी, ना.भि. परुळेकर, ग.त्र्यं.माडखोलकर, द्वा.भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, शिवाय आपल्या मराठवाड्यातील आ.कृ. वाघमारे, अनंत भालेराव, बाबा दळवी, अशी ही थोर परंपरा आहे. या पथदर्शकांनी घालून दिलेल्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी पत्रकारिता करीत असताना काही नव्या जाणिवांचा उल्लेख येथे केला तर वावगे ठरणार नाही. मुद्रणाच्या क्षेत्रात, माहितीच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झालेली आहे. त्या प्रगतीच्या माध्यमातून एक परिपूर्ण वर्तमानपत्र आज खेड्यापाड्यात पोहोचविताना येणा-या अडचणीही खूप आहेत; पण अडचणीवर मात करून संघर्षाला कवेत घेण्याची तयारी असेल तरच उद्याच्या परिस्थितीला आपण तोंड देऊ शकू. जागतिक व्यापारीकरणामुळे याही क्षेत्रात अनेक बदल होऊ घातले आहेत. ते बदल स्वीकारून समाजासाठी, या भागातील विकासासाठी, शैक्षणिक, सामाजिक परिवर्तनासाठी यापुढेही काम करता यावे म्हणूनच कदाचित अंबाजोगाईकरांनी पाठीवर मारलेली ही थाप असावी. तीच प्रेरणा समजून यापुढेही माझे काम चालूच राहील.
  पत्रकारितेत विधायक दृष्टिकोनाची नितांत गरज आहे. आज महाराष्ट्रासमोरच्या मुख्य प्रश्नात ४० लाख नोंदणी झालेल्या बेरोजगार हातांना काम देणे, हा अत्यंत प्राधान्याचा प्रश्न बनला आहे. सर्वांना  आपण काम देऊ शकतो का? नोकरी देऊ शकतो का? नोकरी देऊ शकत नसेल, तर आजच्या आधुनिक जगात कोणता रोजगार देऊ शकतो? खेड्यातील सुशिक्षित तरुण आणि शहरात आलेला सुशिक्षित बेरोजगार यांना कोणते काम देता येईल? राज्यातील तरुणांना कष्ट करण्यासाठी प्रवृत्त केले तर या राज्यातील दोन कोटी हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली आणता येईल. भावनेच्या प्रश्नातून बाहेर येऊन महाराष्ट्राला उद्योजक करण्याचे काम अधिक वेगाने करण्याची गरज मला जाणवते आहे. ४० वर्षांत वाढलेल्या लोकसंख्येचा मुद्दा समोर ठेवला पाहिजे. १९६० साली तीन कोटींचा महाराष्ट्र आज ४० वर्षांत साडेसात कोटींवर पोहोचला. आज जवळपास महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात वीज पोहोचली आहे. १५ ते २० % शेतीला पाणी पोहोचले आहे. १९६० साली पाच सहकारी साखर कारखाने होते. आज २१९ सहकारी साखर कारखाने आहेत. वाढलेले शिक्षण, ग्रामीण भागात उभी राहिलेली विद्यालये, महाविद्यालये, तांत्रिक विद्यालये, संगणकीय शिक्षण, असे सर्व बरेच काही झाले.
  ‘आग का क्या है, पल दो पल में लगती है,
  बुझते-बुझते एक जमाना लगता है....’
  पत्रकारितेचा व्यवसाय अतिशय जबाबदारीने करायला हवा.
  या व्यवसायात अनेक अप्रिय बाबींची लागण झाली आहे. शोधपत्रकारितेच्या नावाखाली वाढीला लागत असलेली पीत पत्रकारिता हा विषय सर्वांच्या चिंतेचा व्हावा. वाईट घडू नये म्हणून चांगले घडविण्याची क्षमता पत्रकाराच्या लेखणीत असायला हवी. माणूस उभा करण्यासाठी यापुढेही पत्रकारांना जिवाचा आटापिटा करावा लागेल. जे चांगले घडते ते त्याचे प्रतिबिंब वर्तमानपत्रात उमटायला हवे. वाईटाविषयीची चर्चा घडावी; परंतु त्यामागील हेतू मात्र सरळ, स्पष्ट, सच्चा असायला हवा. केवळ लेखणीचे शस्त्र आपल्या हाती आहे म्हणून लोकांनी आपल्याला नमस्कार करावा, आपल्या समोर वाकावे ही भावना ज्याच्या मनात निर्माण होईल त्याला पत्रकारिता  करता येणार नाही. मी विशेषत: ग्रामीण भागात काम करणा-या पत्रकार बंधूंना कळकळीची विनंती करीन की, त्यांनी या अपप्रवृत्तींपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले पाहिजे. अनेकविध प्रकारचे मोह आपल्या भोवती उभे केले जातात आणि धाकही घाबरवत असतात. कुणाच्या धाकाला घाबरणार नाही व  कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही अशा बाण्याने राहिलो तरच आपण टिकाव धरू. खरी पत्रकारिता नव्या पिढीत रुजवायची असेल, तर त्याला जुन्या आणि नव्याचा समन्वय साधावा लागेल, नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन विकास करावा लागेल.  सगळेच जुन्या वळणाचे आपण स्वीकारू शकू असे नाही. बदलत्या प्रवाहाबरोबर या क्षेत्रात काम करू इच्छिणा-याला बदलावे लागेल. तशी त्यांनी तयारी ठेवावी. वर्तमानपत्र समाजाचा आरसा असतो, तो सतत स्वच्छ राहावा, घडत्या घडवित्या कर्त्याचे चित्र त्यात स्पष्ट दिसावे, अंधारातही प्रकाशाचे किरण दाखविण्याची क्षमता त्यात असावी. ती क्षमता, ते किरण दीनदलित, गोरगरीब, अन्याय-अत्याचाराने पीडलेल्या जनतेच्या कामी यावेत. विकासाचे प्रश्न सतत उचलून धरून मार्गी लावण्याचे काम याच माध्यमातून होऊ शकते एवढा आत्मविश्वास मजजवळ आहे. हा आत्मविश्वास वाढावा, द्विगुणित व्हावा याच एका अपेक्षेने मी आपण दिलेला आचार्य अत्रे पुरस्कार विनम्रपणे स्वीकारीत आहे.
  जय महाराष्ट्र!
 • संपादकांची सुखदु:खे या विषयावरील परिसंवादात लोकमत समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेला लेख
  सामना दिवाळी अंक १९९२

  संपादकांची सुखदु:खे या विषयावरील परिसंवादात 
  लोकमत समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेला लेख

  प्रत्येकाला स्वत:चा व्यवसाय स्वेच्छेने मिळालेला असेल तर प्रिय वाटतो. या प्रिय वाटणा-या व्यवसायाची व्यवसाय म्हणून काही खास सुख-दु:खं असतात. मी स्वेच्छेने व आंतरिक आवडीने पत्करलेला वृत्तपत्र व्यवसाय अर्थातच मला प्रिय आहे. किंबहुना हा व्यवसायच माझे जीवन झाला आहे.  वृत्तपत्र व्यवसाय हा समाजाचा डोळा व कान असल्याने त्याचे सामाजिक मूल्य चतुर्थ सत्ता या नात्याने अधिक आहे. विचारप्रसाराचे एक महत्त्वाचे साधन म्हणून या व्यवसायाचे असणारे सामाजिक महत्त्व माझ्या वडिलांनी श्री. जवाहरलाल दर्डा माझ्या मनावर बिंबविले होते, तर या व्यवसायाच्या आधुनिक युगातील बदलत्या स्वरूपाची जाण माझे वडीलबंधू श्री. विजय दर्डा यांनी दिली होती. 
  वृत्तपत्रांना समाजाचा आरसा मानतात. माझ्या मते संपादक हा या वृत्तपत्राचा आरसा असतो व वृत्तपत्र संपादकांचा आरसा असतो. वृत्तपत्राचे प्रतिबिंब संपादकात पडलेले दिसते तर संपादकांचे प्रतिबिंब वृत्तपत्रात. प्रत्येक व्यवसाय करणा-यास स्वत:चे उत्पादन कसे असेल हे पूर्णांशाने ठरविता येते; परंतु दुर्दैवाने वृत्तपत्र व्यवसायाच्या संपादकास आपले वृत्तपत्र इच्छेनुरूप व कल्पनेनुरूप घडविता येत नाही. वार्ताहर, उपसंपादक, वृत्तसंपादक, जुळणीकर, प्रूफरीडर, मुद्रण कर्मचारी अशा अनेकांच्या ठोक्यांनी वृत्तपत्र बनते. त्यामुळे या घटकांच्या चुका या संपादकांच्या चुका मानल्या जातात. तसेच या घटकांचे यश हे संपादकांचेच मानले जाते. पापांचा वाटेकरीही संपादकच ठरतो तर यशाचा धनीही तोच. तरीही स्वत:च्या कल्पनेप्रमाणे वृत्तपत्र निर्माण करणे संपादकाला अशक्य आहे. आपल्या नावाने प्रकाशित होणा-या वृत्तपत्रात एखाद्या वार्ताहराने केलेली चूक काय हो, तुमच्या पेपरमध्ये केवढी घोडचूक? तुमचे लक्ष आहे की, नाही असा प्रश्न संपादकालाच (या प्रकरणी प्रत्यक्षात काहीही वाटा नसला तरीही) ऐकावा लागतो.
  त्याचवेळी एखाद्या वार्ताहाराने चांगली व उत्तम दर्जाची बातमी दिल्याने होणा-या कौतुकाचे धनीही व्हायला मिळते.  संपादक परदेशात/ परगावी गेलेला असला तर त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या वृत्तपत्रात बातमी छापली गेली तरी त्याची जबाबदारी त्याच्यावरच पडते. एखाद्या बदनामीकारक व वार्ताहराने पूर्ण चौकशी न करता दिलेल्या बातमीबद्दल स्वत: जागेवर नसतानाही कोर्टबाजीस तोंड द्यावे लागते. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे म्हणतात ते खरेच आहे. एखाद्या शिक्षकावर, कर्मचा-यावर व्यवस्थापन अन्याय करीत असेल तर त्याची बाजू घेऊन लिहिले व पुढे प्रकरण कोर्टात गेले तर तो कर्मचारी - शिक्षक व्यवस्थापनाशी जुळवून घेऊन केस मागे घेतो व मधल्या मध्ये संपादकांचे हाल होतात. संपादक अशा प्रकरणी तोंडावरच पडतो. संपादकांचे काम क्रिकेटच्या कप्तानासारखे असते. टीम चांगली खेळली, इतर खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले तर त्यांचे सारे खापर कप्तानाच्या माथी बसते.  वृत्तपत्राच्या संपादक कप्तानास तर दररोज चांगला खेळ मर्यादित वेळेच्या व माणसांच्या षटकांत करून दाखवावा लागतो. ही तारेवरची कसरतच आहे. दररोजची स्पर्धा, गती व घाई, बातम्यांचे चैतन्य, आवृत्यांच्या डेडलाईन्स, वितरणाचे विचके, उपसंपादकांच्या डुलक्या या सा-यांमध्ये एक गतिशील व मजेशीर सुखाचा अनुभव मिळतो. दररोज आज जगायला मिळतो. अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलायला मिळते. गुन्हेगारीपासून ते उपग्रहापर्यंत प्रत्येक क्षेत्राची जाण येते.  व्यक्तिमत्त्व व्यापक बनते. मुंबईच्या फास्ट नॉनस्टॉप लोकलप्रमाणे संपादकांचा दिवस जातो. संपादकांची सकाळ त्या दिवशीच्या वर्तमानपत्राचे वार्तापत्रे, पुरवण्या, अग्र्रलेख, स्फुटे, फोटो यांच्या विचाराने भविष्याची योजना आखणेच राहून जाते. दिवसभराची धांदल- गडबड, भेटीगाठी, पत्रव्यवहार, कार्यक्रम, वाचन, लेखन या सा-या गडबडीत जेवणाची वेळ टळते. कधी कधी जेवण राहते. रात्रीची जागरणे तर ठरलेलीच. 
  दिवसभराच्या गडबडीने थकलेल्या एखाद्या संपादकाने एखाद्या दिवशी लवकर झोपून आराम करावा, विश्रांती घ्यावी, असे ठरवून घरी झोप घ्यायला लागतो न लागतो तोच फोन खणखणतो. कुणी तरी महत्त्वाची व्यक्ती वारलेली असते किंवा महत्त्वाची बातमी असते. उठावे लागते व कार्यालयात ठाण मांडावे लागते. पहाटे घरी जाऊन झोपल्यावर सकाळी लवकर उठून पुन्हा दुस-या दिवशीचे रहाटगाडगे. आपल्या वृत्तपत्राने एखाद्या साथीच्या रोगाविरुद्ध मोहीम चालू करावी व शेकडो रुग्णांना बातम्यांमुळे सरकारने आारोग्यसेवा द्यावी, एखाद्या संस्थेतील मोठे भ्रष्टाचारी कांड शोधावे व ती संस्था नीट व्हावी, गोरगरीब नागरिकांना होणा-या त्रास व यातनांना वाचा फोडावी व त्यांना न्याय मिळावा, पेन्शन वर्षानुवर्षे न मिळालेल्या प्रामाणिक शिक्षकाचे दु:ख वेशीवर टांगले जावे, त्याला आपल्यामुळे पेन्शन मिळावी, सामान्य ग्राहकांची फसवणूक करणा-यांचा दंभस्फोट करावा व जनतेला जागे करावे, चांगल्या संस्था, खेळाडू, व्यक्ती, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलावंत यांना प्रसिद्धी देऊन गुणांचा गौरव करावा. अशा त-हेने संपादकास समाजाला ताबडतोबीने बक्षिसे लाभ इमिजिएट अवॉर्ड देता येतात.  वृत्तपत्र समाजसेवेचे साधन बनते. लोकमतच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेतले व पूर्ण केले. पूरग्रस्तांना निधी दिला, दुष्काळग्रस्तांना आधार दिला. बालचित्रकारांना प्रोत्साहन दिले. क्रीडा स्पर्धा घेतल्या. युवक कलावंतांचा महोत्सव केला. निवडणुकांत जाहीर वादविवाद घेतले. एकात्मता यात्रा काढल्या. कितीतरी कामे केली. संपादक झालो नसतो तर   हे होऊ शकले नसते.
  उस्मानाबाद जिल्ह्यातील अत्यंत मागासलेल्या भूम तालुक्यातील एक वाडी आहे. इरा. मी भूमच्या दौ-यावर असताना या वाडीची माणसं भेटायला आली. प्रताप देशमुखांसोबत त्यांच्या वाडीवर कोणतेही वृत्तपत्र येत नव्हते. त्यांनी लोकमत सुरू केला होता. त्यांची वाडी एवढी दुर्लक्षित होती की, तिथे कोणी मोठा अधिकारी, पुढारी आलेला नव्हता. उपेक्षा भोगणा-या या इवलुशा वाडीच्या दु:खांना लोकमतने वाचा फोडली व वाडीचा महत्त्वाचा एक प्रश्न सुटला. 
  ज्यांचा कोणी नाही, त्यांना लोकमत आपला वाटला. म्हणून मोठ्या भारावलेल्या कृतज्ञतेच्या स्वरात इरा वाडीकरांनी लोकमत सुरू केला होता. कुठे औरंगाबाद, कुठे इरावाडी. छापलेल्या शब्दांनी किमया केली व गावक-यांचे दु:ख दूर झाले. इरावाडीकरांच्या डोळ्यातील कृतज्ञता भाव पाहून संपादक झाल्याचे सुख, मन:शांती मिळाली. याचे मोल कसे करणार? लोकमतने मराठवाड्यातील अनेक नवोदित कवी- लेखक कलावंतांना पुढे आणले. व्यासपीठ दिले. ते भेटल्यावर ज्या मनस्वीपणे आभार मानतात ते ऐकून संपादकाचे लाख मोलाचे सुख मिळते. हे सर्व करताना संपादकाला आपल्या कुटुंबासाठी मात्र पुरेसा वेळ देता येत नाही. थोरा-मोठ्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, सण- उत्सव आठवणीने लक्षात ठेवणा-या आम्हा संपादकांकडून मुलाच्या वाढदिवसाची तारीख कामाच्या व्यापाच्या रगाड्यात विसरली जाते. व्यवसायाच्या रेट्याची जाणीव असणारे कुटुंबीय असल्याने तेही समजून घेतात. जगाच्या प्रत्येक घडामोडीबाबत वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी वेळ देणा-या आम्हा संपादकाकडून घरासाठी वेळ देता येत नाही. हे दु:ख आहेच. शिवाय मनसोक्तपणे जगताही येत नाही. कारण आयुष्यच घड्याळाच्या काट्यावर चालणारे असते. 
  अनेक संपादक मित्रांशी चर्चा करताना वृत्तपत्र व्यवसायातील एक सल माझ्या मनाला बोचणी देत असतो.  तो म्हणजे चांगल्या व गुणवत्ता असणा-या माणसांची वाणवा. आज सर्व क्षेत्रांत गुणवत्तेची माणसे मिळणे कठीण झाले आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास विभाग (ह्युमन रिसोर्स डेव्हेलपमेंट) निर्माण केले जात आहेत. वृत्तपत्र व्यवसाय त्याला अपवाद नाही. वृत्तपत्र व्यवसायात हल्ली इतर क्षेत्रांच्या तुलनेने चांगले पगार मिळतात. वार्ताहर, उपसंपादक व इतर संपादकीय कर्मचा-यांना गेल्या १०-१२ वर्षांत चांगले दिवस आले आहेत.  या व्यवसायाला प्रतिष्ठा, सन्मानही समाजाकडून मिळतो आहे. असे असूनही चांगल्या गुणवत्तेच्या माणसांची चणचण सतत जाणवते. या क्षेत्रात लेखन- वाचनाची आवड असणारी, मन लावून निष्ठेने काम करणारी माणसे हवी असतात; पण त्याऐवजी कारकुनी पद्धतीने काम पाहणारी माणसे पाहिली की, आम्हा संपादकांना मोठे दु:ख होते. त्याचवेळी एखादी बातमी मिळविण्यासाठी अहोरात्र धडपडून, ती बातमी फोटोसह मिळेल त्या वाहनाने डेडलाईनच्या आत कार्यालयात पोहोचणारा वार्ताहर पाहिला की मन आनंदाने हरखून जाते. 
  एखाद्या बातमीत ८/१० चुका करणारा उपसंपादक पाहून मन खट्टू होते, तर एखाद्या दिवशी उत्तम मांडणी व सजावट करणारा सर्जनशील कलावंत उपसंपादक पाहून समाधान व अभिमान वाटतो. चांगल्या मनुष्यबळाअभावी वृत्तपत्र आपला प्रभाव पाडू शकत नाही, हे खरे आहे.
  सुख, दु:खाचा हा आढाव घेताना या व्यवसायाचे हत्यार म्हणून असणारे मोल फार महत्त्वाचे वाटते. समाज परिवर्तनाचा, सत्यशोधनाचा हा व्यवसाय आहे. म्हणूनच या व्यवसायाच्या सुखाने मी तृप्त आहे. दैनिक हिंदुस्थानचे संपादक मुकुटबिहारी वर्मा यांनी मोठ्या मार्मिक शब्दांत त्याचे वर्णन हिंदीत केले आहे. पत्रकारिता. जो दुनिया में आसुरी राज्य की जगह दैवी राज्य चाहती है, जिस के मन में पाप से घृणा है पर पापी से प्रेम है, जो इन्सान को हिंदू या मुसलमान की दृष्टी से नहीं ईश्वरीय कृती के रूप में देखती है, वह सच्चाई से कैसे आँखे मूँद सकती है ?’’
 • दैनिक एकमत प्रकाशन समारंभात केलेले भाषण
  तारीख :  २० आॅगस्ट १९९१
  ठिकाण  :  लातूर
  कार्यक्रम :  दैनिक एकमत प्रकाशन

  लोकमत समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा यांनी
  दैनिक एकमत प्रकाशन समारंभात केलेले भाषण

  दैनिक एकमतच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित असलेले राज्याचे नगरविकास मंत्री सुशिलकुमार शिंदे, उद्योगमंत्री विलासराव देशमुख, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री अरूणभाई गुजराथी, न्याय व विधी राज्यमंत्री अब्दुलभाई काझी, दैनिक संचारचे संपादक रंगाअण्णा वैद्य, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक अशोक पडबिद्री, व्यासपीठ व समोरील सर्व मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो.

  ‘‘विलासराव, हमने सोचा कि हम ही चाहते है आपको,
  लेकिन आपको चाहने वालों का तो काफिला निकला
  दिल ने कहा शिकायत कर खुदा से,
  वो खुदा भी आपको चाहने वाला निकला.’’

  लातूरमधून सुरू होणा-या ‘एकमत’ या दैनिकाच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याची संधी आपण मला दिलीत याबद्दल मी आभारी आहे. कारण सध्याच्या राजकारणात काय किंवा सार्वजनिक जीवनात काय, ‘एकमत’ फार दुर्मिळ झाले आहे. अशी अत्यंत कठीण कामगिरी विलासरावांनी हाती घेतली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या समारंभाशी माझे आणखीही एक प्रकारे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अलीकडे नांदेडमधून कमलबाबूंनी नवीन दैनिक सुरू केले. त्यांनी लोकमतमधील ‘लोक’ उचलले तर विलासरावांनी आता ‘मत’ उचलले आहे. हे मी फक्त ‘लोकमत’ शब्दाबद्दल बोलतो आहे. त्यामुळे आमच्या अर्ध्या वचनात असणारी ही दोन भावंडे असल्याने त्यांचे आमचे नाते अतूट आहे. वृत्तपत्रांच्या जगात प्रवेश करीत असल्याबाबत मी त्यांचे मन:पूर्वक स्वागत करतो.
  वृत्तपत्रांचा व्यवसाय सिनेसृष्टीसारखाच वरवर फार आकर्षक, झगमगाटाचा धंदा आहे; पण तो किती कटकटीचा व गुंतागुंतीचा आहे, हे ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.’ राजकारण आणि वृत्तपत्रे यांचे संबंध मजेदार असतात. काही वृत्तपत्रे राजकारणी माणसाच्या हातातील खेळणी असतात, तर काही राजकीय नेते वृत्तपत्रांच्या हातातील खेळणी बनतात. निदान हे दोघे आपण परस्परांना खेळवत आहोत, असे समजत असतात. वृत्तपत्रे आणि राजकारणी हे दोघेही लोकांच्या नावाने बोलतात आणि लोक त्यांच्या नावाने अनेकदा बोटे मोडतात. एकमेकांशिवाय त्यांना घडीभर करमत नाही आणि एकमेकांशी पटत नाही. असा हा म्हटला तर मजेदार, म्हटले तर धोकेबाज व्यवसाय आहे.
  पत्रकार लेखणीच्या एका फटका-याने होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करून टाकतो. क्षणात कोणाला डोक्यावर घेऊन नाचवतो, तर दुस-या क्षणी त्याला धुळीला मिळवतो. गडक-यांच्या ‘राजसंन्यास’ नाटकातील जिवाजी हे पात्र लेखणीबद्दल बोलताना म्हणते, ‘खरी नागीण डसली तर एक माणूस मरतो; परंतु लेखणी डसली की तर कुटुंबच्या कुटुंब रसातळाला जाऊ शकते.’ असा हा बहुरंगी, बहुढंगी आणि बहुरूपी व्यवसाय आहे
  विलासराव, या धंद्यात मी तुमचे स्वागत करतो. आपण राजकारणात तर सव्यसाची आहात. उसने देखा जिसको प्यारसे सिकंदर कर दिया! फेर ली जिस दिन नजर राहों का पत्थर कर दिया!
  या व्यवसायातही तुम्हाला असेच यश मिळो, असी सदिच्छा व्यक्त करतो. दोन घड्याळे, दोन विद्वान आणि दोन पत्रकार यांचे एकमेकांशी पटत नाही असे म्हणतात. पत्रकारांनी हा गुण सोडला पाहिजे. कारण हा व्यवसाय आज संकटात आहे. एक संपादक म्हणून मी आपणास हे सांगू इच्छितो की, आपला व्यवसाय इतर व्यवसायांपेक्षा वेगळा आहे. कापसाचा कपडा झाला की, त्याची किंमत वाढते. पोलादाचे यंत्र तयार झाले की, त्याची किंमत वाढते; पण वर्तमानपत्राच्या धंद्यात मात्र छापलेल्या कागदापेक्षा को-या कागदाची किंमत अधिक आहे. आज कागदाचे भाव कडाडले आहेत आणि कागदाच्या वाढत्या भावाच्या विक्राळ दाढेखाली वृत्तपत्रे गिळली जात आहेत. काही वृत्तपत्रे बंद पडत आहेत, काहींच्या किमती वाढत आहेत, काही पाने आणि पुरवण्या कमी करीत आहेत. अशा जीवन-मरणाच्या संघर्षात आपण धैर्याने या व्यवसायात पाऊल टाकत आहात. विलासराव, ‘आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’ एवढेच मी याप्रसंगी सांगतो.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेले भाषण
  तारीख :  ६ डिसेंबर १९९०
  कार्यक्रम :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३४ वा महापरिनिर्वाण दिन

  लोकमत समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा यांनी
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ३४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेले भाषण

  ‘भीमा, तुझ्या मताचे
  जर पाच लोक असते,
  तलवारीचे त्यांच्या 
  न्यारेच टोक असते’
  अशी रास्त खंत व्यक्त केल्यावाचून राहवत नाही.
  प्रज्ञा-शील व करुणेचे परम कारुणिक तत्त्वज्ञान ज्या महामानवाने जगाला दिले, ज्याने पिचलेल्या मूक समाजाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नायकत्व स्वीकारून त्यांना ताठ कणा दिला,  पिढ्यान्पिढ्या माथी अंधार बांधून गावकुसाबाहेरचे आयुष्य पांघरणा-या उपेक्षितांना नि दुबळ्यांना आवाज दिला, त्यांची अस्मिता चेतवून ख-या अर्थाने त्यांच्यातील अस्मिता फुलविली, त्या लोकोत्तर महापुरुषाचे सूर्यकाम समजावून घेण्याची आज खरी गरज आहे.
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन व्यवस्थेत प्रतिकूलतेने सर्व बाजूंनी घेरले होते, हे नीटपणे लक्षात घेतले, तर दलितांचे नेतृत्व करतानाही म. फुल्यांची विचारधारा वाहून नेणा-या आंबेडकरांचे कार्य किती अवघड होते, हे समजू शकेल. समाजप्रबोधनाच्या प्रक्रियेच्या काळात ओघाबरोबर प्रतिकूलता कमी व्हायला हवी होती; पण येथे उलटेच झाले. आंबेडकरांच्या चळवळीत प्रतिकूलता व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपात वाढतच गेली. ते त्या व्यवस्थेत ‘अस्पृश्य होते, म्हणूनच सर्व समाजाला ते खपू शकत नव्हते. अशा परिस्थितीत ‘उद्धरेत्आत्मना आत्मानमं,’ या न्यायाने आपल्या मुक्तीसाठी अस्पृश्य समजल्या जाणा-या जातीत जन्मलेल्यानींच संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वान व प्रतिभाशाली नेत्याच्या मार्गदर्शनाखाली दलितमुक्ती आंदोलनाला खरी गती मिळाली. भारतीय वर्णाश्रम व्यवस्थेमधूनच शूद्र या एका मोठ्या वर्गाला विविध अशा धार्मिक व परंपरांच्या आधारावर अस्पृश्य घोषित करून त्यांना सरळ साधे जीवन जगणेही अशक्य केले. एवढेच नव्हे तर ज्ञानापासून वंचित ठेवण्याची सोयही येथील चालीरीती आणि परंपरांनी करून ठेवली. या सा-या सनातन व्यवस्थेवर आसूड ओढण्याचे काम बाबासाहेबांनी आयुष्यभर केले. ते समजावून घेतले म्हणजे या परिवर्तन चळवळीचे तेज किती तीव्र होते हे लक्षात येईल.
  उच्चभूू्र समाजातील अनेक अनुभवांचे चित्रण विविध माध्यमांद्वारे अनेक प्रतिभावंत करीत असतात; पण दुलीतांविषयी त्यांच्या दरिद्री अवस्थेविषयी दबलेल्या मनातील वेदनांना वाट किती जण करून देतात? त्यांच्या आयुष्याचा वेध किती जण घेतात? धर्मश्रद्धेवर आधारलेलीच सर्व परंपरा बाबासाहेबांनी नाकारली ती केवळ यामुळेच. मानवी हक्क नाकारणा-या व माणसाला अगतिक बनविणा-या चातुर्वर्ण्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोणातून पाहण्याची गरज त्यामुळेच बाबासाहेबांना वाटली.
  स्वातंत्र्य चळवळीचा लढा चालू होता, त्याकाळी इंग्रज सरकारविरुद्ध निषेध करण्यासाठी विदेशी कपड्यांची होळी करणे, मिश्रधर्मीय विवाहाचा पुरस्कार करणा-या वृत्तपत्रांची होळी करणे या तंत्रानुसार डॉ. आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहप्रसंगी, विषमता प्रतिपादन करणा-या व अस्पृशांची निंदा करणा-या मनुस्मृतीचे २५ डिसेंबर १९२७ रोजी जाहीर दहन केले, तेही याच भूमिकेतून.
  या प्रसंगानंतर अतिशय कडव्या प्रतिक्रिया सवर्णांनी व्यक्त केल्या. त्यांनाही डॉक्टरांनी संयमाने उत्तर दिले. ते म्हणाले ‘आमचे वाजवी हक्क स्वधर्मात राहून मिळविण्यात नैराश्य आल्यावर आम्ही परधर्माचा अंगीकार करून ते हक्क मिळविण्याची पाळी आमच्यावर आली आहे. प्रसंगी तेही करू. आम्ही तुमच्या लाथा खाऊ; पण तुमच्याच धर्मात राहू, असे आम्ही म्हणावे काय?’ असा परखड सवाल त्यांनी टीकाकारांना केला. 
  ‘‘उद्धरली कोटी कुळे, 
  भिमा तुझ्या जन्मामुळे!’’
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या क्रांतिसूर्याचा जन्मच मुळी युगायुगाचा अंधार नष्ट करण्यासाठी आणि त्या अंधारातील वाटसरूंना प्रकाश दाखविण्यासाठी झाला होता. त्यांच्या दिव्य तेजाने येथील गावकुसाबाहेरच्या निर्जीवांना जीवदान दिले. त्यांच्या बुद्धीला तेज देऊन त्यांना हत्तीचे बळ दिले. एवढेच काय; पण सिंहाची डरकाळी फोडण्याचे अभयदानही दिले. म्हणूनच कविवर्य वामनदादा कर्डक म्हणतात,
  ‘भीमा, विचार तुझा
  पिंपळाचा पार आहे,
  सुखाचे द्वार आहे,
  शीलाचे भांडार आहे...’
  स्वाभिमान नष्ट करून कोणत्याही जाती-जमातीची उन्नती करता येणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी सातत्याने केले. इथल्या जीर्ण व्यवस्थेला त्यांनी असे जाळून भस्म केले आणि सगळ्या जगाला शांतिदूताच्या चरणावर खेचून आणले आणि कालची मुकी संस्कृती आज बोलू लागली. म्हणूनच-
  ‘जाळले गेलो तरी
  सोडले नाही तुला
  कापले गेलो तरी
  तोडले नाही तुला’
  असा हुंकार युगानुयुगे नाकारल्या गेलेल्या संस्कृतीतून उमटला तर नवल नव्हे.
  समाज परिवर्तनाला गती देणे व वैचारिक बैठक मिळवून देणे ही बाबासाहेबांच्या विधायक कार्याची भूमिका होती. कारण समाजप्रबोधनाला, परिवर्तनाला व समाजक्रांतीला प्रेरणा देणारे, सामाजिक तत्त्वज्ञान या महापुरुषाच्या तत्त्वज्ञानात आहे. म्हणूनच ते आजच्या परिस्थितीत वंदनीय आहेत.
  ‘दुमदुमे जय भीमची
  गर्जना चोहीकडे
  सारखे जावे तिथे,
  हा तुझा डंका झडे’
  या कविवर्य सुरेश भटांच्या कवितेतून आजचा दलित तरुण आपली अस्मिता आणि स्वाभिमान जागवत प्रकट होतो, तेव्हा बाबासाहेबांचे योगदान त्याही दृष्टीने किती मोलाचे होते हे समजून येईल. ज्या दिवशी बाबासाहेबांच्या स्वप्नातील शोषणविरहित देश उभा करण्याचे क्षण येथे अवतरतील आणि एक मुक्त व समग्र समाज मोकळ्या आकाशाखाली उभा राहील, त्या दिवशी डॉ.   बाबासाहेब आंबेडकर इथल्या व्यवस्थेला केवळ समजलेच नव्हे, तर पचले असे म्हणता येईल. म्हणूनच समतेचे, बंधुभावाचे आणि परिवर्तनाचे अमृतमेघ ज्याने या जगाला दिले त्या लोकोत्तर महान, तत्त्ववेत्त्याला आज आपण सारेजण-
  ‘भीमराया घे तुला या 
  लेकरांची वंदना
  आज घे ओथंबलेल्या 
  अंतरांची वंदना’
  अशा शब्दांत आदरांजली अर्पण करूया.
 • परभणी जिल्हा विकास पुरवणी प्रकाशन समारंभात केलेले भाषण
  तारीख :  २७ जुलै १९९०
  ठिकाण  :  परभणी
  कार्यक्रम :  परभणी विकास पुरवणी..

  लोकमत समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा यांनी
  परभणी जिल्हा विकास पुरवणी प्रकाशन समारंभात केलेले भाषण

  हैदराबाद मुक्तिसंग्रामात मराठवाड्याचा मानबिंदू ठरलेल्या या प्रभावती नगरीत आपणा सर्वांच्या साक्षीने ‘लोकमत’च्या परभणी जिल्हा विकास पुरवणीचे आजच्या मंगलदिनी प्रकाशन झाले आहे. आपल्या स्पंदनांशी हा संवाद साधताना...
  ‘तुझे असंख्यात हात
  त्यातलेच माझे दोन...
  तुझे असंख्यात पाय
  त्यातलेच माझे दोन...
  तुझे असंख्यात डोळे
  त्यातलेच माझे दोन...’
  अशी कविवर्य कै. बा.भ. बोरकरांनी वर्णिलेली अद्वैत अवस्था झाली आहे.  स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्येक आंदोलनाचे महत्त्वपूर्ण केंद्र परभणी जिल्हा बनला. 
  सातत्याने संघर्ष करणा-या या जिल्ह्याला सुपीक जमीन आणि सिंचन सुविधा उपलब्ध होऊनही विकासाची गती मंदच राहिली.
  हैदराबाद मुक्तिसंग्रामात या जिल्ह्याने दिलेल्या योगदानाची इतिहासाने नोंद घेतली.
  मराठवाड्याच्या भूमीत स्वतंत्र कृषी विद्यापीठ होणे आवश्यक होते. कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी या जिल्ह्यातील युवकांनी तीव्र आंदोलन केले आणि कृषी विद्यापीठाचे स्वप्न साकार झाले.
  परभणी जिल्ह्याची राजकीय परंपराही समृद्ध आहे. राजकीय परिवर्तनाला हा जिल्हा नेहमीच सामोरा गेला आहे. मराठी साहित्याच्या दालनात ज्यांच्या तोलामोलाचे समीक्षण सापडणे शक्य नाही, अशा थोर साहित्यिक कै. नरहर कुरुंदकर यांची कर्मभूमी जरी नांदेड असली तरी त्यांची जन्मभूमी परभणी जिल्ह्यातील कुरुंदा हे छोटंसं गाव आहे. कै. बी. रघुनाथांसारखे प्रतिभावान कवीही इथलेच.
  श्री. राजाराम कदम गोंधळी यांनी तर परभणी जिल्ह्याची लोककला परंपरा जगभर पोहोचविली.
  आपल्या सुखात भागीदार होण्याचे भाग्य लोकमत परिवाराला सातत्याने लाभत आले आहे आणि आपल्या वेदनांशी नाते सांगण्याचा आमचा हा प्रयत्न म्हणजे ही विशेष पुरवणी होय. आमच्या उणिवांची जाण लोकमतला आहे. तरीही हे ‘सारस्वताचे झाड’ परभणी जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन उभे आहे. आपल्या कर्तृत्वावर, दातृत्वावर आणि नेतृत्वावर आमचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच इथली नव्या रक्ताने थुईथुई कारंजासारखी उसळणारी तरुणाई आमच्याही आम्हा सर्वांना सदोदित भुरळ घालत आहे.
  ‘मोडले घर नव्याने उभारू
  जिंदगीला पुन्हा हाक मारू’
  अशी जिद्द इथल्या मनामध्ये नि मनगटांमध्ये आहे. अशा जिद्दीचा शोध घेण्याची आमची परंपरा आज या विशेष पुरवणीत प्रतिबिंबित झाली आहे.
  ‘कमर बांधे हुए चलने को
  यहाँ सब यार बैठे हैं,
  बहुत आगे गये बाकी,
  जो है, तैयार बैठे हैं।’
  आपल्या वेदनांना आवाज देण्याचे सामर्थ्य आमच्या पंखांमध्ये यापुढेही एकवटत राहो, अशी अपेक्षा करून आणि पुनश्च या मातीला मानाचा मुजरा करून माझं हे अध्यक्षीय भाषण मी येथेच पूर्ण करतो.
  जायकवाडी, सिद्धेश्वर धरणांमुळे सिंचन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सुपीक जमीन आणि सिंचन सुविधांची उपलब्धता असूनही या जिल्ह्याचे आर्थिक मागासलेपण दूर होण्यात अडथळे होत आहेत. विकासकार्यात आपली राजकीय बांधिलकी बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र आले पाहिजे. या भूमिकेचा लोकमतने नेहमीच पुरस्कार केला आहे.
  फैय्याज कुरेशीजींनी म्हटले आहे....
  ‘जहां रोशनी की गरज रही, वहीं एक चिराग जला दिया!’
  ‘लोकमत’ याच तत्त्वावर वाटचाल करीत आहे. ‘ज्योत से ज्योत लगाते चलो’ या सामाजिक बांधिलकीने आपल्या राज्याची देशाची प्रगती कशी होईल याचा ध्यास घेऊन काम करीत आहे.
 • पां.वा. गाडगीळ स्मृतिदिन कार्यक्रमात केलेले भाषण
  तारीख :  १४ जानेवारी १९८९
  ठिकाण :  नागपूर
  कार्यक्रम :  पां वा गाडगीळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाषण

  लोकमत समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा यांनी
  पां.वा. गाडगीळ स्मृतिदिन कार्यक्रमात केलेले भाषण

  पत्रपंडित पद्मश्री पां.वा. गाडगीळ साहेब यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत पारितोषिक स्पर्धा आयोजित करायची संकल्पना आदरणीय बाबूजींनी आम्हाला दिली. श्री. गाडगीळ साहेब लोकमतच्या पहिल्या दिवसापासून संपादक मिळाले. त्यामुळे लोकमत परिवाराला एक मोठा आधार मिळाला अशीच आमची भावना होती. सुरुवातीच्या काळात गणेशपेठमधील एका गोडावूनमध्ये लोकमत कार्यालय असताना नागपूरच्या रणरणत्या उन्हात गाडगीळ साहेब कसलीही तक्रार न करता काम करीत असत. दौरे करीत असत. त्यांच्यामुळे लोकमतला एक भारदस्तपणा आला. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर लोकमत परिवाराला गाडगीळ साहेबांचा विसर कधीही पडता कामा नये. यासाठीच या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. गाडगीळसाहेब एक द्रष्टे पत्रकार होते. ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती, ग्रामीण अर्थपुरवठा, सहकार या विषयांवर ते सातत्याने लिहीत असत. वृत्तपत्राचा चेहरामोहरा ग्रामीण जीवनाकडे वळलेला असला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. ‘दास कॅपिटल’ सारखा एक अप्रतिम मराठी ग्रंथ लिहिणारे गाडगीळ साहेब आचाराने विचाराने पूर्णत: जिवंत पत्रकार होते. ‘वाचन करून लेखन करणे’ असे जे थोडे पत्रकार असतील त्यात गाडगीळ साहेब होते. ‘लोकमान्य’ या वृत्तपत्रातील गाडगीळ साहेबांच्या अग्रलेखाने ४० वर्षांपूर्वी एक पिढी महाराष्ट्रात घडविली गेली. काँग्रेसच्या शिबिरात ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेती या विषयावर अत्यंत तळमळीने गाडगीळ साहेबांचे बौद्धिक ऐकले की महाराष्ट्रात काँग्रेस कार्यकर्ते भाषणे करू शकत. अभ्यासू वृत्ती, स्पष्टवक्तेपणा आणि ‘मला सतत काहीतरी सांगितले पाहिजे’ ‘मी सतत लिहिले पाहिजे,’ याचा आग्रह करणारे गाडगीळसाहेब एक व्रतस्थ संपादक होते. लोकमतमधून निवृत्त झाल्यानंतर सातत्याने त्यांनी आपला ‘मंथन’ कॉलम लोकमतमध्ये अतिशय प्रभावीपणे लिहिला. त्या सर्व लेखनात परदेशी राजकारण, देशातले राजकारण, संसदीय समाजवाद, शेती, शेती अर्थव्यवस्था या सर्व विषयांचे विवेचन ते करीत असत.
  १९२० साली केसरी दैनिकात ‘प्रूफरीडर’ म्हणून आयुष्याची सुरुवात त्यांनी केली आहे. तेच गाडगीळ साहेब महाराष्ट्रातले अग्रगण्य संपादक झाले. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात जिल्हा परिषदांच्या विकेंद्रीकरणाचा फायदा होण्यासाठी गाडगीळ साहेबांचे योगदान फार मोठे आहे. प्रेस कौन्सिलचे ते सदस्य होते. आचार्य अत्र्यांनी त्यांचा ‘पत्रपंडित’ या पदवीने गौरव केला होता, तर भारत सरकारने त्यांना पद्मश्री पदवी दिली. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात गाडगीळ साहेब गेलेले आहेत. १९४९ सालच्या मराठी पत्रकार परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या नावावर आज २५ ग्रंथ आहेत. त्यात ‘दास कॅपिटल’ ‘समाजावादाचा ओनामा’, ‘आजचे आर्थिक संकट’ ‘वर्गकलह की संसदीय समाजवाद’ हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. लोकमत परिवार गाडगीळसाहेबांना पत्रव्यवहारातले पितामह समजतो आणि म्हणूनच त्यांच्या नावे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Web Statistics